खरिपात खतांची कमतरता भासणार नाही?

ओमान इंडिया फर्टिलायझर कंपनीसोबत (OMIFCO)भारताने युरियाच्या दीर्घकाळ पुरवठ्यासाठी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार ओमानमधून भारताला प्रतिवर्षी १० लाख टन युरिया पुरवण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून या कंपनीकडून दरमहा ९० हजार टन युरिया भारतात रवाना केला जात आहे.
Fertilisers
FertilisersAgrowon

या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नसल्याची ग्वाही नुकतीच केंद्रीय खते, रसायन मंत्रालयाचे सचिव आर.के.चतुर्वेदी यांनी दिली आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वार्षिक खरीप परिषदेत चतुर्वेदी बोलत होते. या परिषदेत खरीप हंगामासाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.

खरीप हंगामासाठी खतांच्या उपलब्धतेसाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती देताना चतुर्वेदी यांनी, भारताने जागतिक पुरवठादारांसोबत अल्प मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी खतांचा पुरवठा करण्याबाबत करार केले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यामुळे खरिपात खतांची कमतरता भासणार नसल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

आजमितीस देशात ४८५.५९ लाख टन खत उपलब्ध आहे. यातील १०४.७२ लाख टन खत आयात करण्यात आले आहे. देशात २५४.७९ लाख टन खतांची निर्मिती करण्यात आली आहे. खरिपात एकूण ३५४.३४ लाख टन खतांची गरज भासणार असल्याचे चतुर्वेदी म्हणाले आहेत.

यंदाच्या खरिपात १७९ लाख टन युरियाची गरज नोंदवण्यात आली आहे. प्रत्यक्षात २५६. २२ लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरिपासाठी ५८.८२ लाख टन डाय अमोनियम फॉस्फेटची (DAP) गरज नोंदवण्यात आली आहे. प्रत्यक्षात ८१.४२ लाख टन डीएपी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भारताला म्युरिएट ऑफ पोटॅशसाठी (MoP) संपूर्णतः आयातीवर अवलंबून रहावे लागते. १९.८१ लाख टन एमओपीची (MoP) गरज असताना २९.०३ लाख टन एमओपी उपलब्ध करून देणार असल्याचे चतुर्वेदी म्हणाले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात देशाने मागणीपेक्षा कमी प्रमाणात खते आयात केली होती. खतांच्या किंमती सातत्याने वाढत असताना शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात खते कशी उपलब्ध करून दिली जाणार आहेत ? याबाबत चतुर्वेदी यांनी अधिक भाष्य केले नाही.

देशात एनपीके खतांची ६३.७१ लाख टनांची गरज असताना ७७.८७ लाख टन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिंगल सुपरफॉस्फेटची (SSP) मागणी ३१ लाख टन असताना ४१ लाख टन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ओमान इंडिया फर्टिलायझर कंपनीसोबत (OMIFCO)भारताने युरियाच्या दीर्घकाळ पुरवठ्यासाठी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार ओमानमधून भारताला प्रतिवर्षी १० लाख टन युरिया पुरवण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून या कंपनीकडून दरमहा ९० हजार टन युरिया भारतात रवाना केला जात असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com