
- संतोष डुकरे
भिरर्रर्रर्रर्रर्रर्र येssssssss आली आली आली काय आली? तुमच्या आमच्या करमणुकीसाठी अमूक तमूक तालुक्यातील एक रंगीत आणि संगीत बारी आली मित्रांनो. झालीssssssss वारे रे शाबास... हान हान घोडी हान. टाक टाक उचल की टाक. छान... छान ! सेकंद १४. गेलेला गाडा १४ सेकंदमध्ये गेलेला आहे मित्रांनो...
सेकंद ऐकले न ऐकले तोच निशाणापासून गाड्यामागं बैल धरायला पळत सुटायचं. कधी कधी गाडा लवकर अडतो. थांबतो. नाही तर दोन-तीन किमी वाट फुटेल तिकडे बैल धुम्माट पळत रहायचे. मोटारसायकली सुटायच्या. आडवं होऊन गाडा थांबवायचा. बैल मोकळे करायचं आणि घराकडं निघायचं. काही वर्षापूर्वींची ही स्थिती.
नंतर अनेक ठिकाणी शासकीय पैशातून घाटांची कामं झाली. गाडा माणसांमध्ये वळून होणारी चेवकाचेवकी कमी झाली. घाटापुढे बांध घातले, बैलं मोकाट पळायची बंद झाली. पण अपघात, हाल संपले नाहीत.
प्राणीमित्रांच्या तक्रारी, त्यानुसार वेळोवेळी झालेले न्यायालयीन निर्णय, आता केंद्र सरकारने घेतलेला बैलगाडा शर्यतींबाबतचा निर्णय, त्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती, त्यानंतर केरळ, महाराष्ट्राने केलेली कायदादुरूस्ती, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या दुरूस्त्या वैध ठरवल्यामुळे अखेर बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
अडीचशे-तीनशे वर्षांची परंपरा
बैलगाड्याची परंपरा तशी फार जुनी. पाळं मुळं शोधत गेलं तर अडीचशे-तीनशे वर्षापूर्वीपर्यंत धागेदोरे जातात. कुठे गाडीत उभं राहून बैल पळवतात तर कुठं चार बैल लावून लहानसा गाडा धावपट्टीवर मोकाट पळवतात. चार बैली गाड्यांच्या शर्यती पश्चिम महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांची पिढ्यानपिढ्यांची परंपरा, संस्कृती, शौक, छंद, मैदानी मर्दानी खेळ आणि बरंच काही यात सामावलेलं आहे.
पुर्वी टिव्ही, रेडीओ, वर्तमानपत्र नव्हती. किर्तन, भजन, तमाशा याबरोबरच राकट मनाला, माणसांच्या आणि जनावरांच्याही ताकतीला साद घालून दाद देणारे खेळ नावारुपाला आले. बहुतेक ठिकाणी यात्रा-जत्रांमध्ये प्रबोधन, करमणूक व खेळ यांची सांगड घालली जाई. शेतकऱ्यांचा जीव जनावरात.
मग आपली जातीवंत, दिलदार, कलंदर जनावरे एकमेकांना दाखवून, त्यांचे गमतीदार खेळ करुन, झुंजी लावून शेतकरी त्यात आनंद घेऊ लागले.
जगभराच्या शेतकरी जीवनाचा हा इतिहास आहे. देशातही सर्वत्र शेतकऱ्यांच्या पारंपरिक उत्साहांमध्ये, खेळांमध्ये प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मग दक्षिणेतील बुल फाईट असेल, महाराष्ट्रातील बैल गाडे किंवा उत्तर भारतातील कोंबड्यांच्या झुंजी.
इतर अनेक गोष्टी पद्धतशीरपणे सुरु असताना बैल गाड्यांच्याच बाबत कोठे माशी शिंकली आणि जनावरांच्या छळावरुन शर्यतींवर बंदी घातली गेली. बैलगाडा शर्यती ही परंपरा आहे, संस्कृती आहे म्हणून त्यावर बंदी घालू नये असाही अनेकांचा दावा आहे.
राजकारणीही त्याची री ओढत शर्यती सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करताहेत. थोडी आशा दिसली की लगेच श्रेय लाटण्यासाठी आटापिटा करताहेत. पण बैलगाडा शर्यंतीचे जे स्वरुप आज आहे खरेच ती आपली परंपरा आहे का? खरंच अशा प्रकारे शर्यती होण्याची गरज आहे का?
