'Miracle Worker' : लखलख सौदामिनी

आपल्या संकुचित विश्‍वाच्या पल्याडही एक जग आहे. ते आपल्याशी कधी कधी सांधा जोडू पाहतं. त्याला प्रतिसाद द्या. क्षमता हरवलेल्यांचे डोळे व्हा, मुख व्हा, कान व्हा! किमान त्यांचं जग समजून तरी घ्या. तुमची दुःखं तुम्हाला नक्कीच थिटी वाटतील, अहंकाराचा बडेजाव फुका असल्याचं भान येईल.
'Miracle Worker'
'Miracle Worker' Agrowon

ती ठार आंधळी होती; बहिरी आणि मुकीही होती. तरीही जगानं मान वळवून पाहावं असं काही तरी तिनं करून दाखवलं. आपल्या कर्तृत्वाचं निशाण जगाच्या छाताडावर दिमाखानं फडफडवलं. पंचेंद्रिये शाबूत असलेले आपण किती कुरकुरत असतो ना! तिनं तर लहानपणीच आजारपणात दृष्टी, वाचा आणि श्रवणशक्तीही गमावली. पण न खचता अतोनात प्रयत्न करून तिनं आपल्या शारीरिक मर्यांदांवर मात केली. पुढं प्रख्यात साहित्यिक मार्क ट्वेननं तिला ‘मिरॅकल वर्कर’ ही उपाधी दिली; इतकं थोर काम तिनं करून ठेवलं. ती समाजसेविका बनली. दिव्यांगांच्या, दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी, कल्याणासाठी झटली. समाजवादाचा पुरस्कार केला. उत्तम वक्ता म्हणूनही नाव कमावलं. त्यासाठी केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगभरातील पंचविसेक देशांचे दौरे केले. म्हणून जगभरात हेलन केलर हे नाव आज आदरानं घेतलं जातं. ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवणारी ती लखलखती सौदामिनी होती.

'Miracle Worker'
द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे : आदिनाथ चव्हाण

हेलनचे वडील सैन्यातील निवृत्त कॅप्टन, पुढं ते एका प्रादेशिक वृत्तपत्राचे संपादक बनले. आई कॅथरिन ऊर्फ केटही उच्च घराण्यातली. या दांपत्याचं हे दुसरं लग्न. या देखण्या अन् गोड पोरीचा जन्म अमेरिकेतील टस्कंबिया प्रांतात २७ जून १८८० रोजी झाला. हेलनच्या चिमखड्या बोलांनी केलर कुटुंबीयांच्या घरात आगळंच चैतन्य सळसळू लागलं. पण हे सुखचित्र फार काळ टिकलं नाही. हेलन अवघी १९ महिन्यांची असताना मस्तिष्कावरण ज्वरामुळं (मेनिंजायटिस) तिची दृष्टी आणि श्रवणशक्ती गेली. केलर कुटुंबीयांना हा मोठाच धक्का होता. हेलन जशी मोठी होत गेली तशी अधिक हिंस्र होऊ लागली. भवताल जाणवतोय, पण तो नजरेत सामावून घेता येत नाही; बाहेर आवाजांची दुनिया रसरसली आहे, पण कान खिळे ठोकल्यासारखे बधीर झालेत; व्यक्त व्हायचंय, पण त्यासाठी शब्द नाहीत, वाणी नाही, तेव्हा होणारं घुसमटलेपण किती भीषण असेल ना! ही तगमग माणसानं सोसावी तरी कशी? छोट्या हेलन केलरनं ही पराकोटीची अवस्था अनुभवली. सुरुवातीला ती प्रचंड रागराग करायची. हाताला लागतील त्या वस्तूंची मोडतोड, फेकाफेक करायची; आई, भाऊ, बहिणींवर तर ती तुटून पडायची. सदैव रसरसता ज्वालामुखीच जणू!

