सूक्ष्म जीव आणतील रासायनिक शेतीत समृद्धी

राज्यातील महिला कृषी शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. इंदू सावंत यांचे नाव आघाडीने घ्यावे लागते. उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले व डॉ. एस. डी. सावंत यांच्याशी विवाह केला. या दांपत्याने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला नावारूपाला आणले. कष्टाचे फळ म्हणून निवृत्तीपूर्वी सौ. सावंत यांना ‘एनआरसीजी’चे प्रभारी संचालकपद सांभाळण्याची संधी मिळाली होती.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

डॉ. सौ. इंदू सावंत

indulika18@yahoo.co.in

‘जैविक घटकांच्या मदतीने शेतीमधील पीक संरक्षण’ (Crop Protection) हा विद्यार्थी दशेपासूनच माझ्या आवडीचा विषय. माझी आचार्य (पीएचडी) पदवीदेखील वनस्पती विकृतिशास्त्रातून (Plant Pathology) झाली. रासायनिक घटक आणि अत्याधुनिक यंत्रे (Modern Machinery), उपकरणे याशिवाय नफ्याची शेती होऊ शकत नाही, हे सत्य आपण स्वीकारायला हवे. मात्र ते स्वीकारताना सृष्टीतील जीवजंतू, जिवाणू, पशुपक्षी, वनस्पती, निसर्ग, आपले पारंपरिक कृषिज्ञान (Agriculture Knowledge) आणि वडीलधाऱ्यांनी शोधलेल्या कृषी कौशल्यांना नाकारता येणार नाही. त्यांना सोबत घेऊनच कृषी व्यवस्थेचा विकास होईल, असे माझे ठाम मत आहे. जगभर आता त्यादृष्टीने विचार होतो आहे.

रासायनिक घटकांवरील अवलंबित्व किमान पातळीवर आणून जैविक घटकांचा जास्तीत जास्त वापर करीत विषमुक्त अन्नाची (रेसिड्यू फ्री) निर्मिती करणे हीच आता आधुनिक जगाची उद्दिष्टे असतील. पुढील दोन दशकात भारतातदेखील त्या अनुषंगाने मोठी जागृती झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. जैविक नियंत्रणासाठी निसर्गाने भरपूर मित्र जीवजंतू कृषी शास्त्रज्ञांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातील बहुतांश जिवांचे मैत्रिपूर्ण वापर अजून अज्ञात आहेत. मी स्वतः ट्रायकोडर्मावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात एक दशक संशोधन केले. ट्रायकोडर्माच्या अनेक श्रेणी आहेत. त्यातील कमाल उपयुक्त श्रेणीवर संशोधन करीत त्याची निर्मिती प्रयोगशाळेत केली आणि त्यावर आधारित उत्पादने आम्ही शेतकऱ्यांना मोफत वाटली. त्याचे खूप चांगले परिणाम शेतकऱ्यांना मिळाले. द्राक्षामधील भुरी, डावणीच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशके फवारली जातात. मात्र, त्यातून शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. रेसिड्यूच्या समस्या येतात.

Crop Protection
Crop Protection : आंबिया बहरातील फळांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

भारतीय द्राक्ष शेतीत विषम वातावरणामुळे रोगकारक बिजाणूंचा प्रसार चटकन होतो. शेतीमधील बीजाणूंचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी इतर सूक्ष्म जीवांची मदत घेता येते. तेच तंत्र भविष्यात मोठ्या प्रमाणात अंगीकारले जाईल. जैविक नियंत्रणात ट्रायकोडर्मा बुरशीची झाडावर, पानावर फवारणी करीत रोगनियंत्रण करता येते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले. मात्र ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस बुरशीला थेट पिकाच्या झाडाच्या मुळाशी टाकले तर त्या झाडात स्वतःची आंतरप्रवाही रोगप्रतिकार शक्ती जागृत (इन्ड्युसमेंट ऑफ सिस्टिमिक रेझिस्टन्स) करता येत असल्याचे आम्हांला आढळून आले.

Crop Protection
Crop Protection : उष्णतेत पिकाची सहनशिलता वाढवण्यासाठी होत आहेत प्रयत्न

२०१९ मधील पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती. तेव्हा काही द्राक्षबागांमध्ये आम्ही ट्रायकोडर्मा पुरवले आणि त्याचा उत्तम लाभ शेतकऱ्यांना झाला. विविध बुरशींचा वापर करून भविष्यात विविध पिकांमध्ये त्यांची स्वतःची नैसर्गिक पीक संरक्षणाची व्यवस्था जागृत केली जाईल. त्यासाठी उपयुक्त सूक्ष्म जीव आणि त्यांचे वापर शोधण्याकडे कृषी शास्त्रज्ञांचा कल वाढेल. यामुळे रासायनिक मूलद्रव्यांचा वापर आपोआप कमी होत जाईल. विविध सूक्ष्मजीवांचा वापर यापुढे फवारणी, ड्रेन्चिंग, ठिबकमध्ये होत जाईल. अर्थात, जैविक पीक संरक्षण व्यवस्थेतील उत्पादनांचा वापर सामूहिक पद्धतीने व सातत्याने करावा लागेल. त्यामुळे त्याचे परिणाम लवकर मिळतात.

दुसरी महत्त्वाची भूमिका सूक्ष्मजीवांची जमीन सुपीकतेत असेल. तुम्हाला माहीत असेल, की जमिनीची सुपीकता घटतेय. कारण जमिनीतील सूक्ष्मजीवांचे विश्‍व संकुचित होते आहे. ते काही ठिकाणी धोक्यात येते आहे. अशावेळी माती ही मृतप्राय होत जाते. तिला जिवंत ठेवण्यासाठी त्यातील सूक्ष्म जीव वाढविले. त्यासाठी शेतातील काडीकचरा पुन्हा विघटित होऊन शेतात गेला पाहिजे. या विघटनाच्या प्रक्रियेत आपल्याला बुरशी व जिवाणूंचीच मदत मिळणार आहे. उत्तर भारतातील गव्हाचे काड आणि भाताचे तूस न जाळता पुन्हा त्याचे कंपोस्टिंग करून जमिनीत गाडण्यासंदर्भात मोठी चळवळ उभी राहू पाहत आहे.

सेंद्रिय कार्बन (ओसी) वाढविण्यासाठी कंपोस्टिंग करण्याचे मुख्य माध्यम आपले सूक्ष्म जीव असतील. जैविक खतांचा वापरदेखील वाढत राहील. शेतीमधील रासायनिक मूलद्रव्यांची फवारणी अपरिहार्य असते. पण त्यातून रेसिड्यूची समस्या उद्‌भवते. सूक्ष्म जीव ही समस्यादेखील सोडवतील. कारण सूक्ष्मजीवांचा वापर पिकांवर केल्यास ते स्वतःमधून विकरं (एन्झाइम्स) सोडतात. हीच विकरं रासायनिक मूलद्रव्यांची शृंखला तोडतात. त्यामुळे रसायनाची विषाक्त पातळी घटते. थोडक्यात, आपला शेतीमाल रेसिड्यू फ्री होतो. मी हे द्राक्षाच्या बाबतीत खूप संशोधनाअंती शोधून काढले. असे प्रत्येक शेतीमालाच्या बाबतीत शोधता येईल. तसे झाल्यास आपण विषमुक्त अन्ननिर्मितीची खरी क्षमता प्राप्त करू.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com