फालतूः विकास गोडगे यांची अफलातून कथा

कॉलेजचा सातवा दिवस असेल. पदवीच्या तिसऱ्या वर्षात नवीन प्रवेश घेतला होता. मी सकाळी सकाळी सात वाजता हातात एक पुस्तक फिरवत वर्गात प्रवेश केला आणि तडक शेवटच्या बेंचवर जाऊन भिंतीला टेकून बसलो.
Vikas Godge Story
Vikas Godge StoryAgrowon

लेखक- विकास गोडगे

कॉलेजचा सातवा दिवस असेल. पदवीच्या तिसऱ्या वर्षात नवीन प्रवेश घेतला होता. मी सकाळी सकाळी सात वाजता हातात एक पुस्तक फिरवत वर्गात प्रवेश केला आणि तडक शेवटच्या बेंचवर जाऊन भिंतीला टेकून बसलो. जाताना आपल्या उजव्या बाजूला पाचसहा मुलींच्या घोळक्याकडे आपले लक्ष नाही हे दाखवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागली, तशा अभिनयाची सवय झालेली असल्याने आता त्यासाठी विशेष कष्ट करण्याची गरज पडत नव्हती. भिंतीला टेकून समोरच्या मुलींकडे एक नजर टाकली.

हातात पुस्तक असल्याने आपण फक्त मुलींकडेच बघतोय असा लोकांचा गैरसमज न होऊ देण्यासाठी हातातील पुस्तकाचा वापर होनार होता. आणि जरी गैरसमज झाला तरी वर्गात मी एकटाच मुलगा असल्याने जास्त फरक पडनार नव्हता. मी हातातील एकुलत्या एक पुस्तकात डोके घातल्याचे नाटक केले. डावीकडे पाच-सहा मुली येऊन बसल्या होत्या आणि उजवीकडे मुलांपैकी अजून एकानेही हजेरी लावलेली नव्हती. लवकर उठून खोलीवर काय करायचे म्हनुन मी एकटाच वर्गात पोहोचलेलो होतो. खोलीवर तसं  शेजारच्या काकू सकाळी सकाळी झाडताना करमणूक होते पण कॉलेज नवीन असल्याने कॉलेजचे पण आकर्षण होतेच.

Vikas Godge Story
Diwali Celebration : दिवाळीच्या कपड्यांनी शिकवलेलं शहाणपण

तर अशा प्रकारे वर्गात मी एकटाच आणि डाव्या बाजूला समोर पाच सहा मुलींचा घोळका. आता पाठीमागे बसून पाठीमागून मुली कशा दिसतात हे बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे स्त्रिया फक्त पुढूनच सुंदर दिसतात हा खूप लोकांचा गैरसमज असतो. प्रत्येक स्त्री कोणत्याही कोनातून सुंदरच दिसते यावर माझा प्रचंड विश्वास आहे किंवा या अखंड विश्वात स्त्रीशिवाय सौंदर्याची कल्पना पण केली जाऊ शकत नाही. काही क्षण गेले. मी कधी पुस्तकात, तर कधी मुलींकडे बघत होतो. पुस्तकावरील कव्हर भारी होते. म्हणजे ते पुस्तक आमच्या आईने बघितले असते तर असले घाणेरडे पुस्तक घेऊन फिरतो काय म्हणून मला चांगलंच झोडलं असतं आणि पोरगं बिघडलं म्हणून आईने आईलक्ष्मीआईला “सोळा शुक्रवार करते पोरगं सुधरू दे” असा नवस केला असता.

आणि हेच पुस्तक बापाने बघितले असते तर ते पुस्तक अभ्यासक्रमाला आहे हे जाणून न घेता, “ह्या आयघाल्याकडून मला दुसरी काही अपेक्षाच नव्हती” असे म्हणून बापाने आईलाच अजून दोनचार शिव्या दिल्या असत्या. सबब....त्या पुस्तकाच्या कव्हरवरील सुंदर सुडौल अशा गोऱ्या बाईची उघडी छाती आणि कधी कधी वरती तोंड करून त्या घोळक्यातला सगळ्यात भारी माल कोणता आहे, असे माझे दुहेरी निरीक्षण चालू होते.