हेलनला शिकवणं हे तिच्या आई-वडिलांच्या दृष्टीनं एक दिव्य होतं. दिव्यांगांना कसं शिकवायचं असतं याची त्यांना कल्पना नव्हती. तेव्हा आजच्याइतकं प्रगत तंत्रज्ञान किंवा साधनं नव्हती. म्हणून हे कौशल्य असणाऱ्या ॲन सलिव्हन या पंचविशीतल्या तरुण शिक्षिकेला पाचारण केलं गेलं. दाखल झाल्याबरोबर तिला हेलनच्या संतापी स्वभावाची प्रचिती आली. तिला हातांच्या खुणांची भाषा शिकवू पाहणाऱ्या ॲनला हेलननं निकरानं विरोध केला. तिच्यावर हल्ला करून चापटींचा प्रसादही दिला. पण ॲन मागे हटली नाही. आपला पराकोटीचा द्वेष करणाऱ्या या विद्यार्थिनीला ती चिकाटीनं शिकवत राहिली. त्यातून दोघींमध्ये तयार झालेलं नातं पुढे तब्बल अर्धशतक टिकलं. हेलनची शिक्षिका, मदतनीस म्हणून ॲन आपल्या मृत्यूपर्यंत कार्यरत राहिली. या विद्यार्थिनीला जगाच्या नजरेत आणण्याइतपत लक्षवेधी बनवण्यात ॲनचा मोठा वाटा राहिला. ‘द हेलन केलर स्टोरी’ या पुस्तकात हेलनचा अनोखा जीवनपट प्रत्ययकारकरीत्या उलगडून दाखवला आहे. ॲननं हेलनला बोटांच्या खुणांच्या साह्यानं शिकवायला सुरुवात केली. दोघींमधल्या या हृद्य नात्याची सुरुवात कशी झाली त्याबाबतचा पुस्तकातला हा चित्रदर्शी उतारा...

ॲन सलिव्हनने एक रिकामा पेला हेलनच्या हाती दिला आणि बागेत पाण्याचा हातपंप होता तेथे तिला नेले. ॲनने हेलनला त्या पंपाजवळ उभे केले. तिला हातातला पेला नळाखाली धरावयास लावला आणि हातपंप खालीवर करावयास सुरुवात केली. नळाचे थंडगार पाणी पेला भरून हेलनच्या हातावरून वाहू लागले. ॲनने तिचा दुसरा हात हाती घेतला आणि त्यावर ‘पाणी’ या अर्थाच्या खुणा केल्या. हेलनच्या एका हातावरून थंड पाणी वाहत होते. दुसऱ्या हातावर ‘पाणी’ या अर्थाच्या खुणा नोंदल्या जात होत्या. एकाएकी हेलन चकित, स्तब्ध झाली. तिच्या हातातला पेला खाली पडून फुटला तरी त्याची तिला दादही नव्हती. एकाएकी एक फार जुनी स्मृती तिच्या मनात हळूहळू जागी होत होती. अगदी लहान असता हेलन पाण्याला ‘पा-पा-’ म्हणे. ते ‘पा-पा’ म्हणजेच हे ‘पाणी’! ती अधीर झाली. तिच्या अंगातले रक्त वेगाने धावू लागले आणि एक नवे ज्ञान तिच्या मेंदूत उदय पावले. ‘पा-पा’ म्हणजेच ‘पाणी’ तर मग हा एक ‘शब्द’ होता. इतकेच नव्हे तर आतापर्यंत बोटांच्या ज्या खुणा तिच्या तळहातावर केल्या जात होत्या ते सारे ‘शब्द’ होते. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्रियेचा निदर्शक असा एकेक ‘शब्द’ होता आणि तेच तर तिला शिकविण्याची खटपट तिच्या बाई करीत होत्या! तिच्या मनातली खळबळ तिच्या मुद्रेवर उमटली. त्याबरोबर ॲन सलिव्हन तिजकडे धावली आणि तिने तिला आवेगाने आपल्या बाहुपाशात कवटाळले. हेलन जितकी उत्तेजित झाली होती, तेवढेच ॲनचे मनही त्या क्षणी उचंबळून आले होते. तिला एकदम हसू फुटले आणि तिला रडूही कोसळले! कारण सरतेशेवटी हेलनला शब्दांची कल्पना, व्याप्ती कळली होती. तिने प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला होता.

