World Soil Day 2022 : संतुलित आहारासाठी भूमातेचे आरोग्य महत्त्वाचे

World Soil Day 2022 : संतुलित आहारासाठी भूमातेचे आरोग्य महत्त्वाचे

२०१४ पासून दरवर्षी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षीच्या मृदा दिनाची थीम (संकल्पना) आहे, ‘‘जमीन - जेथून अन्नाची सुरुवात होते.’’

पिकाचे आरोग्य (Crop health) हे जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. संतुलित अन्नद्रव्यांनी युक्त अशा अन्नधान्याच्या उत्पादनावरच मानवाचा किंवा पशूंचा (Animal) संतुलित आहार अवलंबून असतो. संतुलित आहारावरच मानवाचे आरोग्य आधारलेले आहे. म्हणजे आरोग्याची (Health) सुरुवातच मुळी जमिनीपासून होते. मानवाला आवश्यक असलेल्या १८ अन्नद्रव्यांपैकी १५ अन्नद्रव्ये जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये हवेतून मिळतात.

World Soil Day 2022 : संतुलित आहारासाठी भूमातेचे आरोग्य महत्त्वाचे
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

म्हणूनच जमिनीचे आरोग्य जपणे हे मानवाचे, त्यातही शेतकऱ्यांचे आद्यकर्तव्य आहे. हजारो वर्षापासून आपल्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविणाऱ्या जमिनीचा पोत अनेक कारणामुळे ढासळत आहे. हवामानातील बदल, शेतीखालील जमीन कमी होतानाच वाढत्या लोकसंख्येच्या भुकेचा प्रश्‍न सोडवणे अवघड होणार आहे.

पिकासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता ः

दगड-मातीपासून तयार झालेली माती ही निर्जीव भासत असली तरी तिच्या उदरातील कोट्यवधी जीव-जिवाणू, गांडुळे व अन्य सजीवामुळे तिला सजीवता प्राप्त होते. जमिनीतील खनिजे, अन्नद्रव्यांच्या साह्यानेच वनस्पतींची वाढ होते. जमिनीत उपलब्ध असलेली खनिजे, अन्नद्रव्येच वर पिकामध्ये येतात. सूर्यप्रकाशामध्ये संश्‍लेषणाची क्रिया करण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसह कॅल्शिअम, सल्फर, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, मँगेनीज आणि कॉपर अशी अन्नद्रव्ये आवश्यक असतात.

स्फुरद (फॉस्फरस) या अन्नद्रव्यामुळे पिकाच्या मुळांची चांगली वाढ होते. थंडीमध्ये पीक चांगले वाढते. बी- फळांची वाढ होते.

पालाशमुळे (पोटॅश) पिकामध्ये कर्बोदके तयार होणे व वहनाची प्रक्रिया होते. पीक उत्पादनाची प्रत सुधारते. पीक पाण्याचा ताण सहन करते. रोग-किडीसाठी प्रतिकारक्षम बनते.

सल्फरमुळे पिकाची पुनरुत्पादन क्षमता वाढते. पिकाची पक्वता लवकर होते. पिकाच्या मुळांवर जिवाणूंच्या गाठी वाढतात. जमिनीमध्ये उपयुक्त विकरांचे (एन्झाइम्स) प्रमाण वाढते.

मॅग्नेशिअममुळेही विकरांचे प्रमाण वाढते. फॉस्फरस आणि लोह यांची कार्यक्षमता वाढते.

कॅल्शिअममुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे कार्य वाढते. धान्ये, फळांची पक्वता सुधारून गुणधर्म वाढतात.

लोहाचे प्रमाण चांगले असेल तर पिकामध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते.

झिंकमुळे बी- फळे जास्त तयार होतात.

बोरॉनमुळे पिकातील पेशीभित्तिका भक्कम होऊन पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारते.

World Soil Day 2022 : संतुलित आहारासाठी भूमातेचे आरोग्य महत्त्वाचे
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

मॉलिब्डेनममुळे विकरांचे प्रमाण व मुळांवर जिवाणू गाठी वाढतात.

क्लोरीनमुळे लहान आकाराच्या धान्याची पक्वता लवकर होते.

कॉपरमुळे पिकाचे पुनरुत्पादन क्षमता वाढते. पिकाच्या उत्पादनाला एक वेगळा सुगंध येतो.

सिलिकॉनमुळे पिकाची रोग-कीड प्रतिकारक्षमता सुधारते.

मानवी शरीरामध्ये अन्नद्रव्याचे कार्य ः

सोळा मुलद्रव्यांपैकी प्रत्येक मूलद्रव्य कमी अधिक प्रमाणात पीक उत्पादनात, अन्नधान्याच्या प्रतीमध्ये मोलाचा वाटा उचलते. या व्यतिरिक्त पीक हवेतून ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन घेतले जाते. कोणत्याही घटकाची कमतरता भासल्यास उत्पादनावर, गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होतो. कमतरता असलेले अन्न दीर्घकाळ आहारात असल्याचे आज अनेक अनिष्ट परिणाम मानवाच्या आरोग्यावर दिसत आहे. ती जाणून घेण्यासाठी मानवी शरीरामध्ये ही अन्नद्रव्ये नेमकी काय काम करतात, ते पाहू.

