Indian Farmer : शेतकरी रस्त्यावर का उतरत नाहीत?

शेतकरी त्याच्या स्वतःच्या शेतीतील कामात एवढा अडकलाय, की त्याला मान वर करायला वेळ नाही. शेतीशिवाय कुठलाही व्यवसाय घ्या. तिथं कामाची वेळ ठरलेली आहे. ती वेळ संपली, की माणसं आपलं खासगी आयुष्य जगायला मोकळी होतात. अगदी शेतमजूरसद्धा आठ तासांशी बांधला गेलाय. कामाचा ताण ठरावीक वेळेपुरताच असतो. पण शेतीत मात्र कसलंच वेळापत्रक नाही.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon

गेल्या आठवड्यात एक कार्यकर्ता मित्र भेटला. तो शेतकऱ्यांसाठी काम करतो, असं म्हणतो. तो फेसबुक, व्हॉट्सॲपवर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी (Farmer's Issue) लिहितो, चर्चा करतो, वाद घालतो. शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या विचाराने तो झपाटून गेलाय; पण त्याच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश, प्रतिसाद मिळत नसल्याने तो मध्येच चिडतो, निराश होतो.

मला हे सगळं माहित असल्याने मी त्याच्याशी वाद घालत नाही. हं..बरं..अच्छा..असं आहे का? म्हणत ऐकून घेतो. आमची बऱ्याच दिवसांनी भेट होत असल्याने, तो खूष दिसला. मी सहजच विचारलं, की काय म्हणते शेतकरी चळवळ? या प्रश्‍नावर तो अचानक रागात आला. नालायक आहेत शेतकरी सगळे, अशी शिवीगाळ करत तो बोलू लागला.

‘‘शेतकऱ्यांना त्यांचं हित कशात आहे, हे समजतच नाही. रस्त्यावर येऊन सरकारची नाकेबंदी (Farmers Protest) केल्याशिवाय शेतकऱ्यांचा (Farmer's Problem) कुठलाच प्रश्‍न मार्गी लागणार नाही... पण शेतकरी रस्त्यावर यायलाच तयार नाहीत. मग यांचे प्रश्‍न सुटणार कसे..?’’ तो बोलत होता.

Indian Farmer
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

मी म्हटलं, की तू म्हणतोयस ते खरं आहे. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला वेठीस धरतोय, असं चित्र बघायला मिळत नाही. पण मित्रा, शेतकरी रस्त्यावर का येत नाही? हे जरा मला सांग बघू... हा एवढा अभ्यासू मित्र, पण माझ्या प्रश्‍नाने तो गडबडला. त्याने याचा कधी विचारच केला नव्हता.

मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय, तर शेतकऱ्यांनी माझ्यासोबत रस्त्यावर यावं, असं त्याला वाटतं. हा भाबडेपणा आहे. शेतकरी रस्त्यावर का येत नाहीत, याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

Indian Farmer
Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

शेतकरी त्याच्या स्वतःच्या शेतीतील कामात एवढा अडकलाय, की त्याला मान वर करायला वेळ नाही. शेतीशिवाय कुठलाही व्यवसाय घ्या. तिथं कामाची वेळ ठरलेली आहे.

ती वेळ संपली, की माणसं आपलं खासगी आयुष्य जगायला मोकळी होतात. अगदी शेतमजूरसुद्धा आठ तासांशी बांधला गेलाय. कामाचा ताण ठरावीक वेळेपुरताच असतो. पण शेतीत मात्र कसलंच वेळापत्रक नाही.

शेतकऱ्यांना आपल्या कामाच्या वेळा ठरवता येत नाहीत. कधी निसर्ग, कधी वीज कंपनी तर कधी परिस्थिती त्यांचं वेळापत्रक ठरवते. मी रात्री मोटार चालू करणार नाही, रिस्क घेऊन पाणी देणार नाही... असं शेतकऱ्यांना म्हणता येत नाही. पिकांवर कधी रोगराई पडेल हे सांगता येत नाही.

रोग पडला, की सगळी कामं बाजूला ठेवून आधी फवारणी करावी लागते. अवकाळी पावसाची लक्षणं दिसली, की पळापळी करावी लागतेच. वातावरणातील अचानक बदलांचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसतोय.