मागून दिसणाऱ्या पैकी एक मुलगी जरा चलबिचल करत होती असे मला जाणवले. ती ताडकन वळली आणि तिचे मागचे लांब सडक पाठीवर लोळणारे केस पुढे आले, तिचा गोल चेहरा, मोठे डोळे आणि आत्मविश्वासयुक्त नजर मला दिसली. तिच्या चालीला काहीतरी अर्थ आहे असे मला जाणवले. तिला अगोदर पण वर्गातच पाहिले होते पण इतके जवळून पहिल्यांदाच पाहत होतो. पाहत होतो म्हणण्यापेक्षा निरीक्षण करत होतो.

चालताना थोडी हलणारी कंबर आणि एकूणच सुडौल बांधा सांभाळत सांभाळत ती माझ्या दिशेने चालू लागली. पाठीमागे मी एकटाच असल्याने, अर्थात ती माझ्याकडेच येत होती. उगीच माझ्या छातीच ठोके वाढल्याची जाणीव झाली. म्हणजे मी घाबरलो अशातला भाग नाही पण बोलायचे काय? आपला इनशर्ट ठीक आहे का? चेन लावली आहे का? साला बूट घ्यायला वडील पुढच्या महिन्यात पैसे देतो म्हणाले होते, हि सत्तर रुपयांची चप्पल इज्जत घालवते असले सगळे विचार फकस्त अर्ध्या सेकंदात माझ्या मनात येऊन गेले असतील.. ती अख्खीच एवढी सुंदर होती कि तिचा चेहरा पाहावा, तिचे केस पाहावे कि तिचा तो सुडौल बांधा पाहावा हेच कळत नव्हते. म्हणजे आपण काही सेकंदात किती आणि काय काय पाहू शकणार याला पण मर्यादा असतात. मी तोंडावर एकोणआंशी सशाची व्याकुळता, इनोसन्स, आणि सभ्यपणा आणून तिच्याकडे बघू लागलो.  पण मनात ‘भैन्चोद कसला माल आहे हा, हि असली आपल्याला भेटली तर सुरुवात कुठून करायची तेच कळणार नाही” असंच होतं. 

“मोल फ्ल्यांडरय काय?’

“हो”

“चांगलीय कादंबरी” 

“होका, पण सरांनी आजून शिकवायला घेतली नाही?” 

“मी वाचलीय”  हे ऐकून मी चक्कर येवून पडायचाच राहिलो होतो.....कारण त्या पुस्तकाचे कव्हर वोलांडून आत घुसायला मला कोणतेही चांगले कारण सापडत नव्हते आणि आत गेलो असतो तरी त्यातील एकाहि पूर्ण वाक्याचा अर्थ मला लागला नसता याची खात्री होती. पण मुलींच्या प्रतिभेवर आपण पहिल्या पासून विश्वास ठेवत आलोय. 

Vikas Godge Story
Dairy Production : दूध उत्पादन वाढीसाठी सिंधुदुर्गात ‘आनंद पॅटर्न’

“बघू ते पुस्तक....’

मी हात थरथरत ते पुस्तक तिच्या हातात दिले......

“तुम्ही सिरसावचेच का ?” तिने माझ्या डोळ्यात डोळे घालत ......आणि पुस्तकाशी चाळा करत विचारले 

“हो मी सिरसावचाच, तुम्ही पण सिरसावच्याच दिसताय, आडनावाहून विचारलं मी ?” 

“हो आम्ही पण, पण मी लहापणापासून इथेच वाढले, गावच्या लोकांना येवढं वोळखत नाही, आमचे वडील इकडेच शिक्षक आहेत” 

“आपण आपल्या गावच्या लोकांना नाही ओळखले तरी ओळखत असतो, मीपण लहाणपणीपासून बाहेरच आहे कि” 

“म्हणजे तुम्हाला माहित होते तर कि मी तुमच्या गावची आहे?”

“तर......! मुलींची तेवढी खबरबात ठेवतो मी “ आता थोडा आत्मविश्वास वाढला होता ......

