
अमोल ढोरमारे, डॉ. दयानंद मोरे
ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. (Rabbi season) ज्वारी हे चारावर्गीय पीक असल्यामुळे जनावरांसाठी चारा म्हणून बऱ्याच ठिकाणी याची लागवड होते. रब्बी ज्वारी (Rabbi Zwari) पिकावर अमेरिकन लष्करी अळी (Worm) या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (Spodoptera frugiperda) असे आहे. ही एक बहुभक्षी कीड असून, सुमारे ३५० पेक्षा जास्त पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते.
जीवनक्रम -
१) या किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते.
२) मादी पतंग साधारणपणे १००० ते १५०० हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर, पोंग्यामध्ये घालते. त्यावर लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण घातले जाते. अंड्याचा रंग १२ तासानंतर गडद तपकिरी होतो.
३) अंड्यातून साधारण २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडते. अळीच्या सहा अवस्था असतात. अवस्थेनुसार अळीचा रंग बदलत जातो. लहान अळीचा हिरव्या रंगाची आणि डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी रंग होतो. तर शेवटच्या अवस्थेत अळीच्या शरिरावर गडद ठिपके दिसून येतात. तसेच डोळ्यावर इंग्रजी ‘वाय’ (Y) आकार स्पष्ट दिसून येतो.
४) पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोष अवस्थेचा काळ हा साधारण १ आठवडा ते १ महिन्यापर्यंत असू शकतो. अशाप्रकारे अळीच्या १० ते १२ पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात.
नुकसानीचा प्रकार -
१) हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.
२) लहान अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. तर मोठी अळी ही पोंग्यामधील पाने खाते, पानांना छिद्र पाडते. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन घट येते.
३) पोंग्यावर लाकडाच्या भुश्शासारखी अळीची विष्ठा हे प्रादुर्भावाचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन -
१) उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे किडीच्या जमिनीतील अवस्था वर येऊन प्रखर सूर्यप्रकाशामुळे किंवा कीटकभक्षी पक्ष्यांमुळे नष्ट होतात.
२) आंतरपीक म्हणून ज्वारी + मूग +उडीद या पद्धतीचा वापर करावा.
३) सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी.
४) पीक उगवणीनंतर १० दिवसांनी शेतामध्ये एकरी २० कामगंध सापळे लावावेत.
५) आंतरमशागत करून तणे काढून टाकावी.
६) किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पोंग्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी. त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.
७) मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास अंडीपुज गोळा करून नष्ट करावेत.
८) शेतात प्रकाश सापळे एकरी १ याप्रमाणे वापर करावा.
फवारणी - (प्रति लिटर पाणी)
१) पीक पोंगा अवस्थेत असताना, अझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ५ मिलि -
२) जैविक नियंत्रणासाठी, नोमुरिया रिलाई किंवा मेटारायझीम ॲनिसोप्ली किंवा लेकॅनिलीयम लेकॅनी ५ ग्रॅम
आर्थिक नुकसान पातळी -
१) प्रति कामगंध सापळा २ ते ३ पतंग.
२) किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढीलपैकी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
फवारणी - (प्रति १० लिटर पाण्यातून)
१) इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ टक्का एस.जी.) ४ ग्रॅम किंवा
२) स्पिनोटोरम (११.७ टक्के एस.सी.) ५.१२ मिलि किंवा
३) क्लोरॲन्टानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ४.३२ मिलि किंवा
४) क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ५.०२ मिलि (आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.)
टीप - फवारणीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या (उदा. नॅपसॅक पंप) आहेत.
अमोल ढोरमारे, ९६०४८३३८१५ - (कीटकशास्त्र विषयाचे अभ्यासक असून, वडवणी येथील विधाका शेतकरी उत्पादक कंपनीत कार्यरत आहेत.)
डॉ. दयानंद मोरे, ७५८८०८२१६५ - (सहायक प्राध्यापक कृषी महाविद्यालय, लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.