निसर्ग माझा सखा...
NatureAgrowon

निसर्ग माझा सखा...

माणसांच्याच वागण्याने दुखावलेल्या मनाला हळुवार फुंकर घालणारा जवळचा साथी म्हणजे निसर्ग. शारीरिक व्याधीमुळे आलेले औदासिन्य असो, की अनेक कारणांनी आलेली निराशा असो, जगण्याची नवी उमेद देणारा, सकारात्मकता निर्माण करणारा असतो तो निसर्ग.

लग्न झाल्यावर स्रियांचे आयुष्य अनेकदा बदलून जाते. लहानपणापासून ज्या घरात वाढलो असे घर सोडून जायचे असते. दुसऱ्यांचे घर, दुसरी माणसे यांच्याशी नव्याने जुळवून घेत आयुष्याचा डाव मांडायचा असतो. हे ‘आयुष्याचे स्थलांतर’ सुखकर झाले तर ठीक, नाहीतर जगणे रडगाणे होऊन बसते. ज्यांना आयुष्य संपायच्या आधीच याची जाणीव होते, त्या स्त्रिया हे रडगाणे नक्कीच नाकारतात. स्वतंत्रपणाने जगण्याची लढाई लढण्यासाठी समर्थपणे उभ्या राहतात. अशीच एक मैत्रीण लग्नानंतर २० वर्षांनी बाहेर पडली. तिने २० वर्षे भोगलेल्या दुःखातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. थोडी स्थिर झाली आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी निसर्गाकडे जाऊ लागली. थेट पोहोचली ती केदारनाथला. मनमुराद फिरली, ट्रेकिंग केले. बर्फवृष्टीचा अनुभव मिळाला. या अनुभवाविषयी बोलताना ती म्हणते.. ‘‘मी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने जगतेय असे वाटायला लागले. जगण्याबद्दल आसक्ती निर्माण झाली.” तिच्या बोलण्यातील तो प्रचंड उत्साह आणि आनंद... ही सगळी जादू निसर्गात मिळालेल्या त्या अनुभवांमुळे झाली.

माणसांच्याच वागण्याने दुखावलेल्या मनाला हळुवार फुंकर घालणारा जवळचा साथी म्हणजे निसर्ग. शारीरिक व्याधीमुळे आलेले औदासिन्य असो, की अनेक कारणांनी आलेली निराशा असो; जगण्याची नवी उमेद देणारा, सकारात्मकता निर्माण करणारा असतो तो निसर्ग. अंधारात निसर्गाच्या सान्निध्यात शांत बसून राहणे असो, की हिरवाईच्या कुशीत हुंदडणे असो किंवा डोंगराच्या टोकावर पोहोचल्यावर भेटणारा निसर्ग असो, या सगळ्याने आनंदाच्या शिखरावर नक्कीच पोहोचता येते. या काळात आलेले अनुभव हे आयुष्यभर पुरतील अशा रम्य आठवणींची शिदोरी सोबत देतात.

यवतमाळ जिल्ह्यात काही कामानिमित्त जायचे होते. म्हणून आदल्या दिवशी तेथून जवळच असणाऱ्या संतोषच्या गावी मुक्काम करायचे ठरवले. या भागात त्याचे पाण्यावर मोठेच काम सुरू होते. ज्यांची लोकसंख्या अतिशय कमी झालेली आहे, अशा परधान आदिवासी समूहाचे वास्तव्य या भागात आहे. तसेच विविध समूहांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य येथे आढळते. मिश्र संस्कृती असणारा हा भाग. कापूस व आता सोयाबीन याची शेती येथे होते. याबरोबर इथल्या भागात मोठा बदल झाला तो म्हणजे घरासाठी लागणारा भाजीपाला, धान्य, इतकेच काय परसबागेत चार भाजीची झाडे सुद्धा लोक येथे लावताना दिसली नाहीत. पूर्वी कापसासोबत मिश्र शेतीपद्धती म्हणजे ज्वारीसारखी भरडधान्य, तेलबिया, कडधान्य इत्यादी पिकत असे. आता साधे एक मिरचीचे रोपटे देखील लावले जात नाही. कापूस व सोयाबीन ही पिके हवामान साधले तर नीट येणार. आलेले पीक विक्रीसाठी बाजारावर अवलंबून. घरच्या शेतीतून अन्नाची सुबत्ता-स्वयंपूर्णता नाही. अन्नधान्य-कपडालत्ता सर्वच गरजा भागविण्यासाठी बाजारावर अवलंबून असणारे इथले शेतकरी. दरवर्षी पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक निविष्ठांचे खर्च वाढतच जातात आणि शेतकरी कर्जबाजारी. मग सगळ्यात जास्त ‘शेतकरी आत्महत्या’ होणारा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळाला तर त्यात नवल काय? कळंब तालुक्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