बैलगाडा शर्यतींचे बाजारीकरण
गेल्या २५-३० वर्षांत बैलगाडा शर्यतींचे स्वरुप प्रचंड वेगाने बदलले. त्यांचे बाजारीकरण झाले, स्पर्धा लागली. पुर्वीही स्पर्धा होती, नाही असे नाही पण त्याचे स्वरुप फारच सात्विक, निकोप होते. मग आपण घड्याळाच्या काट्यावर बैलं पळवायला लागलो. गाडाबैल सेकंदाचा खेळ झाला. त्यासाठी भरघोस बक्षिसाची अमिषे, सेमिफायनल, फायनल, हॅट्रीक साधण्यासाठीची पराकाष्ठा.
त्यासाठी हर तऱ्हेचा आटापिटा. या प्रकाराने खरं तर आपल्या बैलगाड्यांची वाट लावली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गाडा नंबरात लावण्यासाठी काही हजार रुपयांचा बैल लाखात विकत घे, घड्याळावाल्याकडे दांडू लाव... एक ना अनेक उद्योग. परिपूर्णतेचा, उत्कृष्टतेचा ध्यास समजू शकतो... पण तो कोणत्या पातळीला जाऊन...?
बैलगाड्यांनी बरबाद झालेली किंवा तीन तीन पिढ्या आहे त्याच ठिकाणी खुंटलेली शेकडो शेतकरी कुटुंब आहेत. आज्यामागे बाप, बापामागं पोरगा गाड्यामागं पळत राहतो. पंचक्रोशीत बैलगाडा शौकिनांत थोडं नाव होतं. गडी फुगून जातो. टोळक्याच्या टोळक्याला रस पाजत सुटतो.
एक जत्रा करायची म्हटलं तर पाच-दहा हजार रुपये खर्च होतो. दिवसाआड जत्रा सुरु राहतात. वर्षभर शेतात मेहनत करायची आणि केवळं शौकात उडवायची. ज्याच्याकडे फुकायला पैसा आहे त्याचं होतं... पण सर्वसामान्य गाडारसिक ज्यांनी बैलांवर जिवापड प्रेम करुन ही परंपरा जपली त्यांचं काय?
अमका नामांकित बैलगाड्यावाला बैलांना शेंगदाने, गुळ खाऊ घालतो म्हणून ही मंडळी त्यांचं अनुकरण करत शेंगांची पोतीच्या पोती विकत घ्यायची. घरी शाळेत जाणाऱ्या पोरांना नीट चड्डी घालायला नसायची. माझे अनेक सखे, सोबती गाड्यामागं गणगणत गेले. ना शाळा नीट झाली, ना जनावरांतून काही हाती लागलं. आता हळहळ व्यक्त करतात....
दरेक यात्रेत चार-आठ अपघात, दोन-चार यात्रा मिळून एक मृत्यू ठरलेला असतो... हे गेल्या काही वर्षांतील यात्रांवरुन लक्षात येईल. दोन तीन लोकांनी माझ्यासमोर प्राण सोडलाय. त्यांच्या कुटुंबांची झालेली वाताहात जवळून बघितलीय. काय कमावलं आपण बैलगाड्यांच्या शर्यतीची स्पर्धा करुन? या जिवघेण्या स्पर्धेनं जिवाहून प्रिय असलेल्या जनावरांचे हाल हाल होतात. कितीक विहीरीत गेली, कितीक मोडली. आपण जीव लावतो हे खरंय पण जीव घेतोही, हे कोण नाकारु शकेल ?
आता प्रश्न हा आहे की आपण बैलगाड्यांचं बाजारीकरण बंद करुन पुन्हा मुळ स्वरुपात स्पर्धेशिवाय केवळ उत्सवाच्या स्वरुपात निखळ आनंदासाठी, जनावरांच्या प्रेमासाठी प्रेमळ स्वरुपात बैलगाडे नाही का पळवू शकत? कशाला हवं त्यात राजकारण, अर्थकारण आणि प्राणिमित्रांचं दडपण? कायद्याच्या चौकटीत राहूनही आपली परंपरा कायम ठेवता येऊ शकते. या बाजूने विचार व्हायला हवा.
दुसरा मुद्दा हा आहे की बैलगाडा शर्यती हा काही शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न नाही. त्यापेक्षाही महत्वाचे, गंभीर अनेक प्रश्न आहेत. बैलगाडा शर्यतींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बैलगाडा विमा कंपनी स्थापन केली. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली कदाचित ही जगातील पहिली विमा कंपनी असावी. पण बैलगाड्यांबाबत जे धाडस केले तसे धाडस बैलगाडा शौकिन पट्ट्यातील बटाटा वा इतर पीक उत्पादकांना वाचविण्यासाठी कुणी केलेले नाही.
एकीकडे बटाटा उत्पादक शेतकरी गेली अनेक वर्षे विम्याची मागणी करत राज्य शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. पण ना हाक ना बोंब. छंद किंवा नादासाठी आपण जी एकजुट दाखवतो ती शेतीच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी का दाखवत नाही?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.