तुमच्या जिवापेक्षा जगात दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नाही...

आपल्या जिवापेक्षा जगात दुसरी कुठलीही मोठी गोष्ट नाही. जीव वाचविण्यासाठी जे काही करायचं ते करा. जीव देऊन कुठलाच प्रश्‍न संपत नाही. उलट कुटुंबीयांना अधिक दु:खी करून, त्यांचे त्रास वाढवून, त्यांच्या वाट्याला अवमानाची परिस्थिती निर्माण करून तुम्ही जाताय... कितीही विपरीत परिस्थिती असो, शेतीत आनंदानं जगायला शिका. हे अवघड वाटत असलं, तरी अशक्य बिलकूल नाही.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon

सर, प्लीज माझं बोलणं होईपर्यंत फोन बंद करू नका... मी फर्स्ट्रेशनमध्ये आहे. मला काहीच सुचत नाही. फोनवरील आवाजच सांगत होता, की काहीतरी गंभीर परिस्थिती आहे. मी म्हटलं, की जे बोलायचं ते मोकळेपणाने बोल. तुझं बोलणं संपल्यावर आपण चर्चा करू. तो म्हणाला, ‘‘मी गावाजवळच्या एका शहरात राहतो. एका दुकानावर नोकरी करतोय. १२ हजार पगार मिळतो. सात एकर शेती आहे. कर्ज झालं म्हणून याआधी तीन एकर जमीन विकलीय. पण त्यातून पूर्णपणे कर्जमुक्तही झालो नाही. शेतीतून उत्पन्न मिळत नाही. मात्र दगदग खूपच होतेय. एवढ्या पगारावर शहरात काहीच भागत नाही. दोन्ही मुलांचं शिक्षण चालू आहे.

तो खर्च झेपत नाही. मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकलो नाही, तर माझ्या जगण्याला अर्थ काय? या विचाराने माझी झोप उडालीय. मनात सारखे आत्महत्येचे विचार येतात. तुमचे ‘ॲग्रोवन’मधले लेख वाचतो. फेसबुक फ्रेंडही आहे. तुमचं शेतीतलं जगणं बघतो... पण माझ्यासमोर अंधार आहे. मला यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा. तुमचा आभारी राहीन...’’

Indian Agriculture
Indian Politics : पक्षनिष्ठा, विचारधारा लोप पावतेय!

मी त्याच्याशी बोलून आणखी माहिती काढून घेतली. मी म्हटलं, ‘‘तुझी जी समस्या आहे; ती तुझी एकट्याची नाही. देशातील करोडो लोकांसमोरचा हा प्रश्‍न आहे. चांगलं शिक्षण, उत्तम वैद्यकीय सुविधा आपल्या लेकरांना मिळाव्यात, असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकासमोर पोटाचाच प्रश्‍न निर्माण झालाय. मूठभर लोकांनाच हे शक्य आहे. सगळ्यांचीच कोंडी झालीय.’’

‘‘माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत, ज्यांची परिस्थिती तुझ्यापेक्षा कितीतरी वाईट आहे. तरीही तू आत्महत्येचा विचार मनात आणतोयस, हा पळपुटेपणा आहे. बहुतेकांकडं तर मालमत्ताच नाही. तुझ्याकडं सात एकर जमीन असताना तू असा विचार करणं कुठल्याच दृष्टीने समर्थनीय नाही.’’

Indian Agriculture
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

तो म्हणाला, ‘‘शेती हीच तर समस्या आहे. तिच्यात अडकून पडलोय. डोकंच काम करीत नाही. तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा.’’

मी म्हटलं, ‘‘मित्रा, मीही शेतीला कंटाळलोय. पण मलाही यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडलेला नाही. मी तुला कसा मार्ग दाखवू?’’

त्यावर तो म्हणाला, ‘‘तुमचा एवढा अनुभव आहे. तुम्हीच काहीतरी सुचवू शकाल.’’

मी म्हटलं, तीन एकर शेती विक. तो अस्वस्थ होऊन म्हणाला, ‘‘शेती विकू?...मग लेकरांसाठी मागं काय राहणार?’’

