
Nashik Water News : मालेगाव तालुक्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानाबरोबर तालुक्यात पाणीटंचाई (Water Shortage) जाणवू लागली आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त चार गावे व पाड्याची तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी भारत वेन्दे यांनी पाहणी केली.
पाहणी दौऱ्यात तालुक्यातील चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटले आहे. त्यामुळे लवकरच तालुक्यातील कजवाडे, सावकारवाडी, एरंडगाव, वऱ्हाणेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नितीन देवरे यांनी सांगितले.
तालुक्यात महसूल व पंचायत समिती प्रशासन सातत्याने टंचाईचा आढावा घेत आहे. गतवर्षीची टँकरची संख्या पाहता या चार गावांना दररोज टँकरद्वारे पाणी पुरवावे लागणार आहे. ही चारही गावे वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जात आहे. शासनाला या संबंधित गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
पंचायत समितीने पाठविलेल्या प्रस्तावानुसार तहसीलदार नितीन देवरे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांच्यासह कजवाडे, रामपुरा, सावकारवाडी, एरंडगाव व वऱ्हाणे या गावांना दोन टप्प्यांत भेट देत पाणीटंचाईचा आढावा घेतला.
या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. परिसरातील खासगी विहिरींनीही तळ गाठला आहे. टंचाईग्रस्त गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी टँकरचा एकमेव पर्याय आहे. पाणीटंचाई पाहणीतील संयुक्त दौऱ्यात ही बाब निदर्शनास आली. संबंधित गावांच्या लोकसंख्येनुसार टँकर खेपाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी रामपुरा येथे विहीर अधिग्रहित केली असून, त्या विहिरीद्वारे या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जाईल.
रोज एक १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने दररोज एक फेरी करण्यात येणार आहे. सावकारवाडीसाठी सहा फेऱ्या, एरंडगाव, वऱ्हाणेसाठी प्रत्येकी दोन फेऱ्या तर कजवाडेसाठी एक फेरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या गावांची पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने अहवाल पाठवून लवकरच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे तहसीलदार नितीन देवरे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.