“वाह वाह भारीच वोळख निघाली” 

तेवढ्यात वर्गातील गर्दी वाढली होती आणि सगळी मुले आमच्याकडेच बघत आहेत याची जाणीव मला झाली. तिला त्याने काही फरक पडला असेल असे वाटले नाही. 

“चला, भेटू.....कधीतरी निवांत ....’ ह्या तिच्या वाक्याने मला त्या गर्दीत सुद्धा कसंतरी झाल्याचं चांगलं आठवतंय.

ती बिंधास्त गेली आणि आपल्या जाग्यावर बसली. मी तसंच तिच्याविषयी विचार करत चार तास सलग लेक्चर केले. नंतर ती एकदा तरी पाठीमागे वळून बघेन हि आशा होती, पण तिने सलग चार तास अजिबात वळून पाहिले नाही. मला उगीच चार तास सलग लेक्चर केल्याचे वाईट वाटले. गरज नसताना काही गोष्टी केल्या कि जसा आपल्याला पश्चाताप होतो, तो मला झाला. 

तो पूर्ण दिवस आणि रात्रभर मेरे मनमे लड्डू फुट रहे थे. पण एक भीती पण वाटत होती, आपल्या आयुष्यात असले शॉट खूप होऊन गेलेत पण त्यातून उत्पादक असे काही होणे सोडा पण अशा प्रेम कहाण्या तिथेच संपून पण गेल्या होत्या. हि पण आपली नुकतीच जन्म घेण्याच्या उंबरठ्यावर असलेली प्रेम कहाणी अभ्रकावस्थेत संपू नये यासाठी मनोमन देवाची प्रार्थना पण करत होतो. 

“पुढच्यासं ठेच मागचा शहाणा’ लोक म्हणतात म्हणजे हे खरेच असले पाहिजे. इथे तर साक्षात मलाच ठेचा लागल्या होत्या. उदाहरणार्थ गेल्या वर्षी, या अगोदरच्या कॉलेजला असताना सकाळी राज्यशास्त्राचा तासाला मी वर्गाच्या दरवाज्यात असलेल्या बाकड्यावर बसलेलो असायचो. अख्ख्या वर्गात इनशर्ट केलेला आणि मिशा काढलेला मी एकटाच होतो. त्यामुळे पोरं माझ्या जातीवर संशय घ्यायची पण आपल्याला त्याची चिंता नव्हती. सर शिकवत असताना समोरच्या वर्गाच्या पायरीवर तीन मुली येऊन बसल्या आणि टाईम पास म्हणून मी त्यातली एक निवडली. मग त्या मुली दररोज नेमक्या राज्यशास्त्राच्या तासालाच समोरच्या पायरीवर येऊन बसू लागल्या. त्यातली मी निवडलेली ती मस्तच लाईन वगैरे पण देऊ लागली. आता बाकीच्या दोन मैत्रिणी तिच्या साथीदारनी बनल्या होत्या. मी वर्गातून एकटाच तिच्याकडे बघत असे आणि ती माझ्याकडे. आमचे आठवडाभरातच चांगलेच जमले. म्हणजे एकमेकाकडे बघून हसणे, खानाखुणा करणे वगैरे वगैरे म्हणजे लाईन मारताना जे सोपस्कार करावे लागतात ते आम्ही दोघे इमाने इतबारे करू लागलो. मग एके दिवशी ती उठली, तिच्या मागच्या वर्गात गेली, आत भिंतीवर जाऊन मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिले. बाहेर आली आणि मला खुणावले आत काय लिहिले आहे ते वाच. मी माझा क्लास संपल्यावर बघितले तर मोठ्या अक्षरात भिंतीवर “I Love you” होते. आता हे असले एवढ्या कमी गुंतवनुकीत इतके छान रिटर्न ऑन इंवेस्टमेंट भेटल्यावर कोण खुश होऊन अधीर होणार नाही. मी शून्य मिनिटात हवेत गेलो आणि तिच्या गावच्या माझ्या मित्रांना बस स्त्यांड वर गाठून तिचे नाव वगैरे विचारले. आणि मग ते सगळे एकाच बसने त्यांच्या गावाला गेले होते. दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर त्या समोरच्या वर्गात लिहिलेल्या  “I love you मधून you खोडून India झाले होते. चला साला गडबड भोवली म्हणून हा अनुभव अक्कल खाती जमा केला होता. आता तसे होता कामा नये म्हणून जरा काळजी घ्यायला पाहिजे असे ठरवलं. 

