गरज आहे डोळस होण्याची!

खरंच आपल्यासोबत असणारा प्रत्येक माणूस आपल्याला नवी दृष्टी देत असतो. गरज आहे कधीतरी त्याच्याही डोळ्यांनी पाहण्याची... डोळस होण्याची !
Vision
VisionAgrowon

राजेंद्र उगले

‘दृष्टी तशी सृष्टी’ म्हणत आपण संस्कारित झालो आणि त्याच विचाराने बघत राहिलो सृष्टीला. त्यातूनच लागला नावीन्याचा, सृजनाचा शोध. समस्त लेखक वर्गाला तर या सृष्टीचं भारीच अप्रूप! त्यामुळेच सामान्य माणसाला जे त्याच्या डोळ्यांनी दिसत नाही; ते बघत असतो आपण कवीने लावलेल्या प्रतिभेच्या डोळ्यांनी. कवी लिहितो सृष्टीच्या अगाध लीला. जणू लीळाचरित्रच निसर्गाचं!

‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ म्हणत त्याच्या अनुभवातून आपणही पाहू जातो निसर्गाचं (Nature) हे सुंदर रुपडं आणि होतो अचंबित! कुठेही पर्यटनाला गेलो की तिथल्या वाटा, भूरूपे, झाडंझुडपं घालतात आपल्याला मोहिनी! निघून जातात तासन् तास हे रूप न्याहाळण्यात आणि निवलेले डोळे नितळ करत धरतो आपण घराची वाट. घरी आल्यावर करतो त्याचं रसभरीत वर्णन. कदाचित नसू आपण साहित्यिक वगैरे; पण अनुभवलेलं, पाहिलेलं ते वातावरण तात्पुरतं का असेना; करतो आपण ऐकणाऱ्याच्या डोळ्यापुढे हजर.

नुकतंच माझंही झालं छोटंसं पर्यटन. सोबत कुटुंब आणि मित्रवर्य रामदास शिरसाठ. आमचे रामभाऊ म्हणजे एक विनोदी, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. अनुभव म्हणजे माणसाला शहाणपण देणारं विद्यापीठ! हे रामभाऊंचं साधं तत्त्वज्ञान. प्रवासात कंटाळलेल्या माझ्या मुलाशी सहज गप्पा मारताना रामभाऊ म्हणाले, ‘छत्रीचा शोध कसा लागला असेल?’ शिक्षणाच्या चौकटीत अडकलेली आमची मुलं आठवू लागली पुस्तकात शिकलेलं. मुलं बुचकळ्यात पडलेली पाहून रामभाऊंनी त्यांना डेरेदार झाड दाखवलं आणि म्हणाले, ‘ही बघा काळ्या मातीची छत्री,’ अरेच्या! खरेच की. झाड अगदीच दिसत होते छत्रीसारखे.

झाडं ही मातीसाठी छत्रीसारखीच असतील का? रामभाऊ म्हणाले, ‘झाडांपासूनच लागला असावा छत्रीचा शोध.’ थोडं पुढं गेलो तर बहरलेला गुलमोहोर दिसला. मी प्रशांत केंदळे यांची ‘गुलमोहराचं कुकू’ कविता आठवत असताना मुलगा म्हणाला, ‘अरे! ही तर लेडीज छत्री! सगळेच हसले; पण मला मात्र खूप कौतुक वाटलं.

Vision
मराठवाड्यात २५० मंडलांत पावसाची दमदार हजेरी

ही प्रतिमा नवीन होती माझ्यासाठी. मी दिलखुलास दाद दिली आणि हायवेच्या दुभाजकांना सजवणारी फुलझाडे मलाही मग काळ्या-गुळगुळीत वाटेने तिच्या केसात माळलेल्या सुंदर गजऱ्यासारखी भासू लागली! खरंच आपल्यासोबत असणारा प्रत्येक माणूस आपल्याला नवी दृष्टी (Vision) देत असतो. गरज आहे कधीतरी त्याच्याही डोळ्यांनी पाहण्याची... डोळस होण्याची ! दृष्टीचा हा नवा साक्षात्कार होत असताना गाडीत गाणं वाजू लागलं- ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे...’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com