आई : ईश्‍वरांचा ईश्‍वर

मातृत्वप्राप्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी ती कितीतरी नवस करते, देवाला साकडे घालते, देवाची पायी वारी करते.
Mother
MotherAgrowon

रामदास वाघ

मातृत्वप्राप्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी ती कितीतरी नवस करते, देवाला साकडे घालते, देवाची पायी वारी करते. जेव्हा तिची मनोकामना पूर्ण होते, तेव्हा तिला जग जिंकल्याचा आनंद होतो. सारं आभाळ डोक्यावर घेऊन तिचं मन गर्जना करते, पंचमहाभूतांनो दशदिशांना संदेश पोहोचवा, की मी आई झाले; हो, हो मी आई झाले! तिच्या गगनात न मावणाऱ्या आनंदाचे वर्णन करणं शक्य तरी आहे का?

Mother
Agriculture Technology : टरफलासह शेंगांचा ‘एक्स-रे’ देईल गुणधर्माची माहिती

घरात अठरा विश्‍व दारिद्र्य असो का, डोक्यावर छप्पर नसो, सासूचा जाच असो, का नवरा व्यसनी असो; ती मात्र पुत्रप्राप्तीच्या आनंदात त्रिभुवनाची सम्राज्ञी होण्याचे भाग्य अनुभवते, कृष्णाचा जन्म झाला, तेव्हा देवकी कंसाच्या तुरुंगात बंदिस्त होती. देवकी स्त्री म्हणून बंदिस्त होती, पण जेव्हा तिने पुत्राला जन्म दिला; तेव्हा ती माता म्हणून मुक्त झाली. अहो, मातृत्वाला तुरुंगात डांबून ठेवेल अशी यंत्रणा उदयाला येणे शक्य नाही. येशूचा जन्म झाला, तेव्हा मेरी एका गोठ्यात आश्रयाला होती. त्याचा जन्म होताच गोठा तीर्थक्षेत्र झाले अन् मेरी जगन्माता!

स्त्री जेव्हा फक्त स्त्री असते, तेव्हा ती एक दिव्य तेज असते. पण जेव्हा ती माता होते, तेव्हा स्वर्गाचे तेजही तिच्यापुढे फिके पडते. वंशाला दिवा देणारी सून घराण्याची भाग्यलक्ष्मी ठरते. सिंहासनाला वारस देणारी राणी राजमाता ठरते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे कविवर्य यशवंत आपल्या कवितेत म्हणतात. तिन्ही जगाचा स्वामी म्हणजे परमेश्‍वर. त्याला आई नव्हती. तो आईविना पोरका होता. आपण किती भाग्यवान आहोत, आपल्याला आई आहे. विनोबाजी म्हणतात, आई म्हणजे ईश्‍वरांचा ईश्‍वर. एवढी थोर व्यक्ती आपल्या घरात असते, याहून दुसरे भाग्य तरी कोणते? जिजाईसारखी आई होती म्हणून सामान्य शिवबा छत्रपती झाला.

Mother
Agriculture Department : कृषी ‘उद्योग’ करण्यासाठी ‘डीबीटी’चे कवच काढले

श्यामच्या आईने नव्हे का श्यामला घडवले. सामान्य श्याम महाराष्ट्राचे साने गुरुजी झाले. आई किती काळजी घेते आपली. पोटातील अर्भकाला जिवापाड जपते. त्याच्या संवर्धनासाठी कितीतरी पथ्ये पाळते. खाण्यावर नियंत्रण ठेवते. चालताना, बसताना, उठताना अतिशय दक्ष असते. थोर पुरुषांची चरित्रे वाचते. साधुसंतांचे अभंग गाथा पोथ्या वाचते. विवेकानंद, राम, कृष्ण, शिवाजी महाराज, गांधीजी, श्याम, भगतसिंग, शिरीष अशा थोर पुरुषांची चित्रे झोपण्याच्या खोलीत भिंतीवर लावते. अर्भकावर सुद्धा संस्कार व्हावेत म्हणून ती काळजी घेते. असे म्हणतात, की श्रीकृष्णाने चक्रव्यूहात शिरण्याची सुभद्रेला सांगितलेली कथा अभिमन्यूने गर्भातच ऐकली होती. प्रसूतीच्या वेदनांनंतर प्राप्त झालेले मातृत्व तिला जगातील सर्व वैभवांपेक्षा श्रेष्ठ वाटते.

वांझोटी असलेली एक महाराणी मूल दत्तक घेण्यासाठी संपूर्ण नगरीत फिरते. घरोघरी जाते, मुलाची भीक मागते. पण कोणतीच आई आपले मूल द्यायला तयार होत नाही. दारिद्र्यात सुद्धा मातृत्व हार पत्करत नाही. मातृत्व ही काही विकत घेण्याची गोष्ट नाही. ती एक महान आणि मंगल साधना आहे. म्हणून तर आईला थोर तपस्विनी म्हणतात. घरात अठरा विश्‍व दारिद्र्य असणारी मातासुद्धा राणीला आपले मूल देत नाही. कारण त्या मुलाच्या नसानसांत तिच्या संस्काराची संजीवनी वाहत असते. आपल्या मुलाच्या संगोपनात तिच्या आयुष्याच्या उज्ज्वल क्षणांचे तेज ती अनुभवत असते.

आई जीवन जगण्यासाठी आपल्याला समर्थ बनवते. जगण्याचे भान देते. अस्तित्वाची जाण निर्माण करते. असे काही संस्कार आपल्या बाळावर करते, की जेणेकरून तो रामासारखा पुरुषोत्तम व्हावा. शिवबा सारखा महाराष्ट्र धर्म जोपासणारा छत्रपती व्हावा. विवेकानंदांसारखा तेजस्वी तारा व्हावा. आपला पुत्र जगात स्वाभिमानाने ताठ मानेने जगणारा एक तेजस्वी स्फुल्लिंग होण्यासाठी ती वाटेल त्या खस्ता खाते. जळणाऱ्या ज्योतीप्रमाणे त्याच्या आयुष्यात फक्त प्रकाश पेरण्याचे काम करते.

त्याला फक्त आनंद देते. दुःख स्वतःच्या काळजात लपवून ठेवते. पोराचे दोष पोटात घालून त्याला क्षमा करते. त्याच्या आयुष्यातील सारी वादळे ती लीलया परतवून लावते. संकटांना हसत हसत सामोरी जाते. ऊन वारा थंडी पावसात ती त्याला पदराखाली पोटाशी कवटाळते. थंडीत त्याची गोधडी होते, तर उन्हात सावली. त्याची भूक शमविण्यासाठी ती भाकर होते तर तहान भागवण्यासाठी अमृताची धार. त्याच्या आयुष्यात प्रकाश देण्यासाठी ज्योत होऊन जळते तर संकटात काळीज जाळते. संसार उद्‍ध्वस्त होतो, तेव्हा ती भूक जाळते आणि आकाश फाटते तेव्हा ती आधार होते. अशी त्यागमूर्ती आपली आई असते, म्हणून तर आपण भाग्यवान आहोत. प्रकाश देता देता जळता जळता संपणाऱ्या मेणबत्तीसारखी असते ना आई ! अहो, ऊन झळा अंगावर झेलणारी बोधी वृक्षाची अमर छाया असते आई!

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com