नाही निर्मळ जीवन

लेकाला पुण्याला सोडायला बसस्थानकात जावं लागलं. तिथला गोंगाट नि अस्वछता तिथून लवकर पळ काढायला भाग पाडते. फेरीवाल्यांचे आवाज, बसेसची अनाऊन्समेंट, हे आवाज अनिवार्य असले तरीही त्यांचा अतिरेक होतोच.
मशगात लेख
मशगात लेखAgrowon

जयश्री वाघ

लेकाला पुण्याला सोडायला बसस्थानकात जावं लागलं. तिथला गोंगाट नि अस्वछता तिथून लवकर पळ काढायला भाग पाडते. फेरीवाल्यांचे आवाज, बसेसची अनाऊन्समेंट, हे आवाज अनिवार्य असले तरीही त्यांचा अतिरेक होतोच. स्वर्ग नरक आपण पाहिला नाही. पण मनात आलं, की पृथ्वीवर जिथे कुठेही शांतता आणि स्वच्छता आहे तो स्वर्गच. आणि नसेल तर नरक.

शेगावचे गजानन महाराज संस्थान मला यासाठीच आवडते. कमालीची शांतता, स्वच्छता शिस्त आणि सेवेकऱ्यांची सौहार्दता तेथे अनुभवता येते. तसेही म्हटलेलेच आहे की cleanliness is next to Godliness. जिथे ही शुचिता, पावित्र्य जपले जाते तिथे सात्त्विकता जपली जाते तिथेच खऱ्या अर्थाने भक्तिरसाची अनुभूती घेता येते. अस्वछता नकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वच्छता मांगल्याचा अनुभव देते. ती एक नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छतेसाठी कायदे करावे लागण हे रोगट समाजमनाचं लक्षण आहे. इतर देवस्थाने त्याबाबत कायमच उदासीन दिसतात.

पूजापाठ नियमित झाले तरी तेथे स्वच्छता मात्र महत्त्वाची वाटत नाही. सार्वजनिक ठिकाणी कुठे आपल्याला कायमचे राहायचे आहे? तेव्हा तिथे कचरा टाकला काय किंवा थुंकलं काय, काय फरक पडतो? कोण बोलणार आपल्याला? हो. माझं घर मात्र स्वच्छ असायला हवं, मग कचरा खिडकीतून बाहेर टाकीन नाही तर रस्त्यावर नेऊन टाकेन.

तोच अनुभव नद्यांच्या बाबतीतही येतो. ज्या देशात नद्यांना माता, देवी मानले जाते, त्यांची पूजा केली जाते, खडतर परिक्रमा केली जाते त्या नद्यांची अवस्था बघवत नाही. त्यांच्यात निर्माल्यापासून ते कारखान्यातील घातक रसायनांपर्यंत काहीही सोडलं जातं. पूर्वी नद्यांचे पाणी पिण्यासाठी वापरत यावर विश्‍वास बसत नाही. आणि इतर देशात नदी म्हणजे केवळ एक नैसर्गिक जलस्रोत या भावहीन नजरेने बघितली जाते, तिथे मात्र नितळ निर्मळ प्रवाह नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

स्वच्छता ही शरीराला लागलेली सवय असते जी अंतर्मनाच्या प्रेरणेतून येत असते. इतरांसाठीच्या चांगल्या भावनेतून येत असते. सरकारी कार्यालयात जागा मिळेल तिथे कानाकोपऱ्यात थुंकणाऱ्यांनी आपल्या असंस्कृतपणाचे गलिच्छ प्रदर्शन केलेले असते. तेच विनाकारण मोठ्याने आणि तावातावाने बोलणाऱ्या लोकांच्या बाबतीतही म्हणता येईल. शब्दशब्दांतून असभ्य भाषा नि उर्मट देहबोली आजूबाजूचे वातावरण दूषित करत असते. आपले असणे इतरांना असह्य होत असेल अशा लोकांनी राष्ट्रप्रेमाच्या नि देवाधर्माच्या गोष्टी करू नयेत. त्याचा काहीही उपयोग होत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण.’’ हे मानसिक अनारोग्यच नाही का!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com