न्यूनगंड सोडा

शहरातल्या अनेक आधुनिक गोष्टी गावाकडून आलेल्यांनी अगदी पहिल्यांदा बघितलेल्या असतात. त्या बघून उदासीनता येणे स्वाभाविक आहे.
न्यूनगंड सोडा
complexagrowon

शंकर बहिरट

गावाकडचा माणूस म्हणजे गावंढळ, बावळट असा समज शहरवासीयांचा असतो. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने गावाकडच्या तरुणांना शहरात जायची वेळ आली तर आपली गावाकडची भाषा, साधा पेहराव, शहरातल्या अनेक सुखसोयींबद्दलचे असणारे अज्ञान आणि त्या उलट शहरातला सगळा विरोधाभास बघून गावाकडचा तरुण अधिकच गांगरून जातो. त्याला आपल्या मागासलेपणाचा न्यूनगंड(Inferiority complex )पछाडू लागतो.
शहरातल्या अनेक आधुनिक गोष्टी गावाकडून आलेल्यांनी अगदी पहिल्यांदा बघितलेल्या असतात. त्या बघून उदासीनता येणे स्वाभाविक आहे. आपला मूर्खपणा उघडा पडला तरी चालेल, पण प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यास अजिबात लाजू नये. मोबाईल इंटरनेटमुळे आपल्या देशातीलच नव्हेतर बाहेरील देशातील माहिती घेणे सोपे झाले आहे. तरी सुद्धा प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी खूप वेगळ्या असतात. टीव्हीत,(TV) चित्रपटात अनेक वेळा लिफ्ट बघूनही शहरात पहिल्यांदा गेल्यावर मी लिफ्ट वापरताना घाबरलो होतो. तिथल्या लोकांचा लिफ्ट वापरत असतानाचा सराईतपणा बघून माझ्या अडाणीपणाची लाज वाटू लागली आणि लिफ्ट कशी चालते याची जिज्ञासा होतीच.
व्यावसायिक शिक्षण घेऊन लिफ्टची यंत्रणा दुरुस्ती व देखभाल करू लागलो. लिफ्टची भीती वाटणारा मी, लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका करू शकलो. न्यूनगंड बाळगला असता तर हे साध्य झाले नसते.

शहरातली गर्दी, तिथले लिखित अलिखित नियम, चौकातील रहदारी, मोठमोठ्या बिल्डिंग, फ्लॅट संस्कृती, घरातले चकाचक इंटेरिअर(Interior), टॉयलेट मधले कमोड, बाथरूममधले गार-गरम पाण्याचे शॉवर या सगळ्या गोष्टी गावाकडे नसतात. त्यामुळे गावाकडील लोकांना हे सगळे माहीत असण्याचे कारण नाही. ग्रामीण भागातील माणसाची गावंढळ म्हणून हेटाळणी करण्याआधी हे शहरवासीयांनी आधी समजून घेतले पाहिजे. तसेच ग्रामीण संस्कृती, शेती, वेगवेगळी पिके, विहिरी, तळी, पशुपक्षी, खुले आकाश, डोंगर, माळरान या सगळ्या गोष्टी शहरवासीयांनी टीव्हीत बघितल्या तरी प्रत्यक्षात मात्र ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागात आल्यावर त्यांच्यासाठी हे सगळे विलक्षण असते. शहरवासीयांचा ग्रामीण भागाबद्दल असणाऱ्या अज्ञानाबद्दलही अनेक विनोदी किस्से घडतात म्हणून शहरवासीयांचीही खिल्ली उडवणे योग्य नाही.
शहर असो वा गाव स्थलांतर केल्यावर कोणत्याही ठिकाणी स्थायिक व्हायचे असेल तर तिथल्या संस्कृतीशी, वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. त्यासाठी कोणतीही न्यूनगंडाची भावना असून चालत नाही. लोक मला मूर्ख समजतील मी कसे विचारू, असा संकोच बाळगला आणि आपल्या हातून काही चूक झाली, तर त्रास होतोच शिवाय लोकांचे हसू होते. आपली खिल्ली उडवली जाते. अज्ञान लपवण्याने लपत नाही. अज्ञान मान्य केल्याने मात्र प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com