तो दिवस तसाच गेला आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच वेळी त्याच आशेने लवकर येऊन बसलो. तसाच मी एकटा आणि बाजूला तिच्या सहित पाच सहा मुली होत्याच. ती माझ्याकडे बघणार तेवढ्यात दहा बारा मुले वर्गात, भाई लोक घुसतात तसे घुसले, माझ्या कडेने येऊन उभा राहिले. मी ज्या बेंचवर बसलो होतो त्या बेंचवर पाय ठेवून तिघे आणि बाकीच्यांनी गोल करून मला रिंगणात घेतलेले. 

“कुठलायरे मुछमुंड्या?’ आमच्या विषयाचा नसलेला आणि दुसऱ्या वर्गातील असलेला एक दादा बोलला ...

“सिरसाव.........” 

“जायचंय का नीट गावाकड कि पोत्यात भरून पार्सल करावं लागंलं?

“आहो पण काय झालं?”

“वर्गात नीट राहत जा, आलाय शिकायला, शिकायचं, हिकडं तिकडं बघायचं नाही, नाहीतर सगळं स्पेअर पार्ट पोत्यात घालून घेऊन जावं लागतील” 

मग एकजनाने अजून एकदा माझ्या हनुवटीला चार बोटाने वरती उचलून अजून डोस दिला,’काय शिकायला आलाय, शिकायचंच, बाकी धंदे नाही करायचं!’’’’’

हे असले काय मला नवीन नव्हते पण एकदम अनपेक्षित घडले होते. हे का घडतेय, कशामुळे हि माझ्या वर्गातीलच मुले मला मारायला का आली, हे मला काहीच समजत नव्हते. किंवा तिथपर्यंत माझा विचार पण जात नव्हता. 

पण हे सगळं घडत असतान ती माझ्याकडे खूप सहानभूतीने वगैरे बघतेय असं मला जाणवत होतं. एकूण प्रसंग बाका होता. काहीका असेना, अशा परिस्थिती आपण जर झुकलो तर संपलो आणि आता इज्जतीचा सवाल होता. मी ताबडतोप बार्शीतील एका राजकारणी नातेवाईक मित्राकडे गेलो. तो नातेवाईक मित्र आणि शहरात गाजलेला पेहलवान यांनी मला घेऊन उघड्या जिप मधून कॉलेज मधे प्रवेश केला. एकदम फिल्मी स्टाईल. मग आम्ही तिघांनी त्या दहा बारा जणांना वर्ग चालू असताना बाहेर बोलवून घेतले, वर्ग बंद पडला. आता ह्या नातेवाईक मित्राला जवळ जवळ सगळं शहर वोळखत असल्याने कॉलेजच्या आवारात बरीच गर्दी झाली. आम्ही तिघे मधे उभा आणि ती दहा बारा पोरं म्हणजेच गुन्हेगार आमच्या बाजूने उभे.  माझ्या नातेवाईक मित्राने सगळ्या समोर त्यांच्या मधील म्होरक्याच्या कानाखाली जाळ काढण्याची आज्ञा दिली, मी आजून त्याच्याकडे बघून खरेच मारू का म्हंटले तर तो म्हणाला “तु त्याला मारतोस कि मी तुला मारू ?” असं म्हणताच मी त्या भाईच्या कानाखाली एक जाळ काढला.  

जाताना नातेवाईक मित्राने त्यांना, “इकास आपला माणूसय, पुन्हा जर त्याला त्रास दिला तर रेल्वे रुळाच्या कडेकडेने तुम्हाला तानुतानू मारीन, सांगून ठेवतो” असा दम दिला आणि ते गेले . 

