केवळ शेतीच नाही, पशुपालनही धोक्यात!

अरुणाचल प्रदेशामधील ब्रोकपा (Brokpa) ही भटकी जमात आणि त्यांच्या पाळीव याक (Yak) प्राण्यावर वातावरण बदलाचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसले.
Live stock
Live stockAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

भटक्या लोकांच्या दैनंदिन जीवन, संस्कृतीशी जोडलेला याक प्राणी कमी होत जाणे आणि त्यांचे पालन करणाऱ्या लोकांना स्थलांतर करावे लागणे हे वातावरण बदलाचेच फलित आहे. या वैश्‍विक संकटाचा परिणाम फक्त शेतीवर होणार नाही, तर निगडित पशुपालन (Animal Husbandry) , हजारो वर्षांपासून जपलेल्या परंपरा, रीतिरिवाज आणि संस्कृतीच्या ऱ्हासासही कारणीभूत ठरणार आहे, यात शंका नाही.

मागील लेखात अरुणाचल राज्यातील वातावरण बदल आणि स्थलांतरासंदर्भात गंभीर भाष्य केले होते. विशेषतः हिमालयातून माणसांचे स्थलांतर पायथ्याकडे होत आहे आणि वनस्पतीचे स्थलांतर अधिक उंचीवरील भागाकडे होत आहे. यास कारणीभूत ठरत आहे, ते वाढते वैश्‍विक उष्णतामान, त्याच बरोबर वितळणारा बर्फ.

केवळ मनुष्य आणि वनस्पतीच वातावरण बदलामुळे प्रभावित होत आहेत का? उत्तर खरेतर अवघड आहे. कारण आतापर्यंत या दोन जैविक घटकापर्यंत सीमित असे संशोधन झाले आहे. भविष्यात माणसांशी जोडलेल्या पाळीव प्राण्यांचीही नोंद घ्यावी लागणार आहे. अमेरिकेमधील विस्कॉन्सिन विद्यापीठामधील परिसंस्था शास्त्रज्ञांनी २०१४ मध्ये पश्‍चिम हिमालयाच्या उंचीवरील भागाचा सविस्तर अभ्यास केला होता.

त्यांच्या अभ्यासातून पुढे आलेल्या बाबीही आश्‍चर्यकारक होत्या. त्यांना अरुणाचल प्रदेशामधील ब्रोकपा (Brokpa) ही भटकी जमात आणि त्यांच्या पाळीव याक (Yak) प्राण्यावर वातावरण बदलाचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसले. ब्रोकपा जमात या प्राण्यांच्या कळपांना चराईसाठी उंचावर नेत असतात. या कळपात ५० ते ३०० प्राणी असतात. याकचे दूध, दही, पनीर उत्कृष्ट दर्जाचे असते. ब्रोकपा लोकांचे राहणीमान, त्यांची परंपरा, संस्कृती, सणवार, उत्सव सारे काही याकबरोबर जोडलेले आहेत.

आज वातावरण बदलामुळे बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे याकला हवे असलेले गवतच मिळत नाही. याक या पाळीव प्राण्याचे हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये उगवणारी गवते हे आवडते अन्न. विशेषतः पैसांगची पाने (Paisang) फार आवडतात. या पानांची संख्या झपाट्याने कमी होत चालली असून, त्या जागी ऱ्होडोडेन्ड्रान ही वनस्पती (Rhododendron) वाढत आहे. तिला हा प्राणी तोंडसुद्धा लावत नाही.

अरुणाचलच्या पश्‍चिम कामेंग (Kameng) जिल्ह्यामधील अनेक गावे पूर्वी हिवाळ्यात दोन फुटांपर्यंत बर्फाने झाकली जात. आज ही गावे उघडी पडत आहेत. वाढत्या उष्णतामानामुळे याकच्या वासरांचे जीवन असह्य झाले आहे. याक हा १३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात राहू शकत नाही. तापमान वाढू लागले की आईचे दूध कमी होऊ लागते. वासरांची उपासमार सुरू होते. बर्फ वितळल्यामुळे या पिलांना जळवा चिटकतात. याकपालन करणारे लोक म्हणतात, की १०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत या भागात जळू कुठेही दिसत नसे.

माणसे खाली स्थलांतर करू शकतात, पण हा प्राणी कसे करणार? आज अरुणाचलमधील ही भटकी जमात या प्राण्यांचे कळप घेऊन हिमालयात अति उंचावर खाद्याच्या शोधात जात आहे. उन्हाळा वाढत आहे, हिवाळा कमी होत आहे. हिवाळा या प्राण्यांसाठी उत्तम. हे लोक त्यांच्या कळपाला घेऊन ३००० मीटर उंचीवरून सेंनज सेंन्ज (Senge) या भूतानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत ४५०० मीटर उंचीपर्यंत पोहोचले आहेत.

