आमदारांना सर्वाधिक निधी देणारे महाराष्‍ट्र एकमेव राज्य

राज्यात आमदार आणि खासदार यांची तुलना केली तर आमदारांना सर्वाधिक निधी मिळणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

औरंगाबाद ः राज्यात आमदार आणि खासदार यांची तुलना केली तर आमदारांना सर्वाधिक निधी (MLA Fund) मिळणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आमदार हे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचून काम करतात. त्यांचा थेट तळागाळातील लोकांशी संबंध येतो. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी जास्त निधी दिला आहे. याचा मला आनंद आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या आमदार निधीतून मराठवाड्यातील ३ हजार तीनशे शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. २६) औरंगाबादेतील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, आमदार विक्रम काळे, आंबादास दानवे, सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, कल्याण काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदींची उपस्थिती होती.

शिक्षक प्रतिनिधींचे गणित कच्च कसे?

वाचन संस्कृती वाढावी म्हणून आमदार विक्रम काळे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तक वितरणाचा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. ज्ञानवृद्धीसाठी आमदार निधी खर्च होणे ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. मात्र कार्यक्रमाच्या विलंबामुळे आमदार विक्रम काळे यांना शाब्दिक चिमटे काढण्याचेही पवारांनी सोडले नाही. विक्रम काळे यांनी फोन करून १५ मिनिटे द्या, पुस्तके वाटायची आहेत, तुमचा फक्त १५ मिनिटांचा वेळ द्या, असे फोनवर म्हणाले. परंतु या कार्यक्रमासाठी जवळपास एक तासभर गेला. शिक्षक मतदार संघाच्या प्रतिनिधीचे वेळेच गणित इतके कच्चे असेल, तर विद्यार्थ्यांचे काय होईल, असा सवाल शरद पवार यांनी केला. त्या वेळी सभागृहात हशा पिकला.

विक्रम काळेंच्या कार्यक्रमाला मी दबकत येतो ः अजित पवार

विक्रम काळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अजित पवार यांनीही चांगलीच थट्टा केली. ते म्हणाले, ‘‘विक्रम काळे यांच्या कार्यक्रमात मी दबकत येतो. कारण मागच्या वेळी सुप्रिया कार्यक्रमाला आली, तर थेट मला मंत्री करा म्हणून मागणी केली. कारण काय तर तीन वेळा निवडून आलोय आणि चंद्रकांत पाटील एकदाच निवडून आले त्यांना मंत्री केले, मला का नाही, असा आमचा विक्रम आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com