तिसऱ्या दिवशी. त्याच वेळी मी वर्गात एकटाच लवकर आलो, ती पण लवकर आली होती. मी तसंच पाठीमागे बसलो, ती तशीच पाठमोरी होती ती पाठीमागे वळली. तिचे केस अजून ओले आणि रिकामे होते ते तिने पाठीमागे घेऊन बांधले. ज्याला तिच्या केसातून गळनाऱ्या हे पाण्याचे टपोरी थेंब व्होटानी अलगद उचलून त्यांची चव बघायला भेटेल तो खरंच नशीबवान असेल असले काहीबाही विचार माझ्या मनात गोंधळ घालत असताना तिच्या आवाजाने मला तीन सेकंदभर लागलेली तंद्री उडाली......

“बरं केलं काल त्या मुलांना धडा शिकवला, मला उगीच त्रास देत आहेत ती मुलं दोन वर्षा पासून” 

“हेहे आता नाहीत देणार त्रास, नाहीतर त्यांच्या घरातून काढून बदडून काढू आपण, त्यांना समजलेय आपण कोण आहोत ते”.  मी एकदमच दुसऱ्याच दिवशी “आपण” वर वगैरे आलो होतो .......

थोडक्यात हे काम लय व्यवस्थित पार पडले होते. तिने माझे पुस्तक परत दिले आणि आमच्या दोस्तीला सुरुवात झाली. कॉलेज सुटले कि आम्ही क्यांटीन वगैरे मधे भेटू लागलो. तिच्या एकदोन मैत्रिणी कधी माझे एकदोन मित्र वगैरे. नंतर हळू हळू दोघेच भेटू लागलो. पण बार्शी शहरात आमच्या सारख्या लोकांना भेटण्यासाठी खूप खर्च येतो त्याची जाणीव झाली. म्हणजे प्रत्येक वेळी कोल्ड्रिंक्स हौस मधे भेटणे म्हणजे खर्च. अगोदरच वडील, त्यांच्या पगारी बंद असताना कसेतरी शिकवत होते आणि त्यात हा खर्च वाढला. पण पर्याय नव्हता. बरे नुसता खर्चाचा प्रश्न असेल तर ठीक आहे पण निमशहरी विभागात प्रेमाळू लोकावर किती मानसिक आत्याच्यार होतो आणि किती घुसमट होते हे ज्यांनी ते भोगलंय त्यांनाच ठाऊक.  

अशीच दिवसेंदिवस मैत्री वाढत होती, तसे बऱ्याच वेळा आम्ही कॉलेज मधे आणि बाहेर भेटलो असू. आता ती माझा उल्लेख तिच्या मैत्रिणीमधे आणि वर्गात उघडपणे मित्र म्हणून करू लागली होती. वर्गात पण बर्यापैकी आम्ही मित्र आहोत म्हणजे आमचे लफडे आहे हि अफवा म्हणा किंवा बातमी म्हणा पसरली होती. हे प्रकरण एकूणच वाढले आहे म्हटल्यावर मी पण धाडस केले आणि एके दिवशी कॉलेज मधे वडाभाजी खाताना वाटीतील वडा, रस्स्यामधे स्टाईलने दोन चमच्यानी कुसकरत तिला आत्मविश्वासाने म्हणालो, ”खरं सांगू अनिता, माझं तुझ्यावर प्रेम आहे”

तर ती अनपेक्षितपणे एकदम शांत झाली, ‘जरा थांबली आणि म्हणाली,”मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलेच नाही आपण चांगले मित्र आहोत, मित्रच राहू” 

हे ऐकताच माझा त्या वड्यावरील आणि तो मिसळलेल्या तर्रीवरील जीवच उडाला. आता अजून काही दिवस मला नियमाने जेवण वगैरे जायला नाही पाहिजे असे मनात आले. मला काय बोलावे समजेना गेले. मी त्याकाळी सिगारेट पण पीत नव्हतो, नाहीतर अजय देवगण सारखी लगेच सिगारेट काढून पेटवली असती. काही क्षण असेच गेले.....म्हणजे आता काय करायचे असते हे मला माहित नव्हते......

जरा थांबून तिने दुसरा बॉम्ब टाकला. 

