
Kolhapur News : सर्वत्र ‘व्हॅलेंटाइन डे’ची (Valentine's Day) धामधूम सुरू असतानाच या दिवशी मोठे महत्त्व असणाऱ्या गुलाबाचा दर कमी झाला. अनपेक्षित दर घसरणीमुळे उत्पादकांवर निराश होण्याची वेळ आली.
जिल्ह्यातील स्थानिक बाजारामध्ये गुलाबाची (Rose) आवक वाढल्याने गेल्या दोन-तीन दिवसांच्या तुलनेत व्हॅलेंटाइन डे दिवशी गुलाबाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी घट झाली.
१० रुपये प्रति फूल असणाऱ्या गुलाबाचा दर १० रुपयांच्याही खाली आला. दराच्या अनपेक्षित पडझडीमुळे गुलाब उत्पादकांचे (Rose Producer) चेहरे मात्र कोमेजले. या दिवशी दरात वाढ होईल, अशी अपेक्षाही क्षणभंगुर ठरली.
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गुलाबाची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेवरच गुलाब उत्पादकांची भिस्त होती. त्यामुळे जादा फूल तोडण्याची तयारी उत्पादकांनी केली होती. व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येपर्यंत दरात वाढीची अपेक्षा होती.
मात्र हा दिवस उजाडताच बहुतांशी बाजारपेठांमध्ये स्थानिक गुलाब उत्पादकांनी गुलाब जादा विक्रीस आणल्याने व त्या तुलनेत मागणी कमी असल्याने दर स्थिर, उच्चांकी राहू शकले नाहीत.
कांडगाव (ता. करवीर) येथील फूल उत्पादक सचिन पाटील म्हणाले, ‘‘मी वर्षभर गुलाब शेती करतो. आमची भिस्त लग्नसराईवर जास्त आहे. या बरोबरच व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. शेतकऱ्याने यासाठी नियोजन केले होते.
पण फुले बाजारात पाठविली, त्या वेळी उलटी स्थिती होती. दर कमी असल्याने आम्ही अनेक व्यापाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी उठाव नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. हा अनुभव निराशजनक होता.
‘‘दोन दिवसांपर्यंत गुलाबाला २० फुलांच्या बंडलला २०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. तो व्हॅलेंटाइन डे दिवशी १८० रुपयांपर्यंत खाली आला. अनेकांनी शीतगृहात ठेवून गुलाब बाजारात आणला. यामुळे आवक वाढली खरी, पण त्या तुलनेत मागणी नसल्याने मिळेल त्या दरात फुले देण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही,’’ असेही पाटील म्हणाले.
लग्नसराईच तारणार
सध्या गुलाबाला लग्न सोहळ्यामध्ये चांगली मागणी आहे. यामुळे नजीकच्या काळात तरी गुलाबाच्या दराला लग्नसराईचाच आधार ठरणार असल्याचे मत फूल उत्पादकांचे आहे.
ज्या दिवशी लग्नाचे मुहूर्त अधिक त्या दिवशी गुलाबाची काढणी जादा करण्याकडे आमचा कल असल्याचे जिल्ह्यातील काही गुलाब उत्पादकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.