Pesticide Indusrty : अवघे धरू सुपंथ...

रसायननामा या मालिकेतील हा शेवटचा भाग. आज उत्पादक, विक्रेता, शासन आणि शेतकरी या घटकांच्या सम्यक सहभागाबद्दल बोलूया. रसायन उद्योगातील कुप्रथा दूर करून सुपंथ धरण्याचा निश्चय या घटकांनी अंगी बाणवायला हवा.
Indian Agricultural
Indian AgriculturalAgrowon

Dr. Satilal Patil : काही वर्षांपूर्वी माझ्याकडे तेलंगणामधून एक किटकनाशक उत्पादक (Pesticide Producer) आला. म्हणाला 'साब मेरे पास एकदम स्ट्रॉंग प्रोडक्ट है, उससे किडा मिंटो मे नीचे गिरता है.' मी त्याला वचारलं की, आपण सक्रिय घटक कुठले वापरता? यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून मला चक्कर आली.

तिथं बिचाऱ्या किड्याचं काय होत असेल? हे महाशय अकरा प्रकारचे रासायनिक किटकनाशकाचे सक्रिय घटक एकत्र मिसळून त्यांचा काढा बनवायचे; त्यामध्ये करंज तेल टाकून, त्यात मस्तपैकी रंग टाकून, स्ट्रॉंग जैविक किटकनाशक (Bio Pesticide) म्हणून मोठ्या प्रमाणात गावागावात विकायचे.

या प्रकारांचा धागा चीनपर्यंत जातो. तुम्हाला चीनची एक व्यापारी क्लृप्ती सांगतो. चीन पाश्चिमात्य देशांकडून निकामी झालेल्या बॅटरीच्या सेलचा कचरा जहाजं भरून आपल्या देशात आणतो. पाश्चिमात्य देश, आपल्या देशाततील कचरा, पैसे देऊन चीनला देतात.

गोरा साहेब आपल्या अंगाला घाण लावून घेत नाही. भलेही ती आपली घाण असो. चीनमध्ये पॉवर बँकचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मग चीन, नवीन पॉवर बँकमध्ये, दोन चांगल्या बॅटऱ्या आणि एक कचऱ्यातली निकामी बॅटरी टाकून जगभर निर्यात करतो. म्हणजे पैसे घेऊन घेतलेला कचऱ्याचा निचरा, चीन त्याला जगभर घराघरात पाठवून करतो.

अशा शातीर चीनचं एक रासायनिक कारस्थान किटकनाशक व्यवसायाला (Pesticide Industry) घातक ठरू शकतं. चीन ही जगाची सर्वात मोठी रसायन फॅक्टरी (Chemeical Factory) आहे. रसायन कारखान्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक बायप्रॉडक्ट म्हणजे कचरा तयार होतो.

त्याच्यावर प्रक्रिया करून निचरा करणे खर्चिक काम असते. मग या कचऱ्यामुळे किडे मरतात का ते तपासले जाते. किड्यावर प्रभावी ठरलेले निनावी कचरा-रसायन जगभर किटकनाशक म्हणून निर्यात केले जाते.

Indian Agricultural
Fertilizer : पुण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध

हे निनावी किटकनाशक किड्याला मारत असले तरी, त्याचे मनुष्य, प्राणी आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम तपासलेले नसतात. या निनावी रसायनांपेक्षा, चाचण्या केलेले, नोंदणीधारक रासायनिक किटकनाशक सुरक्षित आहे.

आपल्या औषधाला अधिकाधिक स्ट्रॉंग बनवण्याच्या नादात या भेसळीपासून दूर राहावे. आपण बनवलेल्या रसायनाचे अंश आपण आणि आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतील हे सत्य आहे. हे रासायनिक अतृप्त आत्मे कधी ना कधी तुम्हाला झपाटल्याशिवाय राहणार नाहीत.

Indian Agricultural
Pesticide : कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास

बऱ्याचदा शेतकऱ्याच्या गळ्यात अनावश्यक उत्पादने मारले जातात. या पावडर-टिकली प्रॉडक्टमुळे शेतकऱ्याचा खर्च नाहक वाढतो. म्हणून गरजेचे उत्पादन बनवणे आणि विकणे आवश्यक आहे. आपण बनवलेल्या प्रत्येक बाटलीमुळे शेतकऱ्याच्या समस्या सुटतील, त्याचा फायदा होईल ही अपेक्षा.

