Education : लाडक्या बबलीला अखेरचा निरोप देताना पाणावले चिमुकल्यांचे डोळे !

त्या दिवशी शाळेच्या प्रांगणात पाय ठेवताच नेहमीप्रमाणं मुलांचा एक घोळका माझ्याजवळ आला. गुड मॉर्निंग सर sss... म्हणत हातात फुलं देऊन हसतमुखानं शिक्षकांचं शाळेत रोज स्वागत करणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आज नेहमीची टवटवी दिसत नव्हती. काहीतरी विपरीत घडलंय याची चाहूल एव्हाना लागली होती.
Education
EducationAgrowon

त्या दिवशी शाळेच्या प्रांगणात पाय ठेवताच नेहमीप्रमाणं मुलांचा एक घोळका माझ्याजवळ आला. गुड मॉर्निंग सर sss... म्हणत हातात फुलं देऊन हसतमुखानं शिक्षकांचं शाळेत रोज स्वागत करणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आज नेहमीची टवटवी दिसत नव्हती. काहीतरी विपरीत घडलंय याची चाहूल एव्हाना लागली होती. “सर, आपली बबली गेली...” आदित्यनं कशीबशी बातमी सांगत कोंडी फोडली. “कुठं गेली रे?” मी लगेच उत्सुकतेनं विचारलं. “सर, ती तिकडं कोपऱ्यात मरून पडलीय. काल आम्ही गावातल्या जत्रेला आलतो. तव्हा इथं मैदानावर ती फिरत होती. रात्री मेली असंल बहूतेक...” ऋषीचे ते शब्द माझं काळीज चिरीत गेले. ऐकून सुन्न झालो. काय करावं तेच क्षणभर सुचेना. अचानक बसलेल्या या मानसिक धक्क्यातून सावरायला पुढचे काही क्षण गेले.

Education
Rural Education : ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणगंगा आटणार

तिकडं तिला बघायला जायचं पण मन होईना. जाऊन पाहतो तर बबली निपचित पडलेली. एरवी मुलं किंवा शिक्षक असं कोणीही जवळ गेलं की, विशिष्ट आवाज करत, पायात घोटाळत, आपल्या लडीवाळ वागण्यानं सर्वांना आपलंस करणाऱ्या बबलीचं ते निस्तेज कलेवर बघवेना. तिथून पाठमोरा झालो. मुलांमध्ये अस्वस्थता जाणवत होती. “सर आता काय करायचं?” आदित्यनं विचारलं. “खड्डा खणून त्यात तिला पुरायला लागेल अरे आता.” मी म्हणालो. ‘तिला इथंच पुरायला पाहिजे’, असं म्हणत मुलांनी शाळेच्या मैदानाच्या कोपऱ्यातली जागा दाखवली. मुलं खड्डा खणायला टिकाव, फावडं आणि घमेलं आणायला गेली. तशा बबलीच्या आठवणी एखाद्या चलचित्रपटासारख्या डोळ्यांसमोरून पुढे सरकू लागल्या. केवळ मुलंच नाहीतर शिक्षक आणि गावकऱ्यांचीही लाडकी बबली! मनात विचारांचं एकच काहूर माजलं.

Education
Agriculture Education : शेती क्षेत्रातलं शिक्षण घेतल्यावर कोणत्या संधी आहेत ?

महिनाभरापूर्वी बबली मुलांसोबत शाळेत आलेली. चार दोन दिवस असेच गेले. पुढे तिने शाळेच्या परिसरातच मुक्काम ठोकला. येता-जाता मुलं बबलीबरोबर खेळू लागले. मस्त रमली होती ती. कधी कोणावर भुंकली नाही की कधी कोणाच्या मागेही लागली नाही. लहान मुलं परिपाठाला बसली की ही शांतपणे रांगेत बसायची. एरवी झाडांच्या सावलीत मस्त लोळायची. दुपारी तिथेच ताणून द्यायची. हळूहळू बबलीची मुलांसोबत भारीच गट्टी जमली. मुलंच नाहीत तर आम्ही शिक्षक, पालकही शाळेत आल्यावर तिची चौकशी करु लागलो. अत्यंत अल्पावधीत सर्वांनाच तिचा लळा लागला होता. बघता बघता ती आमच्या परिवाराचाच एक भाग बनली. तिच्या अल्लड, खेळकर, गोड, लोभस असण्याच्या आणि वागण्याच्या गोष्टी मुलांमार्फत घराघरांत पोहोचल्यात. ते ऐकून खास तिला बघायला पालक आणि गावकरी शाळेत येऊ लागले.

