
डॉ. सुजॉय साहा, ऋषिकेश भोसले, डॉ. रत्ना ठोसर
Grape Cutting : सध्या द्राक्ष पट्ट्यातील खरड छाटणी पूर्ण झाली असून, द्राक्ष बागा वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. बागलाण (सटाणा) भागातील बागांची बगल फूट काढून ७ ते ८ पानांवर आहे. तर बाकी उर्वरित भागातील उदा. नाशिक, सोलापूर आणि सांगली येथील द्राक्ष बागा सबकेन अवस्थेत आहेत.
मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. बागलाण भागामध्ये खरड छाटणी होऊन फुटलेल्या बागांना या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा मोठा फटका बसला होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरण निरभ्र असून, तापमानात मोठी वाढ झालेली दिसत आहे. सामान्यतः अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागांमध्ये रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता फार कमी आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मॉन्सून दाखल होणार आहे. मॉन्सूनचे ढग आणि पावसामुळे तापमानात त्वरित घट होऊन आर्द्रतेत वाढ होते.
वातावरणातील अशा अचानक बदलांमुळे बागेत प्रामुख्याने बुरशीजन्य करपा (अँथ्रॅक्नोज) आणि जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बॅक्टेरियल लीफ स्पॉट) या रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता वाढते. या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावरील उपाययोजनांची माहिती या लेखातून घेऊ.
बुरशीजन्य करपा (ॲन्थ्रॅक्नोज) :
गेल्या काही वर्षांपासून करपा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, द्राक्ष उत्पादनात मोठी घट होत आहे. बागेत जास्त ओलावा, उष्ण व ढगाळ वातावरण असताना बागेतील फुटींची वाढ जोमाने होते.
अशा अवस्थेत बागेत बुरशीजन्य करपा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः नवीन फुटी निघताना व पावसाळा सुरू होण्याच्या वेळी किंवा अवकाळी पाऊस असल्यास होण्याची शक्यता अधिक असते.
फुटीच्या शेंड्यावरील पानांवर बारीक, पिवळसर डाग सुरुवातीस दिसून येतात. या रोगामध्ये डागांभोवती पिवळसर रंगाची रिंग तयार होते. त्यानंतर हेच डाग तपकिरी रंगात रूपांतरित होऊन छिद्रे पडतात. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पानावरील पेशी मरतात व छिद्र पडते, यालाच ‘शॉट होल’ असे सुद्धा म्हटले जाते.
काही परिस्थितीत हिरव्या काडीवर प्रादुर्भाव झाल्यामुळे या रोगाचे बीजाणू काडीत प्रवेश करतात, यामुळे वाढ तिथेच करपल्यासारखी दिसते.
फुटीचा शेंडाही जळल्यासारखा दिसून येतो. त्यानंतर हे बीजाणू हळूहळू परिपक्व काडीमध्ये प्रवेश करतात. पुढील काळात फळछाटणीनंतर निघालेल्या घडावर प्रादुर्भाव करतात.
उपाययोजना :
- बागेत निघालेल्या अनावश्यक कोवळ्या फुटी काढून टाकल्यास रोग नियंत्रणास मदत होते.
- फवारणी प्रति लिटर पाणी थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कासुगामायसिन (५ टक्के) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ७५० ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी केल्यास नियंत्रण सोपे होईल.
-मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) २ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रत्येकी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) जमिनीमध्ये १० ग्रॅम प्रति एकरी या प्रमाणे ठिबकद्वारे ड्रेचिंग केल्यास वेलीमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते.
जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बॅक्टेरियल लीफ स्पॉट) :
या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: झांथोमोनस सिट्री व्हिटीकोला या जिवाणूमुळे होतो. बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास रोगाची लक्षणे पानावर दिसून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बुरशीजन्य करपा (ॲथ्रॅक्नोज) रोगाच्या लक्षणाप्रमाणेच पानाच्या खालील बाजूस डाग येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटीची वाढ खुंटते किंवा थांबते.
जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फुटीची वाढ कमी अधिक झालेली दिसून येते. या रोगामध्ये डागांभोवती पिवळसर रंगाची रिंग तयार होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात असेल, तर मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. प्रामुख्याने खोडाला भेग पडते.
वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, काडी विरळणी तसेच गर्डलिंगच्या वेळी झालेल्या जखमेमधून होतो. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये जिवंत राहतात. गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात.
उपाययोजना :
या रोगाच्या नियंत्रणाकरिता फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब (४५ डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम किंवा कासुगामायसीन (५ टक्के) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ७५० ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी.
या रोगाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिनचा वापर करू नये.
रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचे महत्त्व :
सध्या द्राक्ष बागेत रोग व्यवस्थापनाकरिता मोठ्या प्रमाणात रासायनिक निविष्ठांचा वापर केला जातो. त्याऐवजी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. ट्रायकोडर्मा हा नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही.
ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊन त्यांची वाढ खुंटते.
-खरड छाटणी झाल्यानंतर ट्रायकोडर्माचा वापर केल्यास बागा एकसारख्या फुटण्यास मदत होते. त्याचे ड्रेंचिंग केल्यास मुळांच्या भोवती असलेल्या रोगांचे बीजाणू नष्ट करते. त्यामुळे द्राक्ष वेल सक्षम राहते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने द्राक्षासाठी जैविक बुरशीनाशक मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) आणि मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) हे घटक विकसित केले आहेत.
वापर :
- मांजरी (भुकटी) १० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे.
- मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) २ ते ५ मिलि प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी किंवा ठिबकद्वारे २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
ट्रायकोडर्मा वापरताना घ्यावयाची काळजी :
- ट्रायकोडर्मा व रासायनिक बुरशीनाशके यांचा एकत्रित वापर (टॅंक मिक्स) करू नये.
- ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर थंड जागेत साठवावे.
कॉपरच्या अतिरिक्त वापरामुळे होणारी स्कॉर्चिंग :
सध्या तापमानात प्रचंड वाढ झालेली असून, वातावरणही कोरडे आहे. त्यामुळे बागांना कोणत्या रोगाचा धोका नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे द्राक्ष बागा हळूहळू फुटत आहेत. अशा स्थितीमध्ये कॉपरयुक्त रसायनांचा अतिरिक्त वापर केल्यास कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंगचा धोका वाढू शकतो.
त्यामुळे या वातावरणात कॉपरयुक्त रसायनांचा वापर टाळून मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. या दरम्यान अवकाळी पाऊस झाल्यास कॉपरयुक्त रसायनांचा वापर हा महत्त्वाचा ठरू शकतो.
लेखक - डॉ. सुजॉय साहा, ७०६६२४०९४६, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.