“आणि आमचे पप्पा माझ्यासाठी इंजिनीयर डॉक्टर, आय ये एस, नवरा बघत आहेत, मी तुझा विचार पण करु शकत नाही” शेवटी “मी तुझा विचार पण करू शकत नाही” हे वाक्य तिने “तुझी लायकी काय आहे ती बघितली का” ह्या वाक्याच्या ऐवजी वापरल्यासारखे मला वाटले. मला त्याकाळी तिने माझी लायकी काढली याची जाणीव पण झाली नव्हती कारण तिच्या प्रेमात मी अखंड बुडालो होतो. 

काळ गेला. हळू हळू आमच्यातील संवाद कमी झाला. म्हणजे एखाद्याच्या मनात आपल्या विषयी काहीच भावना नसेल आणि इतर चार पाच मित्रासारखे आपण पण तिचे मित्रच आहोत असे ती म्हणत असेल तर तिच्यासाठी वेळ घालावायला माझ्याकडे वेळ नव्हता. तोच बहुमूल्य वेळ मी मित्रां बरोबर घालवू शकत होतो. कारण आपल्याला समोरच्या व्यक्तीविषयी जे वाटते तसे सामोरच्या व्यक्तीला न वाटणे आणि तरीही आपण ते बरोबरी नसलेले नाते टिकवायचा प्रयत्न करणे जगातला सर्वात मोठा मूर्खपणा असतो. 

तिला स्वतःपासून दूर करत होतो पण मनातून दूर होत नव्हती. हळू हळू कॉलेज मध्ये पण समजले कि माझं आणि तिचं काहीतरी बिनसलं आहे. मग ती एका दोन-तीन मुलं आणि तीन-चार मुली असणाऱ्या कुल ग्रुप मध्ये सामील झाली आणि माझा फक्त नर लोकांचा एक ग्रुप तयार झाला. ती कधी कधी थांबून मला बोलायची तेव्हा तिच्या ग्रुप मधील एक नर दपकायचा पण मी जास्त वेळ घेत नाही हे बघून त्याला  बरे वाटत असावे. शेवटी दोन नरामधील स्पर्धा कधी चुकलीय का?. 

परीक्षा झाली. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी भेटली. काही काळ थांबून तिचा हात हातात घेतला. काही क्षण थांबून तिने हळूच काढून घेतला आणि मग मी पण हात चोळण्याचे नाटक केले. मला समजले होते कि तिच्या ग्रुप मधील एका शांबूळ पोराला ती असेच कधीमधी बाहेर भेटते. मला त्याला बदडायला आवघड नव्हते पण त्यात काय मजा नव्हती. 

झालं......

मी पुढच्या शिक्षणाला बाहेर गेलो. नंतर काही महिन्यांनी तिचे लग्न कोणत्याही इंजिनीअर, डॉक्टर किंवा कलेक्टरशी लाऊन न देता गावातील एका बागायतदाराशी लाऊन दिल्याचे आमच्या दोस्तांनी खास खुश होऊन सांगितले. नंतर कॉलेजला असताना तिची सहज कधी आठवण आली नाही किंवा कधी मिस केले नाही. आनंद फक्त एका गोष्टीचा होता कि बोअर झाल्या नंतर आपल्यापण आयुष्यात काहीतरी दु:ख आहे ज्याची आठवण काढून आपण आपला वेळ घालवू शकतो. काळजाला घर करणारी एक सुंदर आठवण देऊन गेली होती ती. एवढंच. अगदीच तिच्या केसांचा सुगंध घ्यायची, तिच्या वोल्या केसातून ओघळणारा तो टपोरी थेंब व्होटावर घेऊन वगैरे वगैरे स्वप्ने अपुरीच राहिली. पण आपल्या सगळ्याच इच्छया पूर्ण थोड्याच होणार आहेत हे मला चांगले ठाऊक आहे. आता इथून नवीन कॉलेज मधील नवीन पोरी पण भारी होत्या पण ती जुनी आठवण मी तशीच कुठं तरी कोपऱ्यात जपून ठेवली होती. सवयच असते माणसाला, नाही मिळालेल्या गोष्टीत अडकून बसायची. 