'Miracle Worker'
द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे : आदिनाथ चव्हाण

त्या दोघी हर्षभराने घरात धावत आल्या. काय झाले ते ॲनने सर्वांना सांगितले. त्याबरोबर घरातली सारी माणसे हेलनभोवती गोळा झाली. त्यांच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार राहिला नव्हता, पण हेलनचा उत्साह साऱ्यांपेक्षा अधिक होता. तो सारा दिवस ती शब्दांची मागणी करीत होती. याला काय म्हणायचे? त्याला काय म्हणायचे? छोट्या मिल्ड्रेडला काय म्हणायचे हेदेखील तिने विचारून घेतले. ‘बाळ’ हा एक नवा शब्द तिला कळला. मग तिने ॲनकडे बोट रोखले आणि तिची ओळख पटवून देणाऱ्या शब्दासाठी ती हट्ट धरून बसली.

‘बा-ई’ ॲन सलिव्हनने तिच्या हातावर खुणा केल्या, ‘बाई!’ हेलनच्या मनातली तिरस्काराची व द्वेषाची उरली सुरली छटाही आता पार मावळून गेली व एका अननुभूत आनंदाने तिचे हृदय भरून आले. ॲनने तिचा हात उचलला व तिची बोटे आपल्या तोंडावरून, गालांवरून, ओठांवरून फिरवली. आपल्या मुखावरचे बारीकसारीक भावही हेलनला कळावेत, यासाठी ॲनची धडपड चालली होती. ती हसली. तिच्या ओठांचे कोपरे वर सरकले आणि गालांना खळ्या पडल्या. हेलननेही तसेच करून पाहिले. ॲनच्या मुखाविर्भावाचे तिने अनुकरण केले आणि काय चमत्कार! हेलनच्या मुखावरील भावशून्यता क्षणार्धात मावळून गेली. तिचा चेहरा आता कोरा, रिकामा राहिला नव्हता. कारण हेलन केलर आता हसत होती! आपले दोन्ही हात स्वयंस्फूर्तीने तिने ॲनच्या गळ्याभोवती वेढले, आणि आज प्रथमच आपल्या बाईंचा तिने प्रेमभराने मुका घेतला!

'Miracle Worker'
खरा तो एकची धर्म - आदिनाथ चव्हाण

केवळ स्पर्श, गंध, कंपनांद्वारेच जग समजून घेणं किंवा व्यक्त होणं हेलनला शक्य होतं. या मर्यादा असूनही किंचितही बाऊ न करता तिनं आपली जीवननौका भवसागरात लोटून दिली. कर्णबिधिरांना बोलता येणं अशक्य कोटीतलं मानलं जातं. कारण वाचा असली तरी शब्द कानावर पडत नसल्यानं त्यांचा अर्थासह उच्चार करणं शक्य नसतं. हेलननं ही मर्यादाही ओलांडली. ती जड जड शब्दांत बोलायला शिकली. सरावानं ती अस्खलित बोलू लागली. त्याआधी तिनं इंग्रजीबरोबरच फ्रेंच, इंग्रजी, जर्मन, लॅटिन भाषाही अवगत केल्या. गणित, भूगोल, विज्ञान या विषयांत गती मिळवली. ॲनच्या मदतीनं शालेय शिक्षण ब्रेल लिपीच्या साह्यानं पूर्ण करून ती हार्वर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिफ महाविद्यालयात दाखल झाली. सन १९०४ मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी तिनं कला शाखेची पदवी मिळवली. ही पदवी मिळवणारी ती जगातली पहिली अंध, बहिरी विद्यार्थिनी ठरली. जगाशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली सारी तंत्रं तिनं अवगत केली. विशिष्ट प्रकारे बनवलेल्या टेबलाच्या पृष्ठभागावरील कंपनांच्या माध्यमातून संगीताचा आनंदही ती घेऊ शकत असे.

