
Pune News : महाराष्ट्र सरकारचे उत्पन्न हे तेलंगणा सरकारच्या तिप्पट असून सुद्धा शेतकऱ्यांना इथे सुविधा मिळत नाहीत. तेलंगणातील शेतकऱ्यांना एकरी खरीप व रब्बी हंगामात एकूण दहा हजार रुपये अनुदान दिले जाते.
महाराष्ट्रात नैसर्गिकदृष्ट्या पाणी भरपूर पडत असूनसुद्धा ओलितापासून इथे वंचित राहावे लागते. इतरत्र कोरडवाहू शेती करून शेतकरी आत्महत्या करीत आहे, तेलंगणामध्ये पाणी व वीज मोफत दिल्या जाते.
महाराष्ट्रात ही शेतकऱ्यांचे सरकार यावे यासाठी तेलंगण राष्ट्र समितीची (बीआरएस) सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती बीआरएसचे शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या सुखदुःखात समरस असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे छत्रपती संभाजीनगर येथे २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेते उपस्थित राहतील.
त्यांनी महाराष्ट्रात पुढील २०२४ च्या निवडणुकीसाठी रणसिंग फुकले असून, विदर्भात व मराठवाड्यात आत्महत्या थांबविण्याचा त्यांनी मानस बोलून दाखवला. या सभेच्या तयारीसाठी अमरावती, यवतमाळ, अकोला, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथे ठिकठिकाणी शेतकरी नेते सभा घेत आहेत.
विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची होणारी दयनीय अवस्था पाहून ‘अबकी बार, किसान सरकार’ आणावे व पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रीयन जनतेला आवाहन केले.
या सभेसाठी ज्ञानेश्वर वाकुडकर नागपूर, विजय मोहिते सातारा-सांगली, शंकर अण्णा धोंडगे नांदेड, धनंजय पाटील काकडे अमरावती, किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम परभणी, हर्षवर्धन जाधव जालना हे शेतकरी नेते प्रयत्नशील असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.