Agriculture Subsidy : आता मिळवा शेती विकत घेण्यासाठी अनुदान

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
 Agriculture Subsidy
Agriculture Subsidy Agrowon

शेती क्षेत्रात वाढ व्हावी, अधिकाधिक तरुण शेती क्षेत्राकडे वळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. 

 Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : जिल्हा परिषदेचे फवारणी पंप अनुदान अल्प

अशी आहे योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२ असे राज्य शासन राबवित असलेल्या या योजनेचे नाव असून या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकर्यांना राज्यशासनाकडून जमिन खरेदी करण्यासाठी ५० टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात व ५० टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, भुमीहीन शेतमजूर यांच्यासाठी शासनाकडून शेतजमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांतील पती अथवा पत्नीच्या नावे केली जाते. लाभार्थी विधवा किंवा परितक्त्या स्त्री असेल तर जमीन त्यांच्या नावे केली जाते. चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.

 Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : वाळवातील शेतकऱ्यांना ६.३३ कोटींचे अनुदान

योजनेच्या अटी

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२ चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय किमान १८ व कमाल वय ६० वर्ष इतके असणे गरजेचे आहे. या योजनेत अर्ज करु इच्छिणार्या अर्जदाराकडे जमीन नसावी तसेच तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा, योजनेसाठी परित्यक्ता, विधवा स्त्री यांना प्राधान्य देण्यात येते, महसूल व वन विभागाने ज्यां शेतमजूर अथवा शेतकर्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले गेले आहे, त्या शेतकरी कुटुंबांस या योजनेचा लाभ मिळणार नाही, किंवा यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबास कुठल्याही कारणास्तव जमीन इतर व्यक्तीना हस्तांतरीत अथवा विक्री करता येणार नाही.

योजनेतील लाभार्थ्यास दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असून त्या कर्जाची मुदत १० वर्षे असणार आहे. घेतलेल्या कर्जाच्या कर्जफेडीची सुरुवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होईल. योजनेतील लाभार्थी शेतकरी, शेत मजुरांनी जमीन स्वतः कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यासाठी जमीन खरेदी करत असताना तीन लाख रूपये प्रती एकर एवढ्या कमाल मर्यादेत खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीला देण्यात आलेली आहे.

योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करतांना अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र, तहसीलदार यांनी निर्गमित केलेला भूमिहीन असल्याबाबतचा दाखला, तहसीलदार यांनी दिलेला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबतचे सत्य प्रमाणपत्र, शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचे १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२ साठी अर्ज करु इच्छिणार्या अर्जदारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. कारण राज्यसरकारकडून अद्यापपर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून त्याच कार्यालयाकडे हा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com