`नाफेडच्या कांदा खरेदीत मोठा गैरप्रकार`

दोषींवर कारवाईची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी
 कांदा
कांदाagrowon

पुणेः कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु केली. महाराष्ट्रात सुरु असलेल्या कांदा खरदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे. परंतु मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाफेडमार्फत सुरु असलेल्या कांदा खरदीची चौकशी करून दोषी संस्था व अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच योग्य प्रकारे कांदा(Onion) खरेदी सुरु ठेवावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्य‍ाना पाठवलेल्या निवेदनात केली.

निवेदनात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घटनवट म्हणाले की, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाले. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले. कांद्याचे दर सावरण्यासाठी शासनाने, मुल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरु केली. प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर वेगवेगळे आहेत. नाफेडने (Nafed)काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संघांना खरेदी करणार्‍या शेतकरी उत्पादक कंपन्या नेमण्याची जबाबदारी दिली. नाफेड मार्फत किमान १५ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जाईल ही अपेक्षा होती. मात्र कांदा खरेदी दहा रुपये किलो दरापेक्षाही कमी दराने होत आहे. प्रत्यक्ष शेतकर्‍यांकडून नावापुरता कांदा खरेदी केला जात असून बाकी कांदा व्यापार्‍याकडूनच खरेदी केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पळली जात असून काही माहिती देण्यास पिंपळगाव बसवंत येथील ब्रॅंच मॅनेजर शेलेंद्र कुमार टाऴाटाळ करत आहेत. आता स्वस्तात खरेदी केलेला कांदा पुढे जास्त दराने खरेदी केला, असे रेकॉर्ड तयार करून शासनाला लुटण्याचे प्रकार मागील खरेदीच्या वेळेस झाले होते. या वेळेही असेच होईल, अशी शंका घनवट यांनी निवेदनात व्यक्त केली.

शासनाने शेतकर्‍यांसाठी दिलेला पैसा असे लबाड अधिकारी, व्यापारी व शेतकरी उत्पादक कंपन्या लूटत आहेत. हा प्रकार त्वरित थांबवून आतापर्यंतच्या सर्व कांदा खरेदीची कसून चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, गैर प्रकारात सामील असलेल्या व्यापारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे परवाने व नोंदणी रद्द करून अपहरण केलेली रक्कम वसूल करावी. ब्रॅंच मॅनेजर शैलेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रकार सुरू असल्यामुळे त्यांना तातडीने या पदावरून हटवावे. त्याजागी एक प्रामाणिक अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशा मागण्या स्वतंत्र भारत पक्षाने केल्या. कांदा खरेदीची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास १५ जूननंतर पिंपळगाव बसवंत यथील नाफेडच्या कार्यालयाला कुलुप ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पणन मंत्री, नाशिक जिल्हा उपनिबंधक यांना पाठवलेल्या निवेदनात दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com