Maharudra Mangnale : माणसांसारखाचं निसर्गही बदलून गेलाय?
Rural Story : रात्रीचा पाऊस तासभर पडून साधारण साडेबारा वाजता थांबला.निसर्गाचं रौद्र रूप बघण्यासारखं होतं.खिडकीतून गदगदा हलणारी झाडं विजांचा चकचकाट झाली की दिसायची.
पाऊस थांबल्यावर विजेरी घेऊन बाहेर येऊन बघितलं,सगळीकडं पाणी वाहात होतं.पश्चिमेला अगदी समोर विजा चमकत होत्या.गडगडत होतं.मनोमन अंदाज केला..आणखी पाऊस येणार!
मच्छरदाणीत येऊन पडलो पण झोप येईना.यु ट्युबवर तलत महमूद यांची गाणी ऐकत डोळे झाकून पडून राहिलो.फार तर अर्धा तास झाला असेल पत्र्यावर पावसाचे थेंब वाजत होते.हा पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे होता.
वाऱ्याच्या झोतासोबत जाळीच्या खिडकीतून पावसाचा सपकारा मच्छरदाणीवर आला.लगेच उठून काचेची खिडकी लावली... पुन्हा पत्र्यावरचं संगीत ऐकत बसलो.पत्र्यावरचे आवाज सांगतात की,पाऊस किती मोठा आहे...झड आहे...मध्यम आहे... जोरात सुरू झाला.अंदाज बांधण्यात एक वेगळीच मजा असते... पडल्या जागी नेमक्या कोणत्या वेळेला डोळे झाकले ते कळलं नाही.
पहाटे पाचच्या अलार्मने जागं केलं.पण डोळ्यात झोप होती.तसंच उठून अंदाज घेतला.लाईट नव्हती.. अंधारात कशाला बाहेर जायचं,असा विचार करीत तसाच लोळत पडलो.पावणेसहाला उठून बाहेर आलो.दरवाजातच चार आंबे पडलेले दिसले. टोपलं घेऊन बागेत चक्कर मारली.
एकूण १७ आंबे पडले होते.अपेक्षेपेक्षा कमीच नुकसान होतं. गेटबाहेर आलो.लक्ष्मी बागेचं कुंपण तिन्ही बाजूंनी मोडून पडलं होतं.रबराच्या झाडाची आधाराची काठी निघाल्याने झाड अर्ध्यातून वाकलं होतं. दूरून बघितलं तेव्हा ते मोडलयंच असा समज झाला.त्याची काठी नीट रोवून,झाड सुतळीने काठिला बांधलं आणि बऱ्याच दिवसांनी डोंगरावर फिरायला गेलो.
बगिरा,डोडो सोबत होते.तिथून परतून शेततळ्यावर आलो.मुरमाड रानात जागोजाग पाणी वाहिलं होतं.काही ठिकाणी साचलंही होतं.....मात्र माहोल मस्तच होता.पावसामुळं सगळी झाडं टवटवीत दिसत होती.मी फिरत फिरत सुर्यादेवाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होतो...त्याचं दर्शन झालं..हाय.. हॅलो झालं नि मी रुद्राहटवर परतलो.
नरेश सकाळी आठ वाजता बाहेरगावाहून आला.तो बोलला,मामा लईच जोरात पाऊस पडलेला दिसतोय रात्री.मी म्हटलं,२० ते २५ मि.मी.पाऊस पडला असावा,असा अंदाज आहे माझा. सहज उत्सुकता म्हणून शाम कुलकर्णी यांना फोन केला...ते बोलले २१ मि.मी.ची नोंद झालीय भाऊ.मी म्हटलं,एवढा पाऊस तर अनेकदा पावसाळ्यात पण पडत नाही... दोघेही मस्त हसलो..
माणसांसारखाचं निसर्गही बदलून गेलाय...
तरीही मी निसर्गाचं स्वागतच करतो.तो त्याच्या मर्जीने चालणार.त्याच्या लेखी माणूस नावाच्या प्राण्याचं अस्तित्व नसावं. त्याच्या नावाने बोटं मोडण्याचा अधिकार आहे का मला?...नाहीच!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.