Manavlok Organization: शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारी मानवलोक संस्था!

मानवलोक (Manavlok) म्हटलं की, अंबाजोगाईचे (जि. बीड) (Beed) डॉ. द्वारकादास लोहिया (Dr. Dwarkadas Lohiya) हे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं.
Manavlok
ManavlokAgrowon

मानवलोक (Manavlok) म्हटलं की, अंबाजोगाईचे (जि. बीड) (Beed) डॉ. द्वारकादास लोहिया (Dr. Dwarkadas Lohiya) हे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं. ते बाबूजी या टोपणनावानेच जास्त ओळखले जात. दुसरी ठळक गोष्ट कोणालाही आठवते ती म्हणजे त्यांनी सुरू केलेलं पाणलोटक्षेत्र विकासाचं (Watershed Development) काम; जे आजतागायत चालूच आहे.

मानवलोकने विविध क्षेत्रांत अनेक घटकांसाठी काम केलेलं असलं तरी शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेलं काम ठळकपणे नजरेत भरतं. मानवलोकने याच कामाला का प्राधान्य दिलं, हे समजून घ्यायचं असेल तर डॉ. लोहिया कोण आहेत हे जाणून घ्यावे लागेल.

डॉ. लोहियांचे गाव अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा. तसे ते सुखवस्तु कुटुंबातील. ते शिक्षणासाठी अंबाजोगाईला आले. आठवी-नववीला असताना गणेशलालजी लखेरा यांच्यामुळे ते राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आले. ते सेवा दलाच्या शाखेवर जाऊ लागले. पुढे शाखा चालवू लागले. शालेय आयुष्यात सेवादलाशी आलेला त्यांचा हा संपर्क पुढील काळात अधिक वाढत गेला.

नांदेडला आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अंबाजोगाईत डॉक्टरकी सुरू केली. चळवळ्या स्वभावामुळे ते राजकारणात, समाजकारणात ओढले गेले. शेतकरी, शेतमजुरांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत संघर्षशील राहिले. एवढंच नाही तर त्यांच्या याच संघर्षवादी स्वभावामुळे १९७५ च्या आणीबाणीमध्ये त्यांनी १९ महिने कारावाससुद्धा भोगला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जनता दलाचे वारे होते. त्यावेळी त्यांना खासदारकीची उमेदवारी देऊ केली होती, पण कॉ. गंगाधरआप्पा बुरांडे हे ज्येष्ठ असल्यामुळे डॉ. लोहियांनी नम्रपणे नकार दिला.  

१९७२ च्या दुष्काळाची तीव्रता मराठवाड्यात अधिकच होती. लाखो शेतकरी, शेतमजूर रोजगार हमीच्या कामावर होते. एक कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना आयुष्यातून कसा उठवू शकतो, हे त्यांनी जवळून पाहिलं. शेतीसाठी काहीतरी भरीव काम करायला हवं, असं तेव्हाच त्यांनी निश्चित केलं.

केवळ पावसाच्या पाण्यावरची कोरडवाहू शेती बेभरवशाची होती. पाण्याअभावी हातचं पीक जात होतं. शेतीत असा पोळलेला छोटा शेतकरी पोटासाठी स्थलांतर करीत होता. तेव्हा ऊसतोडीपेक्षा बांधकाम कामगार, शहरी वेठबिगरीकरिता खूप मोठ्या प्रमाणात ‘डिस्ट्रेस मायग्रेशन' व्हायचं.

अद्याप बीड जिल्हा पूर्णतः दुष्काळमुक्त झालेला नाही; म्हणूनच तो ऊसतोड कामगारांसाठी कुप्रसिद्ध आहे. आजही एकट्या बीड जिल्ह्यातून सहा ते सात लाख ऊसतोड कामगार दरवर्षी स्थलांतर करतात. या कामगारात बहुसंख्य भूमिहीन शेतमजूर तसेच अत्यल्प व अल्पभुधारक शेतकरी असतात. हे चार-पाच महिन्यांसाठी स्थलांतरित होतात.

या स्थलांतराचा सगळ्यात मोठा फटका स्त्रियांना, लहान मुलांना आणि घरातील वृद्धांना बसतो. ऊसतोडीच्या कालावधीत स्त्रियांना किमान पंचवीस-तीस ठिकाणं बदलावी लागतात. लहान मुलं असली, पाळी आलेली असली तरी कामावर जावं लागतं. पाळीचा त्रास नको म्हणून स्त्रिया तरूण वयातच गर्भाशयाची पिशवी काढू लागल्या. त्याचे वाईट परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊ लागले.

मुलं शिक्षणापासून वंचित राहू लागली. मुलांचं बालपण कोमेजून जाऊ लागलं. घरातील कर्ता पुरूष व स्त्री स्थलांतरित होऊ लागल्याने कुटुंबातील वृध्दांकडं दुर्लक्ष होऊ लागलं. त्यांच्या वाट्याला एकलकोंडेपणा आला. ऊसतोडीचे काम करणारे बहुसंख्य पुरूष दारूच्या आहारी जाऊन त्यांच्याही प्रकृतीचे प्रश्न निर्माण झाले. स्थलांतरामुळे काम मिळालं, थोडा- फार पैसा मिळाला पण कुटुंबात अनेक समस्या निर्माण झाल्या.

आर्थिक स्थिती तर सुधारली नाहीच पण विविध सामाजिक गुंतागुंतीचे  प्रश्न तयार झाले. हे सगळं केवळ शेती पिकत नसल्यामुळे घडत होतं. शेती का पिकत नव्हती तर पाणी नसल्यामुळे. थोडक्यात या सगळ्या गुंत्यावर पाणी हेच एकमेव उत्तर होतं. हे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे, ते करायचं असा निर्धार डॉ. द्वारकादास लोहिया यांनी केला....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.) 

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com