
Aurangabad News : मोसंबी हे मराठवाड्यातील महत्त्वाचे फळपीक आहे. या फळपिकात सद्यःस्थितीत आंबिया बहराचे ‘सेटिंग’ सुरू असताना गुंडीगळही होत आहे. ही गुंडीगळ शेतकऱ्यांची चिंता वाढवीत असली, तरी ती नैसर्गिकच असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यात अति पावसामुळे, तसेच मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे मोसंबी बागांचे ताण व्यवस्थापन (Mosambi Orchard Management) कोलमडले होते. बागांना अपेक्षित ताण न बसल्यामुळे अनेक ठिकाणच्या बागा फुलोऱ्यावर येण्याऐवजी नवतीवर गेल्या.
भारी जमिनीतील मोसंबी बागांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला. तर हलक्या मध्यम जमिनीत फुले येण्याचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले. आता बहुतांश बागांमध्ये मोसंबी फळपिकात अंबिया बहराची मोठ्या प्रमाणात फुले लगडून गुंडी सेटिंग होत आहे. या अवस्थेत काही प्रमाणात गुंडीगळही होत आहे.
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्या माहितीनुसार, साधारणतः प्रत्येक मोसंबी झाडावर मोठ्या प्रमाणात फुले येतात. ती फळांत रूपांतरित न झाल्यास झाडाला तो भार सहन करणे शक्य नाही.
त्यामुळे सद्यःस्थितीत होत असलेली गुंडी अवस्थेतील गळ ही नैसर्गिक आहे. ही गळ होऊन फळांचे ‘सेटिंग’ झाल्यानंतर तापमान वाढीमुळे होणारी गळ ही अपेक्षित उत्पादनाचे नुकसान करू शकते. तापमान वाढल्यानंतर एप्रिलपासून हा धोका संभवतो.
हसनाबादवाडीत शास्त्रज्ञ भेट
मोसंबी केंद्रातर्फे हसनाबादवाडी (ता. औरंगाबाद) येथे आयोजित सोमवारी (ता. १३) शास्त्रज्ञाच्या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोसंबी बागायतदार प्रेमसिंग गोलवाल, कपूरचंद जारवाल, प्रताप गोलवाल, सुरेश पांडूळे आदींची उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.