Gujarat Election : मोदी-शहांच्या प्रतिष्ठेचा सामना

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सलग २७ वर्षे सत्ता आहे. मोदी-शहा या नेत्यांनी भाजपचा गड राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली, नेत्यांचा मोठा फौजफाटा गुजरातेत उतरवला आहे. त्यामुळेच निवडणुकीतील उत्कंठाही वाढली आहे.
Modi Shah
Modi ShahAgrowon

देशाची सत्ता काबीज करण्यासाठी ज्या गुजरात मॉडेलचा (Gujarat Model) देशभर डंका पिटण्यात आला, तोच गुजरात आता हातून जाऊ नये म्हणून भाजपच्या (BJP) नेत्यांना खूप कष्ट उपसावे लागत आहेत. राज्यात २७ वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) दीर्घकाळ मुख्यमंत्री होते. त्यांना गुजरातचा कायापालट करणारे ‘विकासपुरूष’ संबोधले जाते. कॉँग्रेसवर (Congress) मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दूर सारत मोदींचा हुकमी एक्का टाकण्याची रणनीती आखली. अन्य राज्यांप्रमाणेच समस्या असलेला गुजरातच्या कारभाराचे ‘आदर्श मॉडेल’ देशासह जगातही यशस्वीपणे पोहोचवण्यात आले. अन् २०१३पासूनच मोदी, मोदी... गजर सुरू झाला. गुजरात मॉडेलचा आधार घेत मोदींनी दिल्ली गाठली आहे.

Modi Shah
Milk Gujarat: लंपी त्वचा रोगामुळे दूध उत्पादनात घट

राजकारणात कुबड्यांचा आधार खूप काळ टिकत नाही. गांधी-नेहरूंच्या पुण्याईवर कॉँग्रेसने देशात अनेक वर्षे सत्ता भोगली. परंतु जेव्हा रोजी-रोटीचा प्रश्‍न येतो तेव्हा पुण्यात्मे बाजूला सारून कठोर निर्णय घेण्याची भूमिका मतदारांना घ्यावी लागते. मतदारांनी कॉँग्रेसला जे भोगायला लावले त्याची चाहुल आता भाजपला लागली असावी. गुजरातमध्येही लोक कुठे आहे विकास, असा प्रश्‍न विचारत आहेत. २०१७च्या निवडणुकीतल्या घोषणा आणि त्याची अंमलबजावणी याचा लेखाजोखा मागत आहेत. आपले विकास मॉडेल आपल्याच अंगावर येत असल्याचे लक्षात येताच भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले.

Modi Shah
Gujarat FRP Pattern : ‘एफआरपी’चा गुजरात पॅटर्न निघाला फुसका

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदींना स्वत: ३१ सभा घ्याव्या लागल्या. मोठे तीन रोड शो केले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवावे लागले. नव्या उद्योगांच्या घोषणा कराव्या लागल्या. लाखो रोजगार जाहीर केले. सलग २७ वर्षे सत्तेत राहूनही ते कॉँग्रेसचेच दोष दाखवत आहेत. काँग्रेसजन आपल्याला किती वाईट पद्धतीने दुषणे देतात; कोणी पाळीव प्राण्यांची उपमा देते, तर कोणी ‘हिटलर’ संबोधतात असे सांगत मोदींना गुजरातच्या मतदारांना भावनिक साद घालावी लागली.

गृहमंत्री अमित शहांनी गुजरातमध्ये तळ ठोकून निवडणुकीची रणनीती आखली. केंद्रातील १७ दिग्गज मंत्र्यांना गुजरातच्या गल्लीबोळात फिरवण्यात आले. भाजपच्या आठ मुख्यमंत्र्यांना राज्यात दिवस-रात्र एक करावी लागली. शेकडो आमदार-खासदारांना गुजरातच्या चौकाचौकांत ‘जागते रहो’ची भूमिका पार पाडावी लागली. गुजरातमध्ये कॉँग्रेसच्या आघाडीवर सामसूम असताना आणि सक्षम विरोधक दिसत नसतानाही भाजपचा रक्तदाब वाढतो याचा अर्थ स्पष्ट आहे, की तेथील लोक भाजपवर नाराज आहेत. गुजरात हातून जाणे याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पायाखालची जमीन सरकण्याचा प्रकार असेल. मोदी-शहांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या गुजरातमधील सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखणे अत्यावश्यक आहे.

Modi Shah
Gujarat Election : गुजरात निवडणुकीमुळे संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त पुढे

घडले-बिघडले

गुजरातमध्ये १ डिसेंबर रोजी ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. आज ९३ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदान अधिक झाले. काँग्रेसची ग्रामीण भागावर मजबूत पकड आहे. ते जाणूनच भाजपने गेल्या पाच वर्षांत या भागावर अधिक लक्ष दिले. २०१७मध्ये जिथे भाजप पराभूत झाला तिथे पन्ना प्रमुखाची जबाबदारी निश्‍चित केली. प्रत्येक कुटुंबापर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. ८९ जागांपैकी भाजपने २०१७मध्ये ४८, तर कॉँग्रेसने ३८ जागांवर विजय मिळविला होता. तेव्हा मतदान झाले होते ६७ टक्के. त्याआधी मोदी मुख्यमंत्री असताना, २०१२मध्ये याच जागांवर ७१.४६ टक्के मतदान झाले.

