Tata Airbus : ३ महिन्यात ४ मोठे प्रकल्प राज्याबाहेर

वेदांता फॉक्सकॉननंतर (Vedanta Foxconn) आता नागपूरमध्ये उभारण्यात येणारा टाटा एअरबसचा (Tata Airbus) विमान निर्मितीचा प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे हलवण्यात आला आहे.
Tata Airbus
Tata Airbus Agrowon

राज्यातून मोठे प्रकल्प निसटून दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची मालिका सुरूच आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर (Vedanta Foxconn) आता नागपूरमध्ये उभारण्यात येणारा टाटा एअरबसचा (Tata Airbus) विमान निर्मितीचा प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे हलवण्यात आला आहे.

टाटा एअरबस विमान निर्मितीचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प होता. हा प्रकल्प आता गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येणार असल्याचे कंपनीकडून गुरुवारी (ता. २७ ) सांगण्यात आले.

"मोठे प्रकल्प राज्यात आणू म्हणता म्हणता हातातील प्रकल्प अन्य राज्यात जात आहेत. हा कुणाचा नाकर्तेपणा आहे, आहे हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टाटा एअरबसचा प्रकल्प नागपूरमध्ये उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र हा प्रकल्पही राज्यातून बाहेर गेला आहे.

त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. भाजपने मात्र या अपयशाचं खापर महाविकास आघाडी सरकार फोडलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. "सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळेच प्रकल्प बाहेर गेला," असा आरोप आ.लाड यांनी केला. तर माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, " बालिश आरोप सहन करणार नाही. आरोप करायचे असतील तर पुरावे द्या,." असे लाड यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शिवसेनातून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर राज्याबाहेर गेलेल्या मोठ्या प्रकल्पांची संख्या चारवर पोहचली आहे. या चार प्रकल्पातून राज्यात १ लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती. मात्र चारही प्रकल्प बाहेर गेल्याने काही हजार लोकांच्या हातचा रोजगारही गेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गुंतवणूकीचे प्रकल्प राज्यात आणू असे सांगितले होते. मात्र घडतंय ते सगळं उलटं! राज्याबाहेर गेलेल्या चार प्रकल्पापैकी तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? असा प्रश्नही त्यांचे राजकीय विरोधक उपस्थित करत आहेत.

टाटा एअरबसचा प्रकल्प नागपूरच्या मिहान येथे उभारण्यात येणार होता. तशी माहितीही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. तसेच या प्रकल्पाची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दिली होती. मागच्या महिन्यात वेदांता फॉक्सकॉन हा सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यातील गुंतवणूक १.५४ लाख कोटींची होती. त्यावेळीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र त्यानंतरही ही गळती थांबली नाही.

कोणते प्रकल्प राज्याबाहेर गेले ? कुठे गेले ?

-वेदान्ता-फॉक्सकॉनचा १ लाख ८० हजार कोटींचा सेमिकंडक्टर निर्मिती करणारा पुण्याजवळील तळेगाव येथे उभारला जाणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातच्या ढोलेरा येथे गेले.

- टाटा एअरबस कंपनीचा विमान निर्मितीचा प्रकल्प २२ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरला नियोजित होता. हा प्रकल्प आता वडोदरा येथे उभारण्यात येणार.

- वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीचा ४२४ कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राला नाकारला. औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये नियोजित होता. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेला.

- महाराष्ट्रात औषध निर्मितीचा तीन हजार कोटींचाड्रग पार्क उभारण्यात येणार होता. रत्नागिरी येथील रोहा आणि मुरुडमध्ये जागा देण्याचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्प हिमाचल प्रदेश, गुजरात, आणि आंध्रप्रदेशला मान्यता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com