बऱ्याचदा मार्केटिंग करणाऱ्या लोकांकडून चुकीचे मार्गर्दर्शन केले जाते. जाणते-अजाणतेपणे कधीकधी तर औषधाचा डोस दुप्पट-तिप्पट सांगितला जातो. मार्केटिंगवाल्याला टिंग मारण्यापासून वाचवण्यासाठी त्याला योग्य ती माहिती देऊन प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. मेंबर बनवणाऱ्या एमएलएम कंपन्यांमध्ये हा प्रकार सर्रास दिसतो.

बाजारात अप्रमाणित उत्पादने बरीच आहेत. सरकार त्यांना प्रमाणित करायचे प्रयत्न करतेय. आपण परवाना असलेली उत्पादने बनवायचा प्रयत्न करावा. डोक्याचा ताप कमी होईल. मित्रांनो, आपल्या ‘बॅलन्स शीट'मध्ये नफ्याच्या कॉलममध्ये प्रामाणिकपणा सुद्धा मांडा. मग बघा तुमचं बॅलन्स शीट कधीच तोट्यात जाणार नाही.

आता डिलर मित्रांसाठी. भावा, शेतकऱ्यांचा तूच तारणहार आहेस, हे लक्षात घे. शेतकऱ्यांचा पहिला सल्लागार म्हणजे डिलर. त्यांना चुकीचा सल्ला देऊन गार करू नका. सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीला उत्तम प्रतीचं पक्षीखाद्य खाऊ घालायचं असतं.

मित्रा, चांगलं उत्पादन विकूनदेखील थायलंडला किंवा उझबेकिस्तानला जाता येतं, हे लक्षात ठेव. एखादं उत्पादन विकतांना अगोदर ते चांगलं आहे की नाही, हे तपासा. नंतर किती मार्जिन आहे हे विचारा.

ज्या कंपनीचे उत्पादन विकतो तिच्याकडे फॅक्टरी, प्रयोगशाळा आहे का हे एकदा तरी तपासून घ्या. ते मीठ देतायेत, की खत हे जाणून घ्या. इतक्या वर्षाच्या व्यावसायिक अनुभवाने आपल्याला कंपनी आणि उत्पादन याची जाण निश्चितच असते. उत्पादनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत शंका आल्यास त्वरित नकार द्या. कुसंगतीमुळे आपली प्रतिमा डागाळली जाते, याचं भान ठेवा.

जसं मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला समाजात मान आहे, तसेच शेतकऱ्यांना खते, किटकनाशक वापराची माहिती देणारे आपण शिक्षक आहोत. राजकारण्यासारखा आपला डिलरी पेशा समाजात बदनाम होण्यापेक्षा, शिक्षकासारखा आपल्याला मान मिळेल असं काम करायची इच्छा ठेवा.

आपली प्रतिमा एवढी उंचावली पाहिजे की, सरकारला, संस्थांना शेतकऱ्याच्या हितासाठी झटणारा उत्कृष्ट डिलर, विक्रेता असी पारितोषिकं देण्याचा मोह होईल.

कृषिव्यवसायाच्या चित्रपटात आपल्याला हिरो बनायचंय, व्हिलन नाही. जुन्या नव्या पिढीतले कित्येक उमदे विक्रेते गेल्या पंचेवीस वर्षांत मला भेटलेत. नवनवीन उपक्रम राबवून, नाविन्यपूर्ण पद्धतीने ते यशस्वीरित्या व्यवसाय करत आहेत. असे शेकडो, हजारो विक्रेते गावोगावी तयार होवोत, हीच अपेक्षा.

आता काही शब्द सरकारी साहेबांसाठी. साहेब, ही कृषिव्यवसायाची गाडी सुरळीत कशी चालेल, हे पाहणं आपलं काम आहे. ट्रॅफिक हवालदारासारखं लायसन्स, पीयूसी, इंडिकेटर असं एक ना अनेक सापळ्यांची मालिका तयार ठेवायची गरज नाहीये.

कुठे कमतरता असतील, त्रुटी असतील तर उद्योजकाला, विक्रेत्याला, शेतकऱ्याला सांगा, तो त्या दुरुस्त करायला तयार असतो. बहुतांश लोकांची कायदा तोडायची इच्छा नसते. फक्त काय करायचं ते माहित नसल्याने त्रुटी निर्माण होतात.