कॉलेज संपल्या नंतर सगळी मुले आपापले रस्ते निवडतात आणि नंतर राहतात त्या फक्त आठवणी, हे खरं असलं तरी नियतीने तिला शेवटी माझ्याच गावात आणून सोडलं होतं. जशीकाय तिला कायम माझ्या डोळ्यासमोर ठेवण्याची नियतीची इछाच होती किंवा तिला आणि मला दोघांना त्रास द्यायची इच्छा असावी. 

असाच काळ जात होता. मी वर्षातून तीन चार वेळाच गावी जातो. आमच्या रानात जायच्या रस्त्यावरच तिचे घर असल्याने मला तिथूनच जावं लागतं. बऱ्याच वेळा ती बाहेर दिसे पण तिने नजरेला नजर कधी दिली नाही, मी पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिलं तेव्हा ती अंगणातच काही तरी काम करण्याचे नाटक करत असल्याचे मला भासे. किंवा छतावर जाऊन मलाच बघतेय असा मला भास व्हायचा. मी मागे वळून पाहिलं कि ती छतावरच असायची पण तिचे तोंड माझ्या विरुद्ध दिशेला असायचं. बाकी एवढंच. एकदातरी तिच्या नजरेत बघावं तिच्या नजरेतून तिला समजावून घ्यावं, तेव्हा स्वप्नाच्या दुनियेत जगणाऱ्या तिचे आताचे आत्मरंग मला बघायचे होते. कशासाठी माहित नाही. म्हणजे ती सुखी आहे का? ती सुखी असेल तर मला दु:ख झाले असते का? आणि समाधानी नसेल तर मला आसुरी आनंद झाला असता का, माहित नाही. पण कधीच न डोक्यात येणारी रानात जाताना मात्र कायम डोक्यात असायची. म्हणजे ती एकटीच डोक्यात घेऊन तिच्याच विचारात मी चालत चालत रानात पोहचत असे. त्या विचाराला कसलाही डिस्टर्ब नको म्हणून मी सहसा एकटाच चालत रानात जात असे. तेव्हा फक्त मी आणि माझ्या मनातील ती असे. शेतात पोहोचून त्या आमच्या लहानपणीपासून मोठ्याच असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली मी एकटाच बूट उशाला ठेवून डोळे झाकून रानातील विविध आवाज कानात साठवत डोळे झाकून पडत असे. 

उन्हाळ्यातील सुगी संपलेली असल्याने रिकामी झालेली रानं, कुठेतरी चुकून कुणाची तरी ज्वारी करायची राहिलेली ती करत असलेल्या मळणी यंत्राचा आवाज त्या रानातील शांततेला भंग करत आहे. काही काळानंतर तो ज्वारीच्या मळणीयंत्राचा आवाज त्या रानातील शांततेत इतका मिसळून जातो कि कानाभोवती फिरणाऱ्या माशीचा आणि लिंबाच्या शेंट्याला मध गोळा करून घेऊन येऊन आपले छत थापनाऱ्या मधमाशांचा सुद्धा आवाज कानावर पडू लागतो. रानातील त्या शांततेचा आणि एकांततेची अनुभूती घेत असताना, डोळे झाकून तिचा विचार करता करता मला जाणवते कि ती हळूच मागून आली आहे आणि शांतपणे आपल्या पैंजनाचा आणि बांगड्याचा सुद्धा आवाज न करता माझ्या छातीवर डोके टेकउन पडली आहे. अगदी तोंडातून एकही शब्द न काढता, तिच्या केसांची चादर माझ्या चेहऱ्यावर पसरली आहे आणि माझ्या छातीला तिच्या फक्त गरम श्वासांची कोमट जाणीव होत आहे आणि त्यातून आवाज येत आहे कि . “काही बोलू नको, बोलायची काही गरज आहे का? काही गोष्टी बोलायच्या नसतात, जगरहाटीच्या भाषेत त्या गोष्टींचा अर्थ पण शोधायचा नसतो. त्या गोष्टी फक्त असतात त्यांची  अनुभूती घेऊन तिथेच सोडून पुढे जायचं असतं.....................” 

