आमदार भुयार यांना तीन महिने कारावास

गटविकास अधिकाऱ्यांवरील माइकफेक प्रकरण
आमदार भुयार यांना तीन महिने कारावास
Devendra BhuyarAgrowon

अमरावती ः पाणीपुरवठ्याच्या (Water Supply) मुद्यावर सुरू असलेल्या सभेत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व मोर्शी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार देवेंद्र महादेव भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी गटविकास अधिकाऱ्याला माइक फेकून मारला होता. त्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने (क्र. एक) आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने सोमवारी (ता. सहा) हा निवाडा दिला. २८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी सव्वातीन ते पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली होती. देवेंद्र भुयार त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य होते. सभागृहात पाणीटंचाईच्या विषयावर सभा आयोजित केली होती. त्या सभेला वरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष शेषराव बोपटे (वय ५६), जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ मनीषा खत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार व इतर सदस्य हजर होते. सभा सुरू असतानाच वरुड तालुक्यातील पाणीटंचाईच्या विषयावरून गटविकास अधिकारी बोपटे हे वरुड तालुक्याची माहिती देत असताना देवेंद्र भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने माइक व पाण्याच्या बॉटल फेकल्या. त्यामुळे सभागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांनी सभागृहातून बहिर्गमन केले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी देवेंद्र भुयार यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. रणजित नाशिकांत भेटाळू यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासले. पोलिस उपनिरीक्षक संतोष लोकलवाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश श्री. अडकर यांनी आरोपी देवेंद्र भुयार यांना तीन महिने साधा कारावास व १५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात न्यायालयात पैरवी म्हणून पोलिस शिपाई बाबाराव मेश्राम व अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

बेनोडा जिल्हा परिषद सदस्य असताना जनतेच्या पाणीप्रश्‍नासाठी सभागृहात आवाज उचलला होता. आपण कुणालाही मारहाण केली नव्हती. यासंदर्भात जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले जाईल.
देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदार संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com