‘‘तुझ्या जीवनापेक्षा जमिनीचं मोल अधिक आहे का? जमीन राहावी म्हणून तू जीव देतोस? तुझ्या मृत्यूनंतर त्या जमिनीचं मोल काय? जी जमीन तुझ्या चांगल्या जगण्याच्या कामी येऊ शकली नाही, ती मुलांच्या कामी कशी येईल? जमीन ही पायातील भावनिक बेडी आहे. प्रगतीतील अडथळा आहे. तिच्याकडं भांडवल म्हणून बघ. भावनिक होऊ नको. शांत डोक्याने विचार कर. आणि होय, तुझ्या माहितीसाठी सांगतो, आम्ही दोन वेळा जमीन विकलीय. गरज पडली तर आणखीही जमीन विकेन, तीही आनंदाने. जी मालमत्ता माझ्या जगण्यासाठी उपयोगी ठरत नाही, ती मालमत्ता काय चाटायची?’’ मी थोडं आक्रमकपणेच बोललो.

तो विचारात पडला. काही क्षण शांततेत गेल्यानंतर मीच बोलू लागलो. ‘‘मित्रा, या आधी जमीन तू कर्जफेड करण्यासाठी विकली होतीस. या वेळी जमीन विकून जो पैसा येईल, तो एखाद्या छोट्या व्यवसायात गुंतव. तुझी दहा-बारा हजारांची नोकरी ही मोठी गोष्ट नाही. तुझ्याकडं कोणती कौशल्यं आहेत, तुझी काय क्षमता आहे ते मला माहीत नाही. त्यामुळं तू कोणता व्यवसाय करावा, हे मी तुला सुचवणार नाही. तू काय करावं हे माझ्यापेक्षा तुलाच अधिक कळतं. पण तुला तुझ्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल, तर तुला रूळ बदलावाच लागेल. त्यात खडखडाट होणारच. मी कधीच कोणाला सल्ला देत नाही. तू विचारलंस म्हणून सांगतो...’’

तो बोलू लागला. त्याचा सूर बदललेला दिसला. ‘‘दादा, तुमची सूचना योग्य वाटते. मला ही नोकरी सोडून काहीही व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल लागेल. ते शेती विकल्याशिवाय उभं राहणार नाही. मला कटू वाटत असला तरी हा निर्णय घेणं भाग आहे.’’

मी म्हटलं, ‘‘निर्णयाची घाई करू नको. पुन्हा पुन्हा विचार कर. बायकोशी बोल. शेतीला चांगला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न कर. सल्ला माझा असला, तरी निर्णय तुझाच असणार आहे, हे नीट लक्षात ठेव.’’

‘‘हो... दादा... मी विचारपूर्वक ठरवतो. मी भयंकर विचित्र मन:स्थितीत होतो. काहीच सुचत नव्हतं. आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतोय. धन्यवाद दादा. तुम्ही वेळ दिल्याबद्दल.’’

मी म्हटलं, ‘‘अशा बाबींसाठी माझ्याकडं वेळ आहेच. तुझा नंबर मी फोनमध्ये सेव्ह केलाय. कधीही काही वाटलं तर फोन कर. मी बोलतो तुझ्याशी!’’

जसा घडला तसा हा किस्सा विस्ताराने मुद्दाम दिलाय. कारण मला या पद्धतीचा आलेला हा काही एकमेव फोन नाही. ‘ॲग्रोवन'मध्ये माझा लेख प्रकाशित झाला, की शेतीतील अपयशामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात. मी यातून बाहेर कसा पडू? नेमकं काय करू? माझ्या समोरच्या या प्रश्‍नांची सोडवणूक कशी करू? शेतीत नेमकी कोणती पिकं घेऊ? म्हशीपालन करू की गायी पाळणं फायद्याचं राहील? कोणती फळबाग करू? कोणता भाजीपाला फायद्याचा राहील? शेळीपालन कसं राहील? तुम्ही कशी शेती करता? कामाला मजूर मिळत नाहीत, त्याचं कसं करता? पावसानं सगळं पीक गेलं, काय करू? लाइटमुळे परेशान झालोय, काय करू? डुकरांनी उसाचं मोठं नुकसान केलंय, कसा बंदोबस्त करू? हरणांनी लईच त्रास दिलाय, काय करावं? एक नाही शेकडो प्रश्‍न...

प्रत्येक शेतकऱ्यासमोरची समस्या वेगळी. प्रत्येक जण म्हणतोय, की मार्ग सांगा. मला तेच ते पुन्हा सांगावं लागतं, ‘‘मी कुठल्याच विषयातला तज्ज्ञ नाही. तुमच्यासारखाच सामान्य शेतकरी आहे. मला दिसत असलेली, मी भोगत असलेली शेतीतली दुखणी मांडतो इतकंच. पण तुमच्या प्रश्‍नांची उत्तरं माझ्याकडं नाहीत. तुम्हालाच तुमच्या प्रश्‍नांची उत्तर शोधावी लागतील. बाहेरचा कोणीच माणूस तुम्हाला मार्ग दाखवू शकत नाही.’’