शेतीतलं प्रत्येक काम वेळच्या वेळी करावंच लागतं. आजचं काम उद्यावर ढकलता येत नाही. कामाला माणसं मिळत नाहीत. शेतीत आधी भांडवली व श्रमाची गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर त्याचा परतावा मिळावा म्हणून झगडावं लागतं. नाहीतर तो पुन्हा कर्जबाजारी बनतो.

Indian Farmer
Indian Agriculture : नवे वर्ष, नवी उमेद

शेतीमध्ये अडकून पडावं लागतं

माझा एक शिक्षक मित्र गेल्या अनेक वर्षांपासून आनंददायी शेती करतोय. शेतीत रासायनिक खतं वापरत नाही. घरी खायला जे जे लागतं ते ते पिकवतो. केसर आंब्याची छोटी बाग आहे. गायी सांभाळायची त्याला आवड. तो नोकरी करीत असताना महिन्यातून एकदा तरी मला भेटायला यायचा. निवृत्त होण्यापूर्वी तो मला बोलला होता, की नोकरीतून मोकळा होतोय आता. यापुढील काळात आठवड्यातील दोन दिवस सामाजिक कामासाठी देणार आहे.

मी त्याचं कौतुक केलं. तो निवृत्त होऊन वर्ष होत आलंय. पेन्शन सुरू आहे. तो आता पूर्णवेळ शेती करतोय. दिवाळीपासून त्याच्याकडं शेतगडी नाही. मी जेव्हा केव्हा फोन करतो तेव्हा तो शेतीच्या कामात किंवा नियोजनात असतो. डुकरांच्या त्रासामुळे तो वैतागलाय. झटका मशिन आणि तार आणलीय; पण महिनाभरापासून मजूर मिळत नाही म्हणून ती लावता आलेली नाही.

आज त्याच्याकडं पहिल्यांदाच एकही जनावर नाही. आमची आता तीन- तीन महिने भेट होत नाही. दुसरे एक मित्र डॉक्टर, प्राध्यापक होते. ते प्रॅक्टिस करीत होते, विद्यार्थ्यांना शिकवत होते; तेव्हा आमची आठवड्यातून दोन-तीन वेळा सहज भेट व्हायची. आता ते पूर्णवेळ शेतकरी बनलेत. गावाकडंच राहतात. आता महिनोन् महिने आमची भेट होत नाही. फोनवर बोलणं झालं तरी अप्रुप वाटतं.

माझं स्वत:चं उदाहरणही बोलकं आहे. मी शेती करू लागल्यापासून सगळे प्रत्यक्ष संपर्क तुटले. आता फेसबुक हेच संपर्काचं माध्यम उरलंय. एवढी पत्रकारिता केली, प्रकाशक म्हणून नऊशे पुस्तक प्रकाशित केली, माझी ६५ पुस्तकं प्रकाशित झाली तरीही अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.

मी माझ्या प्रकाशन संस्थेत- ‘मुक्तरंग’मध्ये- असलो की आजही माझ्याकडं वेळ असतोच. मित्रांसोबत तासन् तास गप्पा मारतो. हॉटेलात जेवायला जातो. वेळ नाही असं होत नाही. कामं करूनही इथं वेळ असतोच; पण शेतात असताना मात्र वेळच मिळत नाही.

कामांची यादी कधी संपतच नाही. शेतात कोणी भेटायला येतो म्हटलं, की लगेच ‘नको नको...’ अशी प्रतिक्रिया येते. कामात अडथळा वाटतो. सोयाबीन काढणीच्या काळात एक महिना आणि शेततळ्याच्या कामाच्या वेळी दोन महिने मी पूर्णपणे शेतीत अडकून पडलो होतो. एकही दिवस शेत सोडता आलं नाही. आजही कुठं निघालो, की समोर कामं दिसतातच.

माझ्या निवृत्त शिक्षक मित्रासाठी, डॉक्टर मित्रासाठी आणि माझ्यासाठी, शेतीतील काम हा आवडीचा विषय आहे. आम्ही जीवनशैली म्हणून शेतीकडं बघतो. पोटापाण्यासाठी नाही तर जगण्याचा आनंद म्हणून आम्ही शेती करतोय. हे खरं असलं तरी शेतीनं आम्हाला अडकवून टाकलंय, हे सत्य नाकारता येत नाही. ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे, जे पैसे मिळविण्यासाठी शेती करताहेत, ते आमच्यापेक्षाही अधिक गुंतून पडले आहेत.