योगायोगाने त्या दिवशी उमरखेडला जाण्याचे ठरले. या तालुक्याला लागून सुंदर असे जंगल आहे. त्या दिवशी त्या गावात पोहोचायला

संध्याकाळ उलटून गेली होती. संतोषचे घर गावातच होते. घरची मंडळी अतिशय प्रेमळ. जंगलाचे नाव काढले की भीती असेच काहीसे त्यांचे मत. जंगलात अस्वले हल्ला करतात. पंजाने माणसाच्या डोक्याची कवटी फोडतात असे भयंकर किस्से ते सांगत होते. कुणाकुणावर कसे हल्ले झालेत, कधी झालेत असे बरेच काही. शेतातली पिके फस्त करायला अस्वले किंवा रानडुकरे येथे येतात. आपल्या जिवाचे संरक्षण करतानाच पिकाचे देखील संरक्षण करावे लागते. जंगलात जाणे कसे धोकादायक आहे हे पुरेपूर पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते. आधीच जंगलात पोहोचलेल्या लोकांसाठी घरी जेवण बनत होते. ते घेऊन मी व प्रदीप जंगलात जाणार होतो आणि रात्रीचा मुक्काम तेथेच करणार होतो.

डिसेंबर महिन्यातले थंडीचे दिवस होते ते. विदर्भात जसा कडक उन्हाळा असतो तसा गोठवणारा प्रचंड हिवाळा. जंगलात अशा रात्री उघड्यावर काढणे हे मोठे थ्रिल होते. काळ्याकभिन्न रस्त्यावर चुकूनही एखादे घर, वस्ती किंवा माणूस दिसायची सुतराम शक्यता नव्हती. दुतर्फा उंच वाढलेली झाडी, त्यातून पांदीवजा कच्चा बैलगाडीचा रस्ता. बाइकवरून तेथे पोहोचताना प्रदीपचा गाडी चालवण्याचा अनुभव कामी येत होता. खसपसले की कुठून अस्वल येईल का, बिबट्या दिसेल का याची भीती आणि उत्सुकताही होती. कॅम्पच्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो तेव्हा मंडळी वाटच बघत होती. एका ओढ्याच्या काठी खडकावर मोठ्या चार शेकोट्या पेटवून मंडळी थंडी घालवत बसली होती. शेकोटीच्या पडणाऱ्या उजेडाने कोणतेही जंगली जनावर इकडे येण्याची शक्यता नव्हती. त्या वेळी गप्पांची मैफील, ते माळरानातले रात्रीचे जेवण आणि जेवण झाल्यावर ओढ्याचे ओंजळीने प्यायलेले पाणी अजूनही डोळ्यासमोर आहे. शतपावली म्हणून ओढ्याच्या प्रवाहाबरोबर कोठे खेकडे-बेडके दिसतात का हे पाहत फिरलो. आजूबाजूला कोठेही माणसाचा वावर नाही. जंगली प्राणी आमच्याच आजूबाजूला कुठे दबा धरून बसलेली असतील. एखाद्या सापाने कोठेतरी बेडूक किंवा उंदीर पकडून स्वतःचा उदरनिर्वाह केला असेल. कित्येक घडामोडी या वेळेत आजूबाजूला घडत असतील. पण आमचे वर्तुळ सोडून इतर कोठे या रात्रीच्या वेळी फिरायची आमची हिंमत नव्हती. तेथेच बसून खूप वेळ उघड्या आकाशाखाली आम्ही गप्पा करत बसलो. मला कामासाठी लवकर पोहोचणे आवश्यक होते म्हणून पुन्हा पहाटेच मी परत निघाले. रस्त्यात एक रानमांजर मात्र आम्हाला आडवे गेले. उमरखेडला येऊन यवतमाळकडे जाणारी पाच वाजताची पहिली एस.टी. मी पकडली. पण सोबत येताना एका आगळ्या अनुभवाची भर कायमची स्मृतीत विसावली. जंगलात प्राणी दिसणे न दिसणे हा योगायोगाचा भाग; पण त्यासोबत तिथला निसर्ग, तिथली माणसे, त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या सवयी आणि त्यांच्या गप्पा-किस्से यांनी आपण समृध्द होत जातो. यालाच तर पर्यटन म्हणत असावेत.