त्यावेळी भाजपने ६१ आणि कॉँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. मोदी पंतप्रधान असतानाही भाजपचा टक्का घसरल्याचे आणि सुस्त बसलेल्या कॉँग्रेसला अधिक जागा मिळाल्याचे वास्तव आहे. या वेळी सुमारे १० टक्के मतदान कमी झाले. मतदान घटणे म्हणजे भाजपच्या जागा घटणे असा तर्क लावणेही योग्य नाही. याआधीच्या दोन निवडणुकांत भाजप-कॉँग्रेस थेट सामना होता. या वेळी आम आदमी पक्ष नवनवी आमिषे घेऊन गुजरातच्या मैदानात आहे. ‘आप’च्या अरविंद केजरीवालांनी ‘दिल्ली मॉडेल’ मांडत ‘गुजरात मॉडेल’वर टीकास्त्र सोडले.

तरुणांमध्ये केजरीवालांविषयी औत्सुक्य आहे. परंतु ‘आप’ गुजरातच्या ग्रामीण भागात पोहोचलेला नाही. पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये केवळ सुरतच्या सात जागांवर आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले इशुदान गढवी यांच्या खंभालिया देवभूमी द्वारका येथे ‘आप’चा प्रभाव जाणवतो. याशिवाय नर्मदा, सुरेंद्रनगर, डांग, तापी, मोरबी, जामनगर, अमरेली, गीर, सोमनाथ, जुनागड या भागांत कॉँग्रेसचा प्रभाव आहे.

भावनगर, भडोच, कच्छ, पोरबंदर, राजकोट परिसरावर भाजपचा प्रभाव आहे. पहिल्या टप्प्यात ‘आप’ला मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे जाणवते; तरीही त्याने भाजप आणि विशेषत्वाने कॉँग्रेसचा ताप वाढवला आहे. २०१७मध्ये राष्ट्रवादीने कॉँग्रेसचे संपूर्ण गणित बिघडवले होते. १३ जागा अशा होत्या,की राष्ट्रवादीमुळे भाजपला निसटता विजय मिळाला. तरीही मोदींचा भाजप केवळ ९९ (४९ टक्के) जागांपर्यंत पोहोचू शकला. कॉँग्रेसने ७७ जागा (४२ टक्के) जिंकल्या. पंतप्रधान असूनही मोदींची जादू चालली नाही.

जादुई आकड्याचे गणित

राष्ट्रवादीची भूमिका आता आम आदमी पक्ष बजावत आहे. पहिल्या टप्प्यातील १२ ते १५ जागा अशा आहेत, त्या ‘आप’ जिंकण्याची खात्री नाही. परंतु काही प्रमाणात भाजप आणि अधिक प्रमाणात कॉँग्रेसला फटका देणाऱ्या ठरणार आहेत. मोरबी दुर्घटनेचा दुष्परिणाम भाजपवर खूप होईल असे दिसत नाही. लखीमपूर खीरीप्रमाणेच भाजपने तातडीने मदत देऊन डॅमेज कंट्रोल केले.

त्यामुळे दुर्घटनेच्या मानसिकतेतून लोक केव्हाच बाहेर पडलेत. मतदान सुरू असताना शेवटच्या दोन तासांत मोदींनी अहमदाबादेत भव्य ‘रोड शो’ केला. ५० किलोमीटर क्षेत्रातल्या १३ विधानसभा मतदारसंघांतून तो गेला. याचा चांगला फायदा शेवटच्या तासांमध्ये भाजपला मिळाल्याचे संकेत आहेत. २००५मध्ये गुजरात पालिकांच्या निवडणुकीत मोदींच्या अशाच ‘रोड शो’द्वारे कॉँग्रेसकडून सत्ता हिरावली होती. परंतु जुने प्रयोग कितपत यशस्वी ठरतात ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल..

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शनिवारी संपला. आज चौदा जिल्ह्यांतील ९३ जागांसाठी मतदान आहे. २०१७च्या निवडणुकीत ९३पैकी ५१ जागा भाजपने आणि ३९ काँग्रेसने जिंकल्या होत्या. १८२पैकी दीडशे जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहिली, तर मागच्या प्रमाणे ४८ जागा टिकवून ठेवता येतील का? याबाबत भाजपची आकडेमोड सुरू आहे.

भाजपने विजयासाठीचा ९२चा आकडा गाठला काय आणि न गाठला काय, त्याने काय फरक पडतो? संख्याबळ नसतांनाही सत्ता स्थापण्यात भाजप तरबेज आहे. महाराष्ट्राचे उदाहरण ताजे आहे. सत्ता नसलेल्या राज्यात हव्या त्या मार्गांचा अवलंब करून सत्ता मिळवायचीच, ही भाजपची नीती आहे. मोदी-शहांचे गृहराज्य म्हणून भाजपसाठी गुजरातची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. संख्याबळ कितीही घटले तरी मोदी-शहा गुजरातेत जिंकतीलच, असे चित्र आहे.मोदी-शहांच्या प्रतिष्ठेचा सामना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सलग २७ वर्षे सत्ता आहे. मोदी-शहा या नेत्यांनी भाजपचा गड राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली, नेत्यांचा मोठा फौजफाटा गुजरातेत उतरवला आहे. त्यामुळेच निवडणुकीतील उत्कंठाही वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com