
Raigad News : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची भीती आहे.
झाडाला आलेल्या कैऱ्या व मोहर गळून पडल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारनंतर ढग दाटून आले. संध्याकाळी सहानंतर अनेक भागात जोरदार वारा सुरू झाला. अलिबागसह काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाऊस पडला.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील कैऱ्या व मोहर गळून पडला. जिल्ह्यात आंबा लागवडीचे क्षेत्र जवळपास १२ हजार ५०० हेक्टर असून २० हजारांपेक्षा अधिक शेतकरी आंबा उत्पादक आहेत.पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पावसामुळे रोहे कोलाड मार्गावरील संभे गावजवळ भले मोठे झाड कोसळल्याने काहीकाळ रस्ता बंद होऊन वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मंगळवारी रोहे शहरात पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
भाजीपाला व्यावसायिक चिंतेत
भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहेत. या व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
मात्र ढगाळ वातावरणामुळे पांढरा कांदा, तोंडली, व अन्य भाजीपाला अडचणीत येण्याची, कीड रोगाचा प्रादुर्भावाची भीती शेतकऱ्यांना आहे.
विक्रमगडमध्ये आंबा बागायतदारांचे नुकसान
विक्रमगड : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी (ता. ६) तालुक्यातील काही भागांत अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. यामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली.
तसेच वीटभट्टी मालकांची दाणादाण उडाली. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडांना मोहर आला असून काही भागांत सुपारीच्या आकाराचे आंबे लागले आहेत. जोरदार पावसाच्या माऱ्याने लहान आंबे गळून पडले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.