शेतीतला माणूस शंभर अपयश पचवूनही, नवी नवी स्वप्नं पाहतोच. कोरडवाहू शेती आपलं भलं करू शकत नाही, हे कटू वास्तव माहीत असतानाही तो ते स्वीकारत नाही. अनुभवातून जो धडा घ्यायला हवा, तो घेत नाही. ही मोठी समस्या आहे. त्यातून एक दिवस तो टोकाचा नैराश्यग्रस्त होतो. हे टाळणं अशक्य नाही.

शेतीत प्रत्येक अनुभव आपणच घेतला पाहिजे, असा आग्रह धरायची गरज नाही. शहाणं होण्यासाठी इतरांचे अनुभवही पुरेसे असतात; पण अनेक जण स्वत:च अनुभव घेऊन पोळून घेतात. याचा दोष त्या त्या व्यक्तीकडेच जातो.

मी शेतात राहून प्रत्यक्ष शेती करीत असल्याने हे प्रश्‍न मला नवे नाहीत. यातले बहुतेक प्रश्‍न माझ्यासमोरही आहेत. पण माझ्याकडंही त्यांची उत्तरं नाहीत. मात्र मी पोटापाण्यासाठी शेतीवर अवलंबून नसल्याने या प्रश्‍नांमुळे गांगरून जात नाही. त्याकडे तटस्थतेने पाहू शकतो. एका टप्प्यानंतर जे व्हायचं ते होईल, अशी भूमिका घेऊन त्या प्रश्‍नांपासून बाजूला होतो. मी पुस्तक वाचतो, लेखन करीत बसतो. जुनी गाणी ऐकतो. डोंगरावर, शेततळ्यावर चक्कर मारतो. झाडांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये रमतो. नाही तर लातूरला मुक्तरंग प्रकाशनाच्या कामात डोकं घालतो. ही संधी, पर्याय माझ्याकडं आहेत. त्यामुळं शेतीतील टोकाच्या परिस्थितीतही माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत नाहीत. मी वैफल्यग्रस्त होत नाही.

पण जे पूर्णवेळ फक्त आणि फक्त शेतीत अडकून पडले आहेत, त्यांचं काय? नैराश्यातून बाहेर पडण्याचा त्यांच्यासाठी मार्ग काय? त्यांनी बदल म्हणून काय करावं? हा प्रश्‍न मला कायम अस्वस्थ करतो. त्यांना मी काही सुचवू शकत नाही. शेतीतील परिस्थिती एवढी बिकट आहे, की तिथं नैराश्य येणारच. आस्मानी वा सुलतानी संकटांमुळं कोंडी होणारच. यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच. केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुसरं काही ना काही काम करणं. याशिवाय, प्रत्येकाने काही ना काही छंद, आवडी जोपासायलाच हव्यात. कशात तरी मन रमवायलाच हवं. दिनक्रमात बदल करायला हवा. किमान आपल्या जवळच्या मित्राकडं, पत्नीजवळ, मुलांजवळ मन मोकळं करायला हवं. मनाची तीव्र नैराश्याची अवस्था फार काळ नसते. ती वेळ, तो क्षण टाळला, की आत्महत्येसारखी टोकाची कृती टळते.

प्रश्‍न कितीही गंभीर असला, तरी त्यावर काही ना काही उत्तर असतंच. काळ हे तर प्रत्येक प्रश्‍नावरचं उत्तर असतंच. अर्थात, त्यासाठी संयमाची गरज आहे.

माझ्याशी फोनवर संवाद साधणाऱ्यांना मी नेहमी सांगतो, ‘‘आपल्या जिवापेक्षा जगात दुसरी कुठलीही मोठी गोष्ट नाही. जीव वाचविण्यासाठी जे काही करायचं ते करा. जीव देऊन कुठलाच प्रश्‍न संपत नाही. उलट कुटुंबीयांना अधिक दु:खी करून, त्यांचे त्रास वाढवून, त्यांच्या वाट्याला अवमानाची परिस्थिती निर्माण करून तुम्ही जाताय...’’

‘‘कितीही विपरीत परिस्थिती असो, शेतीत आनंदानं जगायला शिका. हे अवघड वाटत असलं, तरी अशक्य बिलकूल नाही. नाही तर काहीही करून शेतीबाहेर पडा. तुमच्या जिवापेक्षा शेतीचं मोल अधिक नाहीच!’’

-------------

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com