आता हे सारं कसं शक्य आहे ते तपशिलात समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक वाचायला हवं. दूरध्वनीचा शोध लावणारे डॉ. अलेक्झांडर ग्रॅहम बेल, प्रख्यात साहित्यिक मार्क ट्वेन यांनी तिला या काळात चांगली मदत केली. तिच्या पराक्रमानं भारावून गेलेल्या ट्वेन यांनी तर तिला ‘मिरॅकल वर्कर’ ही उपाधी बहाल केली. पुढं याच नावाचा हेलनच्या जीवनावरचा चित्रपटही आला. खरं तर तिच्यावर अनेक चित्रपट, नाट्य रूपांतरं, दूरचित्रवाणी मालिका आल्या आणि गाजल्याही. काही चित्रपटांना आॅस्करही मिळालं.

हेलन केलर आणि तिच्या जादूई आयुष्यावर जगभरात असंख्य पुस्तकं लिहिली गेली. खुद्द हेलननं आपलं आत्मचरित्र तरुणपणीच सन १९०३ मध्ये लिहिलं. ‘द स्टोरी आॅफ माय लाइफ’ हे त्याचं नाव. दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर अशक्य कोटीतला चमत्कारही कसा घडवता येऊ शकतो, याचं भान देणारं हे पुस्तक जगभर प्रचंड गाजलं. अनेक भाषांमध्ये ते अनुवादित झालं. तिच्या पूर्ण आयुष्याची, त्यातील चढ-उतारांची, यशापयशाची कहाणी सांगणारं ‘द हेलन केलर स्टोरी’ हे पुस्तक तिचं अधिकृत आणि विश्‍वासार्ह चरित्र मानलं जातं. कॅथरिन ओवेन्स पिअर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा रसाळ मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनं ‘आंधळी’ या नावानं तो प्रकाशित केला आहे. सन १९६३ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या मराठी पुस्तकाच्या सात आवृत्त्या निघाल्या आहेत. यावरून शांताबाईंनी किती ताकदीनं हे पुस्तक मराठीत आणलं असावं याची प्रचिती यावी.

हेलननं तब्बल १२ पुस्तकं लिहिली. ‘माय की इन लाइफ’, ‘द वर्ल्ड आय लिव्ह इन’, ‘द मिरॅकल आॅफ लाइफ’, ‘आउट आॅफ दि डार्क’, ‘माय रिलीजन’ ही त्यापैकी काही. कित्येक लेखही तिनं लिहिले. जगभरातील वृत्तपत्रांमध्ये ते प्रसिद्ध झाले. डोळे नसले तरी तिचं वाचन तगडं होतं. ब्रेल लिपीतून तिनं होमरचं महाकाव्य ‘इलियड’ वाचलं; त्याचबरोबर विल्यम शेक्सपिअरची नाटकं, बायबल, लॉर्ड टेनिसनच्या कविता अशा अभिजात साहित्यानं तिच्यावर गारुड केलं. या साहित्यामुळं जग आपल्याला अधिक कळलं, असं तिनं कृतज्ञतेनं नमूद केलं आहे. आपल्यातले ९५ टक्क्यांपेक्षा अधिक डोळस लोक वाचनाच्या वाटेलाही जात नाहीत. शाळा-महाविद्यालय संपलं की त्यांचं पुस्तकांशी असलेलं नातं संपतं. वाचन कष्टप्रद वाटणाऱ्या आळशांनी हेलनला आपल्या शारीर मर्यादांमुळं इतकं वाचन करताना किती त्रास झाला असेल याचा जरूर विचार करावा.

अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीच्या हटके अभिनयानं गाजलेला ‘ब्लॅक’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. हेलनच्या जीवनकहाणीवरूनच संजय लिला भन्साळी यांनी हा चित्रपट बनवला. भवतालाविषयीच्या सगळ्या संवेदना गोठल्यावर होणारी घुसमट, तगमग काय असते ते समजून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट जरूर पाहावा. राजश्री प्रॉडक्शनचा सन १९६४ मध्ये आलेला ‘दोस्ती’ हा अभिजात चित्रपटही जरूर पाहा. अंध आणि अपंग मित्रांची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या रेशीमस्वरातील श्रवणीय गीतं अवर्णनीय आनंद देतात. केवळ चाकरी आणि भाकरी मिळाली म्हणजे माणसाचे सारे प्रश्‍न सुटत नाहीत; त्याला हवं असतं प्रेम आणि मैत्री, असा संदेश देणाऱ्या या चित्रपटातलं ‘चाहूँगा मैं तुझे सांज सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं ना दूँगा...’ हे सुरेख गाणं कदाचित तुम्ही ऐकलंही असेल.

मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत चित्रपटात मित्रानं मित्रासाठी म्हटलं आहे. ते देवाची प्रार्थना म्हणूनही गाता येतं किंवा प्रेयसीसाठीही आळवता येतं, ही त्याची वेगळी थोरवी. त्याचबरोबर माणसाला माणूस म्हणून पाहा (अंधांना वेगळी वागणूक देऊ नका) असा संदेश देणारं अंध नायकानं गायिलेलं ‘दोस्ती’मधलं हेही गाणं यू ट्यूबवर जरूर ऐका. रफिसाहेबांच्या आवाजाची जादू अनुभवा. जानेवालों जरा मुडके देखों मुझे एक इन्सान हूँ मैं तुम्हारी तरह। जिसने सब को रचा अपनेही रूपसे उसकी पहचान हूँ मैं तुम्हारी तरह।

डोळे बंद करा, कानात बोळे घाला, तोंडाला चिकटपट्टी लावा आणि कल्पना करा यापुढंच आयुष्य आपल्याला असंच जगायचं आहे. किमान पंधरा मिनिटं या स्थितीत राहून पाहा. या जगात लक्षावधी जीव असं अंधकारमय जीवन कसं जगत असतील याची किमान अनुभूती तुम्हाला घेता येईल. हाती-पायी, कानी-कपाळी धडधाकट असणारे कोट्यवधी जीव कण्हत कुथत, इतरांविषयी टीकाटिप्पणी करत जगत असलेले आपण पाहतो. मानवासाठी गृहीत असलेल्या किमान क्षमताही नसलेल्या दिव्यांगांकडून काही शिकावं असं त्यांना कधी वाटत नाही. दिव्यांगांकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन सहानुभूतीचा असतो; बऱ्याचदा ती कोरडी असते. त्यांच्याकडं काही वेगळ्या क्षमता आहेत हे आपल्या गावीही नसतं अन् त्या समजून घेण्याची आपली तयारीही नसते.

लोकहो, माणसांमध्ये डावं-उजवं करू नका. आपण सारेच समान आहोत. साऱ्यांनाच समान हक्क, अधिकार आहेत. एखाद्यामध्ये अवयवांच्या, क्षमतांच्या कमतरता असल्या तरी त्याला वेगळी वागणूक देऊ नका. जसा आपल्याला सन्मान हवा असतो, तसाच तो इतरांनाही हवा असतो. शारीर क्षमता उणावलेले जीवही मानवच आहेत. त्यांना हात देणं आपलं कर्तव्यच. आपल्या संकुचित विश्‍वाच्या पल्याडही एक जग आहे. ते आपल्याशी कधी कधी सांधा जोडू पाहतं. त्याला प्रतिसाद द्या. क्षमता हरवलेल्यांचे डोळे व्हा, मुख व्हा, कान व्हा! किमान त्यांचं जग समजून तरी घ्या. तुमची दुःखं तुम्हाला नक्कीच थिटी वाटतील, अहंकाराचा बडेजाव फुका असल्याचं भान येईल. जगण्याचं नवं बळं तुमच्या शिडांमध्ये भरलं जाईल. माणुसकी, माणुसकी म्हणतात ती यापेक्षा फार काही वेगळी नसतेच मुळी!
.........
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com