निसर्गाच्या अशा रम्य गोष्टींचे आकर्षण माणसाला पहिल्यापासून वाटत आलेच आहे. लहानपणी आपण चिनी प्रवाशांच्या गोष्टी वाचायचो. त्या वेळी ते अद्‍भुत वाटायचे. या प्रवासात परक्या ठिकाणची संस्कृती, भाषा, आचार-विचार यांची देवाण-घेवाण होत असणर. त्याबरोबरच झाडांचीही अदली-बदली, पिकांच्या बियांची देवाण-घेवाण अशा कितीतरी गोष्टी पूर्वी घडल्या असतील. उदाहरणार्थ, बोगनवेली किंवा कागदी फुले म्हणून आपण रस्त्याच्या कडेला, दुभाजकांवर दिसणारी किंवा घरांच्या कुंपणावर आढळणारी ही विविधरंगी फुले येणारी झुडपे. अमेरिकेत कुठल्याशा बेटावर उमललेली ही फुले कुणा ब्रिटिश सैनिकाने पाहिली. इंग्लंडच्या राणीला भेट म्हणून त्याने काही रोपे आणली आणि ती आता सगळीकडे पाहायला मिळतात. आपल्याकडे नाथपरंपरा सर्वांना माहीत असेल. तर नवनाथ ज्या मार्गाने प्रवास करत त्या मार्गात ते गोरखचिंचेचे झाड लावून जात. असे लोक मानतात. त्यातून या औषधी झाडांची लागवड आपल्याकडे झाली. अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण आपणास पाहावयास मिळते. काही लोक आपल्या प्रवासाचे, अनुभवांची वर्णने लिहून ठेवतात. त्यातून पुढे शेकडो वर्षानंतर देखील त्या काळची त्या ठिकाणची समाजरचना, निसर्ग सर्व काही समजून घेता येते. काही लोक प्रवास वर्णनाबरोबरच तेथील समाजोपयोगी लोकज्ञानाचे दस्तऐवजीकरण करून ठेवतात. भविष्यात अनेक पिढ्यांना ते उपयोगी पडते.

काही लोकांना जवळचा निसर्ग बघण्यास आवडते तर काहींना देशोदेशी फिरण्यास आवडते. भारतात तर अशा अनेक जागा आहेत, की ज्यांचे पर्यटन करायचे म्हटले तर एखाद्याला आपला एक जन्म त्यासाठी द्यावा लागेल. आपल्या प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य पहावयास मिळते. त्यामुळे माझ्यापुरते मी तरी ठरवले आहे, की आधी महाराष्ट्र, देश समजून घ्यायचा; मग वेळ व पैसा असला तर इतर देश फिरायचे.

email –ranvanvala@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com