Heavy Rain : सव्वा लाख हेक्टर पिकांची हानी

राज्यात मॉन्सूनचा जोर कायम असून गेल्या तेरा दिवसांत ३५५ पैकी २७० तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. अतिपावसामुळे आतापर्यंत सव्वा लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे ः राज्यात मॉन्सूनचा जोर कायम (Monsoon Rainfall Continue In Maharashtra) असून गेल्या तेरा दिवसांत ३५५ पैकी २७० तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस (Heavy Rain) झाला आहे. अतिपावसामुळे आतापर्यंत सव्वा लाख हेक्टरवरील पिकांची हानी (Crop Damage More Than One Lac Hector) झाली आहे. संततधार खंडित न झाल्यास काही गावे ओल्या दुष्काळाकडे वाटचाल करू शकतात, अशी भीती कृषी विभागातील (Department Of Agriculture) अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात आता फक्त बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. याशिवाय २४ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा राज्यातील अतिपावसाच्या क्षेत्रात मोडतो. मात्र, यंदा तेथे अजूनही चांगला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे.

Heavy Rain
Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

६० तालुक्यांमध्ये चांगला पाऊस

मॉन्सून सर्वदूर चांगला बरसत असल्यामुळे राज्यातील कमी पावसाचे ६० तालुकेदेखील आता ७५ ते १०० टक्के पावसाच्या गटात आले आहेत. तेथील खरीप पिकांच्या वाढीची चिंता मिटली आहे. मात्र, इतर २७० तालुक्यांमध्ये आता पाऊस १०० टक्क्यांपेक्षा जास्त पडला आहे. नाशिकच्या १४, नगरच्या ११, सोलापूरच्या १०, बीडच्या १०, नांदेडच्या १६, तर नागपूरच्या १३ आणि चंद्रपूरच्या १५ तालुक्यांमध्ये जास्त पाऊस झालेला आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत राज्यात सरासरी ४१.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस होत असतो. त्यापैकी आतापर्यंत ४२९.८ मिलिमीटर (४२.८ टक्के) पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ३९२ मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा आतापर्यंतचा मॉन्सून अपेक्षेपेक्षाही जादा बरसतो आहे.

नांदेड, अमरावतीत पिकांचे मोठे नुकसान

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अतिपावसामुळे आतापर्यंत १४ जिल्ह्यांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. १.२१ लाख हेक्टरवरील पिके आतापर्यंत बाधित झाली असून हा आकडा पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड व अमरावती जिल्ह्यात झाले आहे. नांदेड भागातील ३६ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व फळपिकांची हानी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील २७ हजार हेक्टरक्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा व इतर पिके वाया गेली आहेत. याशिवाय अतिपावसाने ११४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १६ हजार हेक्टर, चंद्रपूर १० हजार हेक्टरवरील खरीप पिकांना पावसाने तडाखा दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com