मॅग्नेशिअममुळे  प्रतिकारक्षमता वाढते.

सल्फर हा प्रथिने तयार करण्यासाठी उपयोगी पडतो.

चेतासंस्था तसेच स्नायूंच्या बळकटीकरणासाठी पोटॅश, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमची गरज असते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, रक्त साकळणे तसेच प्रतिकारक्षमता बळकट करण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.

रक्तातील प्रथिने, डी.एन.ए., आर.एन.ए.चे चांगले प्रमाण ठेवण्यासाठी नायट्रोजन लागतो.

क्लोराइडमुळे पचनसंस्था भक्कम होते तर पोटातील आम्लता संतुलित ठेवण्याचे काम फॉस्फरस करतो.

शरीरात पाण्याचा अंश संतुलित प्रमाण ठेवण्याचे काम पोटॅश करतो.

झिंकमुळे प्रजनन संस्था, गर्भाची चांगली वाढ होते. शरीरातील विकरांचे प्रमाण वाढते. प्रथिने, डी.एन.ए., आर.एन.ए. यांचे प्रमाण वाढते आणि शरीराची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते.

लोहामुळे मेंदूची, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते. पेशींना प्राणवायूचा पुरवठा चांगला घेऊन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

कॉपरमुळे लोहाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

शरीरात उपयुक्त विकरांचे (एन्झाइम्स) मुख्य घटक आहेत मँगनीज, मॉलिब्डेनम आणि कॉपर.

कॅल्शिअम, बोरॉन आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होतात.

पिकाच्या वाढीसाठी जशी अन्नद्रव्यांची गरज असते, तशीच माणसाच्या वाढीसाठी सुद्धा असते. म्हणजेच मानवाचे आरोग्य हे जमिनीच्या आरोग्यावरच अवलंबून असते. मातीतील अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडल्यामुळेच मानवाचे आरोग्य आणि जीवनच  असंतुलित होत चालले आहे. जगामध्ये २०० कोटी लोकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे.

World Soil Day 2022 : संतुलित आहारासाठी भूमातेचे आरोग्य महत्त्वाचे
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

उत्पादनाच्या अपेक्षेने आपण रसायनांचा असंतुलित वापर करू लागलो आहोत. त्यातून मातीची सजीवताच पणाला लागली आहे. भविष्यात केवळ उत्पादन वाढवण्याचेच नव्हे, तर अन्नधान्यातील पौष्टिकता वाढवण्याचेही आव्हान आपल्यासमोर उभे राहणार आहे. आज देशातील ६४ टक्के जमिनीमध्ये लोहाची कमतरता, ५२ टक्के जमिनीमध्ये झिंकची कमतरता तर ४२ टक्के जमिनीमध्ये इतर अन्नद्रव्यांची कमतरता आहे. आपल्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी, फॉस्फरसचे प्रमाण मध्यम तर पोटॅशचे प्रमाण भरपूर आहे.

सेंद्रिय पदार्थ ः सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यातील सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण घटले आहे. जमिनीला जिवंत- कार्यक्षम ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागेल. पशुपक्ष्यांचे शेण- विष्ठा, पिकाचे अवशेष हेच खरे जमिनीचे अन्न आहे. पिकांच्या अवशेष आच्छादन करणे, जमिनीमध्ये गाडणे, यावर भर द्यावा.

कमी मशागत ः अलीकडे मोठ्या मोठ्या ट्रॅक्टर व यंत्रांची उपलब्धता झाल्यामुळे जमिनीची उलथापालथ मोठ्या प्रमाणात केली जाते. शून्य किंवा किमान मशागतीचे तत्त्व अवलंबले पाहिजे.

विश्रांती ः सलग पिके घेण्याचा दबाव सर्वांवर असला तरी जमिनीला काही दिवस विश्रांती देणे गरजेचे आहे.

पिकांचे फेरपालट ः एकाच पिकाची सातत्याने लागवड करण्यापेक्षा पिकांची शास्त्रीय पद्धतीने फेरपालट केली पाहिजे.

प्रमाणात पाणी ः शेत जमीन पाण्यात बुडविण्यापेक्षा वाफसा स्थिती करण्याकडे लक्ष द्यावे. अति पाण्यामुळे मातीतील प्राणवायू कमी होतो. जीव-जिवाणू मरतात. क्षार  वाढतात. सामू वाढतो.

जमिनीची धूप रोखणे ः नैसर्गिक आणि मानवी कारणामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. महाराष्ट्रात दरवर्षी ७७.३५ कोटी टन माती पाण्यातून वाहून जाते. त्यासाठी आवश्यक ते सर्व मृदा आणि जलसंवर्धनाचे उपाय परिसरात व शेतात करावेत.

ही सर्व ग्रामस्थांची व शेतकऱ्याची जबाबदारी आहे. कारण आपण स्वतःला ‘भूमातेची लेकरे’ म्हणवतो. या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमध्ये आवश्यक ती मदत शासनकर्ते, संशोधक, विस्तारक यांनी केली पाहिजे. शहरी असो ग्रामीण सर्वांचीच ही जबाबदारी आहे.

डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com