रोज सकाळी शाळेत आलेली मुलं बबलीची आठवण काढायची. परिपाठाआधी तिच्यासोबत खेळायला मुलांना भारी आवडायचं. सारेच तिला जीव लावत. तिची काळजी घेत असत. शाळेजवळच राहणारी पाचवीतली अनुजा सायंकाळी बबलीला भाकरी खायला देत असे. दुसरीतली वैभवी घरून खास तिच्यासाठी डब्यात जास्तीची भाकरी आणायची! सहावीतला उदय तर खाऊच्या पैशातून तिला बिस्कीट खायला आणून द्यायचा. स्नेहल शाळेतला खिचडीभात ताटात घेताना तिच्याही वाट्याचा वाढून घ्यायची. बबली जिथं बसलेली असे तिथं तिच्याशेजारी जाऊन जेवायला बसत असे. स्वतः जेवत असे आणि तिला पण जेवू घालत असे!

Education
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

ओंकार आणि आदित्य हे दोघेही मित्र तिला आठवणीने पाणी पाजत. तिला कोणी त्रास देत नाही ना? याची भूषण मनापासून काळजी घ्यायचा. तिच्यासोबत छान वागणाऱ्या मुलांना आम्ही जाहीरपणे शाबासकी देत असू. त्याचा परिणाम असा झाला की, बहुसंख्य मुलं बबलीसोबत आता छान वागू लागली. रोजच्या परिपाठात तिच्याविषयी बोललं जायचं. बबली शाळेत आल्यावर कुत्र्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारा ‘चिल्लर पार्टी’ हा सिनेमा पुन्हा एकदा दाखवण्याचा आग्रह मुलांनी धरला. एके दिवशी मुलांनी बबलीविषयी आपल्या भावना शब्दांत पकडायचा मस्त प्रयत्न केलेला. तिचं बबली असं नामकरणही मुलांनीच केलेलं.

आपण इतर ठिकाणी नेहमी बघतो. अनेक शाळांचा परिसर म्हणजे मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेला असतो. शाळा सुटल्यावरच नाही, तर शाळा भरलेली असतानाही अनेकदा मोकाट जनावरांचा त्रास होत असतो. बबली मात्र याला पूर्णपणे अपवाद होती. शाळेत आलेली एक कुत्री गोड वागण्यानं सर्वांना जिंकून घेते. शिक्षक पण त्या मुक्या जीवाशी इतकं छान वागतात, हे मुलांना प्रत्यक्ष बघायला मिळालं होतं.

त्याचा परिणाम असाही झाला की शेतकरी आईबापांची पोरं घरी गेल्यावर आपल्या गायीगुरांशी प्रेमानं वागू लागली होती. त्यांना चारा, पाणी देताना कंटाळा न करता त्यांची काळजी घेऊ लागली. प्राणीमात्रांवर प्रेम करावं, असा भूतदयेचा धडा किंवा संस्कार आमच्यापेक्षा बबलीच्या शाळेत येण्यानं मुलांना जास्त चांगला समजला होता. कारण इथं केवळ पोपटपंची नव्हती, त्या उक्तीच्या मागं कृतीचं पाठबळ उभं असलेलं मुलांना दिसलं होतं. कारण मोठी माणसं जे सांगतात, बोलतात ते मुलं करतीलच असं नाही. पण मोठी माणसं जी कृती करतात त्याचं अनुकरण मुलं पटकन करतात.

शाळा सुटताना मुलं तिला प्यायला पाणी ठेवायची. तिला दुपारी उन लागू नये म्हणून काही मुलांनी काठ्या आणि पोत्यांच्या मदतीनं तिला घर बनवलं होतं. मोकाट कुत्र्यांमागं दगडं घेऊन लागणारा तिसरीतला रामदेखील आता बबलीची काळजी घेत होता. रामच्या विचारवृत्तीत आणि कृतीत झालेला बदल आम्हा सर्वांना सुखावणारा होता. एके दिवशी मामानं खाऊसाठी दिलेल्या पैशांतून त्यानं बबलीला बिस्कीट पुडा आणला. स्वत:च्या हातांनी खाऊ घातला. तुषार आणि साहिल ही मोकाट कुत्र्यांना विनाकारण त्रास देणारी खोडकर जोडगोळी बबलीच्या येण्यानं बदलली होती! गल्लीतल्या कुत्र्यांनाच काय मुक्या जीवांनादेखील आता ते त्रास द्यायचे नाहीत. बबली शाळेच्या परिसरातच घाण करायची. पण मुलं कोणतीही तक्रार न करता ते भरून टाकत. व्हरांड्यांतल्या फरशीवर तिनं लघवी केली असेल तर मुलं ती जागां धुवून घ्यायची.

