
राजेंद्र उगले
ज्यानी नही खाल्ली भोगी तो व्हतो रोगी...’ (Makar Sankranti Special) असं काहीबाही ऐकायचो आम्ही आमच्या बालपणी म्हाताऱ्या आजीकडून. कोणत्याही पुस्तकातून न शिकलेली आजी सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या किती सुशिक्षित होती; याचा उत्तम नमुना असायच्या तिच्या तोंडच्या म्हणी.
आई जर लेकरांचं उदरभरण करत असेल तर आजी कायमच नातवंडांचं सांस्कृतिक भरणपोषण करत आली आहे. तिच्या तोंडपाठ असायच्या कितीतरी लोककथा; ज्यातून झिरपायचं आमच्या परंपरांचं चवदार पाणी.
तिच्या कथांना कायमच असायचं उत्तरदायित्वाचं कथानक. कोणत्यातरी देवाला ती करायची नायक तर खलप्रवृत्तीचा एखादा राक्षस असायचा त्यातला खलनायक. साहजिकच वाटायची भीती. या भीतीतूनच मग व्हायचा संस्कार सत्प्रवृत्तीचा.
प्रत्येक सणाची तिच्या पोटलीत असायची भारी कथा. अंगणात अंथरुणात पडल्या-पडल्या मोकळ्या आकाशातील चांदण्या न्याहाळत, गोष्टी ऐकत लागायची गाढ झोप.
आकाशातल्या ग्रहगोलांचेही तिच्याकडे अगाध असायचे ज्ञान. कोणत्या चांदणीला काय म्हणतात; याचे नव्हते तिच्याकडे शास्त्रीय ज्ञान. पण ती जे सांगायची तेच वाटायचं खरं; स्मार्टफोन नसलेल्या काळात.
संक्रांतीच्याही तिच्याकडे असायच्या अनेक गोष्टी. संक्रांत कुठून येते, कुठे जाते, ती काय घालते, कोणत्या वाहनावर बसते... असं सांगत असायची ती कोणालाही.
भोगी आणि संक्रांत म्हणजे तिच्या आनंदाला उधाण येई. उसाचे ठुसे, गव्हाच्या ओंब्या, कच्ची-पक्की बोरं, तिळाचे दाणे असं खाऊ घालायची ती बळजबरीनं.
याच वस्तू मातीच्या सुगडात (सुघटात) घालून ती द्यायची बायकांच्या ओटीत घालून. तिला विचारलं तर म्हणायची; ‘आपल्याकडं जे असतं; ते असं थोडं-थोडं लोकायला द्यावं.
म्हंजी देव आपल्याला भरभरून देतो. लोकायची लेकरंबाळं सुखी व्हत्यात नि आपल्याबी घरात सुख आपसूक येतं.’
अशिक्षित असणारी आजी सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय; हे बिंबवत राहायची तिच्या शिकवणुकीतून आणि मग मुलं पन्नास पैशाची गोळीही खायचे वाटून.
खरं तर संक्रांत म्हणजे केवळ ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ किंवा एकमेकांना कोरड्या शुभेच्छा देण्याचा सण नसून तो आपल्यातील स्नेह, माधुर्य यांचं हस्तांतर करण्याचा पवित्र सण आहे.
आपल्यातली अर्धी भाकर भुकेल्याच्या ताटात वाढण्याचा सण आहे. आपल्यातील चांगुलपणा वाटण्याचा सण आहे.
कारण आपण फक्त आहोत एक कागदी पतंग; कुणातरी अज्ञाताच्या हाती आयुष्याची दोरी सोपवून भरारी घेणारा. कागद फाटण्याआधी ओळखायला हवं स्वतःला. चला स्नेह वाटू या... गोडवा चाखू या. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.