
Sangli News : सांगली बाजार समितीवर (Sangli Market Committee) वर्चस्व मिळविण्यासाठी सर्व पक्षांचे नेते रणनीती ठरवू लागले आहेत. पॅनेल बांधणीवरून महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होणार का आघाडी होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सांगली बाजार समितीचे मिरज, कवठे महांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. सांगली बाजार समितीमध्ये सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.
सांगलीसह आटपाडी, तासगाव, पलूस, शिराळा, विटा, इस्लामपूर सात बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.
बाजार समिती निवडणुकीबाबत कोणत्याही नेत्याकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. ‘जर-तर’वर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील सर्वच निवडणुका राज्यात महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, सांगली बाजार समितीसह सात बाजार समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चर्चा झालेल्या नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित राहणार की विभक्त स्थानिक आघाड्यांत लढणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्याशी समझोत्यांबाबत चर्चा आहेत. मात्र अधिकृत कोणीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
वसंतदादा गटाची उद्या बैठक
वसंतदादा गटाने शुक्रवारी (ता. ७) कार्यकर्त्यांची बैठक कॉंग्रेस कमिटीच्या शेजारी वसंतदादा भवनात बोलावली आहे. विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील या वेळी भूमिका जाहीर करणार आहेत. बैठकीत आगामी निवडणुकांबाबत भूमिका ठरवण्यात येणार आहे.
निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याबाबत काँग्रेस अंतर्गत मतभेद पुढे येत असून या पार्श्वभूमीवर ही बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.