शेतकरी, विक्रेते आणि कंपन्यांना निस्वार्थ सहकार्य करणारे कित्येक साहेब, निवृत्त झाल्यावरदेखील समाजात मानसन्मान मिळवताहेत. हीच परंपरा पुढे सुरु राहावी ही अपेक्षा. शासन हे शिक्षा या शब्दाच्या समानार्थी न होता ते सुशासन व्हावे ही अपेक्षा.

Indian Agricultural
Bio Fertilizers : सरकार युरियासोबत जैविक खते वापरण्याची सक्ती करणार का? केंद्रीय कृषिमंत्र्यांचा लोकसभेत मोठा खुलासा

आता हा व्यवसाय ज्या खांबावर टिकून आहे त्या शेतकरी राजासाठी. भाऊ, झटपट किड्याला मारण्याच्या नादात चुकीचे उत्पादन वापरू नका. किड्याला झटपट मारण्याची अपेक्षा ही, झटपट श्रीमंत करणाऱ्या गुंतवणूक स्कीमप्रमाणे स्कॅम असू शकते.

गरज असेल तरच फवारा. बऱ्याचदा नुसते पाणी फवारले, कडुलिंबाचे तेल, जीवामृत, झाडपाल्याचे अर्क फवारले तरी समस्या संपते किंवा कमी तरी होते. किटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल वाचा, योग्य तोच डोस वापरा. अति डोसमुळे पैसे, पीक आणि पर्यावरणाची माती होते.

कंपन्यांकडून पैसे उकळणारे काही एजंट तयार झालेले आहेत. राजकारणी, चुकीच्या लोकांच्या नादी लागून नुकसान झाले नसूनदेखील तुमच्या प्रॉडक्टमुळे आमचे नुकसान झाले, असं म्हणत करोडो रुपयाची मागणी केली जाते. ब्लॅकमेलिंग सुरु होते.

आयत्या सापडलेल्या बकऱ्यावर गल्लीतील नेते, साहेब लोक, कधीकधी कंपनीचे कामगार आणि विक्रेते हात मारून घेतात. यासारख्या प्रसंगांमुळे एखाद्या जिल्ह्यावर, तालुक्यावर किंवा पिकावर कारण नसताना चुकीचा ठप्पा बसतो. कंपन्या त्या भागात, पिकात नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादने आणताना कचरतात. जुना धोपट मार्ग बरा म्हणत विक्रेत्याला हाताशी धरून बॅकफूटवर खेळतात.

मित्रांनो, शेतीव्यवसायाच्या इंजिनाचे आपण वेगवेगळे स्पेअर पार्ट आहोत. आपण आपले काम इमानदारीने केले की संपूर्ण इंजिन व्यवस्थित काम करेल, यात शंका नाही. पण स्वतः बेईमानी करून इतरांनी व्यवस्थित काम करावे ही अपेक्षा करणे मात्र अयोग्य आहे.

शेतकरी, डिलर, कंपनी आणि शासन हे घटक या व्यवसायाच्या एकाच बोटीत बसलेत. या व्यवसायचक्रात आपली नाळ एकदुसऱ्याला बांधली गेलीय. एकाने इमानदारीने काम केले तर दुसऱ्यावरील बोजा कमी होणार आहे. या बोटीतील सर्वांनी इमानदारीने वल्हवलं तरच आपली नौका व्यवस्थित पार होईल.

पण बोटीतील काहींनी फक्त वल्हवण्याचं नाटक केलं तर मात्र इमानदारीने वल्हवणाऱ्यांवर जास्तीचा बोजा पडेल. तो थकेल आणि पर्यायाने संपूर्ण बोट थांबेल. हे एक दुसऱ्याला गिऱ्हाईक बनवायचं नाटक किती दिवस आपण खेळणार आहोत? मला एक शेर आठवतोय-

बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था

हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा

या बोटीतील कामचुकारांना शोधूया. हे केल्यास किटकनाशकावरील खर्च आणि त्याचे आपल्यावरील दुष्परिणाम कमी होतील. इमानदार साथीदारांना साद आणि साथ देऊया. चला तर मग, एकमेका सहाय्य करत सुपंथाला लागूया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com