आईचे दूध पृथ्वीवरचे अमृतच

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) आणि युनिसेफ या संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट या सात दिवसाच्या कालावधीत स्तन्यपान सप्ताह राबविण्यात येतो.
Mother's milk
Mother's milkAgrowon

वैद्य श्रीधर पवार

जन्मजात बाळाला सर्वांत प्रथम द्यायचा आहार म्हणजे आईचे दूध (Mother's milk) , हे दूध त्या बाळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करायचे काम करते. म्हणून आईचे दूध हे त्या बाळासाठी अमृतच आहे. आताच्या काळामध्ये अनेक महिलांमध्ये मुलांना वरचे दूध किंवा पावडरपासून तयार केलेले दूध द्यायचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक महिला स्तन्यपानाबाबत दुर्लक्ष करताना दिसतात.

स्तन्यपान सप्ताहाची गरज का?

आपल्या देशामध्ये बालकांना योग्य प्रमाणात पोषक घटक न मिळाल्याने होणाऱ्या कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी बाळाला जन्मानंतर लगेच स्तन्यपान देणे गरजेचे आहे. स्तन्यपान कसे आणि किती वेळा करायचे याबाबत योग्य माहिती नसल्याने होणारे मृत्यू रोखण्यासाठी त्याबाबत जाणीव जागृतीकरिता स्तन्यपान सप्ताहाची आवश्यकता असते.

स्तन्यपान सप्ताहाचा इतिहास

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) आणि युनिसेफ या संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट या सात दिवसाच्या कालावधीत स्तन्यपान सप्ताह राबविण्यात येतो. संपूर्ण जगामध्ये १९२ पेक्षा जास्त देश स्तन्यपान सप्ताह साजरा करतात. १९९२ पासून स्तन्यपान सप्ताह साजरा करण्यास सुरुवात झाली. शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या जागतिक स्तन्यपान सप्ताहासाठी ‘स्तन्यपानाच्या प्रगतीचे पाऊल शिकवूया आणि आधार देऊया’ ही थीम निश्‍चित करण्यात आली आहे.

स्तन्यपानाचे बाळाला फायदे

स्तन्यपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी स्निग्ध घटक या सर्वांचा दुधात योग्य प्रमाणात समावेश असतो. आईच्या शरीरातील रोगप्रतिकारक घटक काही सामान्य विषाणू/जिवाणूंना ॲण्टिबॉडी बनवतात आणि त्या ॲण्टिबॉडी आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात पोहोचतात.

ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गापासून, अॅलर्जी यांसारख्या रोगांना प्रतिकार करणे शक्य होते. आईचं दूध पिणाऱ्‍या बाळांमध्ये अतिसार, बद्धकोष्ठतासारख्या समस्या जास्त उद्‍भवत नाही.

त्यांची श्‍वसन प्रणालीदेखील चांगली राहते. त्यामुळे लहान मुलांना सर्दी, न्यूमोनिया किंवा अशा इतर आजार होण्याची शक्यता कमी असते. स्तन्यपानामुळे मुलांच्या मेंदूचा विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमताही उंचावते. स्तन्यपान हे अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा आहे.

माता आणि मुलांमधील भावनिक बंध

स्तन्यपानामुळे आई आणि मुलाचे नाते दृढ होते. आईच्या शरीरातील हार्मोन्स आई आणि मुलाच्या भावनिक बंधनाला दृढ बनवतात. त्यामुळे प्रसूतीनंतर नैराश्यात जाण्याची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे स्तनपानामुळे आत्मविश्‍वासाची भावनादेखील वाढते.

स्तन्यपानाचे मातेस होणारे फायदे

स्तन्यपानाचे मातेच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. स्तन्यपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते. स्तन्यपान करणाऱ्‍या स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग, अस्थिरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी असतो. स्तन्यपान केल्याने गर्भधारणेआधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते.

स्तन्यपान कधी करावे

बाळ रडते आहे म्हणजे त्याला भूक लागली असेल असा सर्वसाधारण समज आहे. प्रत्येक वेळी बाळ रडत आहे म्हणजे त्याला भूक लागली असेल असे समजणेदेखील चुकीचे आहे. स्तन्यपान एवढ्याच वेळा करावे असा कोणताही नियम नाही. काही बालके दर २-२ तासांनी, दर ३-३ तासांनी, तर काही दर ४-४ तासांनी दूध पितात. म्हणून बाळ झोपले असताना स्तन्यपानासाठी जागे करणे, किंवा बाळ रडत आहे, पण दूध पाजायची वेळ झाली नाही म्हणून न पाजणे हे चुकीचे आहे.

बाळ एकदा दूध पाजल्यानंतर पुढील २-३ तास रडत नसेल, गाढ झोपत असेल, त्याचे वजन जेवढे वाढणे गरजेचे आहे तसे वाढत असेल, म्हणजे जन्मानंतरच्या दहाव्या दिवसापासून पुढील ३ महिन्यांपर्यंत प्रत्येक दिवसाला २५ ग्रॅम एवढे, म्हणजे बालकाला योग्य मात्रेत दूध मिळत आहे असे समजता येते.

स्तनदा मातेचा आहार कसा असावा

आहारात लोहाचे प्रमाण मुबलक असावे यासाठी नाचणी, बाजरी, डाळी, मटण, हिरव्या भाज्या या पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. भाज्या लोखंडी भांड्यात बनवून घ्याव्या. त्यात भाज्या बनवल्यास त्यातून मिळणारी लोहाची मात्रा अधिक असते. प्रत्येक भाजी आणि फळात विशिष्ट खनिज, जीवनसत्त्व असते. त्याचा फायदा मिळविण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे रोज त्यांपैकी एक फळ खाणे फायदेशीर आहे.

Mother's milk
शंभर टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्या:झुनझुनवाला

ऋतूनुसार उपलब्ध असणाऱ्या फळांचे सेवन फायदेशीर आहे. चेरी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, सफरचंद, भोपळा, संत्री, अननस, पपई, आंबा, केळी यांचा समावेश करावा. आहारात लाल माठ, खजूर, गूळ, ज्वारी, तांदूळ, नाचणीची भाकरी, दूध, दही, अंडी हेही आहारात असावेत. आईने या अन्नपदार्थांचा आहारामध्ये ठरवून समावेश केल्यास तिचे प्रकृतिमान सुधारते व त्यातून बाळाची सक्षम वाढ होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com