माॅन्सून आला पण, पाऊस कुठे गेला?

पावसाच्या दडीने राज्यातील शेतकरी चिंतातूर
Maharashtra Monsoon Update | Rain Updates
Maharashtra Monsoon Update | Rain UpdatesAgrowon

पुणेः पेरणीची तयारी करून शेतकरी माॅन्सूनची (Monsoon) वाट पाहत होते. तो आला पणं रिकामी झोळी घेऊन. माॅन्सूनने जवळपास संपूर्ण राज्य व्यापले पण पाऊसच नाही. हे असं कसं झालं? पाऊस नाही म्हणजे माॅन्सून आपल्याकडे आलाच नाही? हवामान विभागाने (Weather Department) चुकीची माहिती दिली? माध्यमही शेतकऱ्यांना फसवत आहेत? खते-बियाणे (Seed Fertilizer) कंपन्यांशी साटलोट करून शेतकऱ्यांना फसण्याचा उद्योग सुरु आहे, अशा अनेक प्रतिक्रिया सध्या येत आहेत. पण यात खरंच तथ्य आहे का? पाऊस नसताना हवामान विभागाने माॅन्सून दाखल झाल्याचं का जाहिर केलं? माॅन्सूनची वाटचाल कशी ठरवली जाते? माॅन्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस का पडला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. (Maharashtra Monsoon Update)

यंदा उष्णतेमुळे जमीन भाजून निघाली असेच म्हणावे लागेल. कारण यंदा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील उष्णतेने १२२ वर्षांतील उच्चांक गाठला. मे महिन्यानेही अंगाची लाहीलाही केली. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही तर सरकारसह सर्वांचेच लक्ष माॅन्सूनकडे लागून आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा वेळेच्या आधीच माॅन्सून केरळला धडकेल. असा अंदाज वर्तविला होता. झालंही तसंच. माॅन्सून २९ मे रोजी केरळात पोचला. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजेच ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाला. या ठिकाणी त्याने १० दिवसांचा मुक्काम केला. या काळात आपल्या कवेतील भागांत माॅन्सून सरीही पडल्या. त्यानंतर ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेल्या माॅन्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. यादरम्यान आपल्या आगमनाची चाहूल देत माॅन्सूनपूर्व सरी बरसल्या. त्यानंतर माॅन्सून राज्यात मजल दरमजल करत पुढे सरकत गेला. मात्र पावसाची शिदोरी सोबत आणली नाही. गुरुवारी तर माॅनसूनने गोंदीयाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्र व्यापाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहिर केले.

राज्य माॅन्सूनने व्यापले. पण पाऊस नाही. माॅन्सूनपूर्व सरीही कमी झाल्या. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. मग माॅन्सून दाखल झाल्याचं जाहीरच कसं केलं? असा प्रश्न सध्या उपस्थिती होतो आहे. शेतकऱ्यांमध्ये यावरून नाराजीही दिसून येत आहे. पणं इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे माॅन्सून दाखल होणं आणि तो सक्रिय होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माॅन्सून दाखल झाला म्हणजेच तो सक्रियही झाला, असे नाही. माॅन्सून दाखल होण्यासाठी वेगळी परिस्थिती लागते आणि तो सक्रिय होण्यासाठीही वेगळी परिस्थिती निर्माण व्हावी लागते. आता तुम्ही म्हणालं ही काय नवीन भानगड काढली. पण हे खरं आहे.

माॅन्सून कसा जाहिर होतो?

मॉन्सूनचे आगमन ही कमी कालावधीची घटना असते. त्यातही केरळमध्ये माॅन्सून दाखल होईपर्यंत वेगळे घटक विचारात घेतले जातात. पण त्याच्याशी सध्यातरी आपला काही संबंध नाही. आपण केरळमध्ये माॅन्सून दाखल झाल्यानंतर काय होतं ते पाहू. तर केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर सर्वसाधारणपणे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह हा मुख्य घटक आहे. तसेच हवामान उपविभागांमधील केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस अडीच मिलिमीटर पाऊस झाला की त्या भागात माॅन्सून दाखल झाल्याचं जाहिर केलं जातं. मॉन्सूनची प्रगती होताना पावसाचे क्षेत्र उत्तर दिशेने सरकत जाते. राज्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यावर ते लक्षात येते. पावसाची आकडेवारी हवामान विभगााने आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. ते आपणही पाहू शकतो. म्हणजेच जोरदार पाऊस झाल्यानंतरच माॅन्सून दाखल झाला असं नाही. तर मोसमी वाऱ्याचा प्रवाह आणि ६० टक्के केंद्रावर दोन दिवस केवळ अडीच मिलिमीटर पाऊस झाला तरी माॅन्सून दाखल झाला असं घोषीत केलं जातं. माॅन्सून दाखल झाल्यानंतर पावसाची ओढ बसणं केवळ यंदा झालं नाही. तर ही परिस्थिती मागील काही वर्षांपासून निर्माण होते. माॅन्सूनच्या आगमानंतरही ८ ते १५ दिवस पावसाची दडी यापुर्वी अनुभवाला आली आहे.

मॉन्सून सक्रिय होणे म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे मॉन्सून ने सर्व देश व्यापल्यानंतर मॉन्सून सक्रिय होतो. त्या आधी देशाच्या विविध भागांत पूर्वमोसमी पाऊस पडतो. यंदा राज्याच्या अनेक भागात पुरेसा पूर्वमोसमी पाऊस झाला नाही. तसेच मॉन्सून सक्रिय होण्यासाठी समुद्रावरून बाष्पाचे पुरवठा होणे, हे बाष्पयुक्त वारे जमिनीवर फेकले जाण्यासाठी चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती, कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा अर्तात द्रोणीय स्थिती, जमिनीवरील कमी दाबाचे पट्टे आदी वातावरणीय घटकांची आवश्यकता असते. तसेच मॉन्सून सर्व देशभरात दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे तयार होणाऱ्या मॉन्सून ट्रफ म्हणजेच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती यावर मॉन्सूनची सक्रियता किंवा धुव्वाधार पाऊस अवलंबून असतो. सध्या एकतर या स्थिती तयार झालेल्या नाहीत किंवा आहेत त्या पावसासाठी पुरेशा नाहीत. यामुळे पाऊस पडत नाही. आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com