प्रत्येक शेतकऱ्यासमोर त्याच्या शेतीतील कामांची भलीमोठी यादी आहे. त्या कामांचे प्राधान्यक्रम मागेपुढे करीत त्याला ही कामे करावीच लागतात. मी २५ शेतकऱ्यांना प्रश्‍न विचारला, की तुम्ही तुमच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर का उतरत नाही? प्रत्येक जण त्याच्या समोरच्या कामांची यादी सांगत होता....खाजवायला फुरसत नाही, हलू शकत नाही मी...महिना झालं घर सोडलो नाही...अशी उत्तर ऐकायला मिळाली.

बहुतेक जण कदरून गेलेत, वैतागलेत, चिडलेत पण ते यातून बाहेर पडू शकत नाहीत. शेती सोडून दिली तर खायचं काय आणि दुसरं करायचं तरी काय...? असा त्यांचा प्रश्‍न असतो. या शेतकऱ्यांकडून रस्त्यावर येण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

बहुतांश शेतकऱ्यांचा शेतकरी संघटनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर विश्‍वास नाही. प्रत्येक नेत्याची आपापली दुकानदारी आहे; ते त्यांच्या सोयीप्रमाणे भूमिका घेतात, बदलतात, असं शेतकऱ्यांना वाटतं. नेत्यांचं नेतेपण टिकविण्यासाठी आम्ही कशाला रस्त्यावर यावं, असा प्रतिप्रश्‍न एका संघटनेबद्दल ममत्व असणाऱ्या शेतकऱ्याने केला.

शेतकरी विविध गटातटांत, जात- धर्मांत, विचारांत विखुरला गेलाय. त्यांना एका झेंड्याखाली आणू शकेल, असा एकही शेतकरी नेता आज नाही. शरद जोशींचा ‘शेतीमालाला रास्त भाव' हा एककलमी मुद्दा सगळ्या शेतकऱ्यांना आकर्षून घेणारा होता. आज तसा सर्वांना महत्त्वाचा वाटेल असा, एकच एक मुद्दा समोर दिसत नाही.

ऐंशी-नव्वदच्या दशकातील परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्या वेळच्या सारखी आंदोलनं आता होणं शक्य नाही. तसेच देशात २०१४ पासून कट्टरतावाद जाणीवपूर्वक वाढवला गेलाय. त्याला शेतकरीही बळी पडत आहेत.

धार्मिक वादात अडकलेला शेतकरी आर्थिक प्रश्‍नांचा विचार गांभीर्याने करू शकत नाही. त्याला स्वत:च्या दैन्यावस्थेपेक्षा धार्मिक वाद महत्त्वाचा वाटतोय. दैववाद वाढतोय. आपल्या दूरवस्थेला शेतकरी विरोधी कायदे, सरकारचा शेतीतील चुकीचा हस्तक्षेप कारणीभूत आहे, ही बाब शेतकरी समजून घ्यायला तयार नाहीत.

एकंदर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्यही वाढलंय. काही करून उपयोग नाही. आता काही बदलणार नाही, असं मानणाराही वर्ग मोठा आहे. तो कधीच रस्त्यावर उतरणार नाही. सगळ्या शेतकऱ्यांचे काही समान प्रश्‍न असले, तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीतील व कौटुंबिक समस्या वेगवेगळ्या आहेत.

प्रत्येक जण आपापल्या परीने या समस्या सोडवण्यात, परिस्थिती बदलवण्यात गुंतलेला आहे. तो यात एवढा अडकलाय, की त्याला शेतकऱ्यांचे मूलभूत व सामाईक प्रश्‍न आकर्षून घेऊ शकत नाहीत. शिवाय रस्त्यावर आल्यामुळे प्रश्‍न सुटतील, असं फारसं कोणाला वाटत नाही.

सोशल मीडियावर चालणाऱ्या शेतकरी आंदोलनांचा प्रत्यक्षात फारसा परिणाम जाणवत नाही. रस्त्यावरचं आंदोलन करायचे असेल, तर तो समाज एकतर उपाशी असावा लागतो; नाही तर सुस्थितीत असावा लागतो. पोट भरण्यात अडकलेला समाज आंदोलन करू शकत नाही. प्रत्येक शेतकरी जेमतेम कसं चांगलं जगता येईल, आपली प्रगती कशी साधता येईल, यासाठी आपापल्या परीने धडपडतोय. त्याला रस्त्यावर उतरवणं कठीण आहे.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com