एके दिवशी सकाळी सहावीतले निखिल, ओंकार, रोहित, प्रणव आणि काही मित्र आले आणि बबलीच्या स्तनांना जखम झाल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही ती जखम कोरडी केली. त्यावर हळद लावली. हळूहळू ती जखम भरून आली. तिला बरं वाटलंय, असं वाटत होतं. बबली एकदम स्मार्ट होती. भलती क्यूट दिसायची. ती प्रिग्नंट होती. तिचे दिवस भरत आले होते. आता लवकरच ती पिल्लांना जन्म देणार होती. मात्र दिवसेंदिवस तिची अवस्था फारच अवघडल्यासारखी झाली होती. मुलांना मात्र त्या क्षणाची भारी उत्सुकता लागून राहिलेली. तिला किती पिल्लं होतील? ती कशी दिसतील? मुलांनी पिल्लांची वाटणी आपसांत करून घेतलेली!

आम्ही सर्वजण त्या क्षणाची वाट पाहात होतो आणि आज अचानक असा प्रसंग सामोरा आला. तिचे दिवस भरले होते. डिलीव्हरी दरम्यान तिला त्रास झाला असावा. त्यातच सर्वांच्या लाडक्या बबलीचा जीव गेला असणार...

मुलांनी कसाबसा खड्डा खणला. त्यात मीठ टाकलं. शाळेतल्या परिसरातल्या फुलझाडांची फुलं आणली. आदित्यनं तिच्या तोंडात भाकरीचा तुकडा भरवला. सर्वांनी तिचं अंत्यदर्शन घेतलं. तिच्यावर माती लोटायला मात्र मुलांच्या जीवावर आलं. बबलीला शेवटचा निरोप देताना मुलांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. अखेरीस आदित्यनं फावडं हातात घेऊन माती लोटली. तिचं शरीर मातीसाद गेलेला असला तरी तिच्या आठवणी सतत सोबत करत राहतील. आदित्य शिंदेच्या म्हणण्यानुसार आम्ही दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून बबलीला श्रद्धांजली अर्पण केली.

तिला ज्या जागी पुरलं तिथं एक फुलझाड लावायची कल्पना मुलांनी मांडली. ही कल्पना प्रकाश बाबा आमटे सिनेमातून मुलांना सुचलेली. तिकडे नेगलच्या आठवणी चिरंतन राहाव्यात म्हणून हेमलकशाला प्रकाश आमटेंनी आंब्याचं झाड लावलेलं मुलांना माहिती होतं. मुलांच्या अशा या विचार करण्याचा आम्हा शिक्षकांना खूपच अभिमान वाटला. कौतुक वाटलं. मुलं म्हणाली बबली पांढऱ्या रंगाची होती. पांढऱ्या रंगाचं फुलझाड लावायचं. ती फुलं फुलली की तिची आठवण येईल. रोहितनं तगरचं झाड लावायचं सुचवलं. ते झाड कधीच सुकू द्यायचं नाही. रचना म्हणाली “सर, बबली लई लाजाळू होती. लाजळूचं पण झाड लावू आपण इथं!” बबलीला जड अंत:करणानं निरोप देऊन आम्ही तिथून चालू लागलो.

भूतदयेचा आणि संवेदनशीलतेचा मोठा संस्कार आयुष्यभरासाठी मुलांना अवघ्या महिनाभरात देणाऱ्या बबलीला आम्ही कोणीच विसरू शकणार नाही. असे काही अविस्मरणीय क्षण, अनुभव आणि प्रसंग मुलांच्या मनात कायम घर करून राहतात. किंबहुना अशा आठवणीच मुलांच्या मनात शाळा सतत जतन करून ठेवायला कारणीभूत ठरत असतात. शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त केलेले आणि पाठ्यपुस्तकांच्या पोलादी चौकटीत अडकलेले शिक्षण यासाठीच बाहेर काढून ते मुलांच्या जीवनानुभवाशी जोडायची गरज आहे, असे वाटते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com