“बापू जागा हाय का झोपलायस रं?” असंच स्वप्नांच्या दुनियेत नुकतंच फिरायला चालू केलं असताना एकदम आईचा आवाज येतो आणि मी खऱ्या दुनियेत येतो .............आई डोक्यावरची पाटी खाली ठेवत लिंबाच्या सावलीला बसत पाटीतील कळशी आणि भाकरी खाली काढून ठेवते आणि मी अनिताला विसरून जातो. हि आठवण वगैरे मी गावी गेल्यावर ती दिसली वगैरे म्हणूनच, बाकी कधी विशेष नाही. 

गेल्या दिवाळीत गावी गेलो तेव्हा, बार्शीहून रात्री बारा वाजता आम्ही दोन तीन मित्र गावी परतत असताना चावडीत पोचलो. चावडीतच आमच्या मित्राचे म्हणजे चंद्याचे इंग्रजी, देशी आणि हातभट्टी “जोजे वांछील तोते लाहो” विकणारे दुकान होते. तो ते बंदच करणार होता तेवढ्यात आम्ही तिथे पोचलो आणि थांबून सिगारेट मागितली. चंद्याने तीन-चार गोल्ड फ्लेक दिल्या आणि म्हणाला ..

“इकास तेवढं तुमच्या भाऊचं बिल देकी लका, पाच हजार झाल्यात” 

“तुझ्या आयला कायबी बोलतो काय? दाखव कुठं लिहून ठेवलंय ?” मी म्हणालो ...

“आरं तुझं भाऊ, घरच्या दुकाना सारखं कधीपण येऊन कायपण आणि कितीपण पिऊन जात्यात, टिपून ठीवायला कुणाला सवडय, देऊन टाककि, आता बार्शीत एका बसनीला पाच हजार उडवून आला असशील कि!” 

चंद्याने लयच योग्य वेळ गाठली होती, त्याला खिशातून पैसे काढून दिले आणि निघणार तोच तो म्हणाला,”इकास तेवढं आबासाहेबांना घरी सोडरं, लयच हालता येईनाय त्याला” 

बघितलं तर अनिताचाच नवरा होता. त्याला हलता पण येत नव्हते. आम्ही दोघांनी उचलून त्याला कारमधे टाकला आणि घेऊन त्याच्या घरी आलो. 

तो गाडीमध्ये सारखं, “इकासराव तुम्ही माझ्या भावा सारखं हाव” असं म्हणत होता आणि मला उगीच शंका येत होती कि याला माहित तर नाही ना ? तसे माहित असायला आमच्यात काहीच नव्हते पण मनात भरपूर काही असल्याने तशी भीती वाटत असावी. 

त्याचे घर गावच्या कडेला होते. घराबाहेर गादी थांबवली आणि उठलो तर लक्षात आले कि ती जागीच असावी त्याची वाट बघत. त्याला चालता येत नव्हते, दोघांनी धरून मी दरवाजावर थाप मारण्याच्या अगोदरच दरवाजा उघडला. मी तिच्याकडे न बघता तिच्या नवऱ्याला आत मधे घेऊन गेलो, मित्र बाहेर गेला. त्याला खाली परवरावर सोडले. तो तिला म्हणत होता “आगं इकास रवाना चहा करकी, आगं करकी, आपल्या घरी कधी येत्यात का ते”. 

काही क्षण गेले, मी तिच्याकडे वरती तोंड करून डोळ्यात डोळे घालून बघायचे धाडस केले. माझे प्रेम असलेले तिचे केस तिच्या पदराआड लपले होते, तिच्या डोळ्याच्या कडेला काळी वर्तुळे पडल्याने चेहरा थोडा निस्तेज दिसत होता पण नजरेत तोच आत्मविश्वास होता. शरीर तेव्हासारखे सुडौल नसले तरी आकर्षक होते...काही क्षण मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा प्रयत्न केला पण धाडस झालं नाही. आणि एका क्षणातच घराबाहेर पडून गाडीत बसून स्टार्टर मारला. सगळं माहित असलेल्या मित्राने विचारले,” काय म्हनालीरे?” 

मी म्हणालो, “ तु इतका फालतू माणूस असशील असं वाटलं नव्हतं, असं म्हणाली” 

होय तिच्या नजरेत तोच अर्थ होता...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com