अरुणाचलमध्ये ‘याक’ची संख्या १० ते १५ हजारांच्या घरात असावी. ही संख्या घसरत असतानाच ब्रोकपा जमातीची संख्याही कमी होत आहे. पूर्वी ८०० कुटुंबांची असलेली ब्रोकपा वस्ती आता २०० पर्यंत खाली आली आहे. अनेक लोक याक व त्याच्या दुधाचा व्यवसाय सोडून शहरी भागात मजुरीला जात आहेत.

वातावरण बदलाचा (Climate Change) सर्वाधिक परिणाम ब्रोकपा महिलांवर झाला आहे. हजारो वर्षांची याक पालनाची परंपरा व जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर पडली आहे. शहराकडे मजुरीसाठी गेलेल्या पुरुषांच्या स्त्रियांना याकचे कळप घेऊन अधिक हिमालयात अधिक उंचावर भटकावे लागत आहेत. त्यातून स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्‍न, त्यांचा वाढलेले मुक्कामाचे दिवस, सुरक्षा, मासिक पाळीच्या समस्या, लहान मुले याची कुठेही गांभीर्याने नोंद घेतली जात नाही.

वातावरण बदलाची (Climate Change) कारणे, समस्या याच्या चर्चा, परिषदा होतात, त्या मोठमोठ्या शहरी भागात. परिणाम, होतो तो दूर कुठेतरी दुर्गम हिमालयातील अतिउंचीवरील एका संवेदनशील भटकी जमात आणि तिच्या पाळीव प्राण्यावर. दोघांचीही काही चूक नसताना त्यांच्या भुकेचा प्रश्‍न उभा राहतो. हीच खरी शोकांतिका आहे. याक प्राण्याची संख्या कमी होत राहिल्यास आणखी समस्या वाढणार आहेत.

उदा. त्यांच्या आपआपसातील मिलनामुळे निपजणारी पुढील पिढी निकृष्ट होण्याचा धोका आहे. शुद्ध नर मिळणार नाही. तिबेटमध्ये हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. पण अरुणाचलमधील याक तेथे जाण्यास बंदी आहे. नद्यांच्या वाहण्यास देश बंदी करू शकत नाहीत आणि ते शक्यही नाही. आफ्रिकेतील जंगली गवे, म्हशी, रेडे (Bison) समूहाने एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात जातात, तेथे त्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण आमच्या अरुणाचलच्या याकला अति उंचीवरील तिबेटच्या सीमेला स्पर्श करून माघारी फिरावे लागतो. कारण तो पाळीव आहे.

अरुणाचलमधील याकवर संशोधन करणारी डिरांग (Dirang) संशोधन संस्था यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नैसर्गिक मिलन आणि प्रयोगशाळेमधील मिलन यात फरक पडणारच! त्यात ब्रोकपा जमातीचा याकच्या संकरित जातीना विरोध आहे. कारण याक संशोधन संस्थेने विकसित केलेच्या काही जाती उंचीवर जाण्यास तयार नाहीत.

नैसर्गिक गवत मिळत नसल्यामुळे मुद्दाम तयार केलेला आहार त्यांना देणे या जमातीस आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हे लोक म्हणतात, ‘‘भले आम्हाला उंच हिमालयात त्यांना घेऊन जावे लागते, पण नैसर्गिक मिलनातून निर्माण होणारी जातच वातावरण बदलास सक्षमपणे सामोरी जाऊ शकते.’’

शेतामध्येही हेच आहे. पारंपरिक देशी वाणच वातावरण बदलास सामोरे जाऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये परिस्थितीला सामोरे जाण्याचा ताठपणा असतो. याक हा दुसरा कल्पधेनूच आहे. हा पाळीव प्राणी फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ देतो, असे नाही, त्याचे मांस, लांब केसांपासून मिळणाऱ्या मजबूत दोऱ्या, उबदार टोपल्या, कातडीपासून कपडे, फरच्या टोप्या अशा कितीतरी वस्तू मिळतात.

त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही माणूस उबदार राहू शकतो. हा प्राणी १२ - १३ अंशांच्या वर तापमान गेले की अस्वस्थ होतो आणि उंच बर्फाळ प्रदेशाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. वजा तापमानातही राहणारा हा मानवास उपयुक्त प्राणी अरुणाचलमध्ये आज तरी संकटात आहे. त्यामागील कारणे साधारणपणे अशी -

-वातावरण बदलामुळे अरुणाचलमधील गवताची कुरणे नष्ट होणे.

-पाणथळ जागांचे अस्तित्व मिटणे.

-हिवाळ्याचा कालावधी कमी होणे व उन्हाळा प्रदीर्घ होणे. शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार भविष्यात तापमानात ५ अंशांची भर पडण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com