Ayurveda:आयुर्वेदामधील पोषक अन्नद्रव्य

कित्येक जण आयुर्वेदातील (Ayurvedic Medicine)औषधे वापरण्याचा प्रयत्न करतात. यातील कोणतीही औषधे वापरताना वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
Nutrients in Ayurveda
Nutrients in AyurvedaAgrowon

वैद्य श्रीधर पवार

राष्ट्रीय खेळ दिवस (National Sports Day) आताच संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. या खेळ दिवसाच्या निमित्ताने व्यायाम, खेळ किती महत्त्वाचे आहेत हे आपण मागील गुरुवारच्या लेखामध्ये पहिले. खेळ आणि व्यायाम याची तयारी करण्यासाठी सर्वांत प्रथम गरज असते ती शरीराच्या तयारीची, यासाठी अनेक जन वेगवेगळे पर्याय अवलंबतात. शरीराचे पोषण, शरीराची लवचिकता, मानसिक तयारी यासोबत खेळत असताना झालेला अपघात आणि त्यामुळे झालेली शरीराची हानी यामध्ये आयुर्वेदाचा (Ayurveda) दृष्टिकोन आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

संपूर्ण जगभरात अनेक खेळाडू आयुर्वेदाचा वापर आपला खेळ सुधारण्यासाठी करताना दिसून येतात. आयुर्वेद (Ayurveda) म्हणजे फक्त भारतापुरताच मर्यादित नसून अमेरिकेतील आयुर्वेदाच्या अनेक संस्थांमध्ये काम केले जात आहे.

आपल्याकडे आयुर्वेदाप्रति जनजागृती वाढवणे आणि शरीरास हानिकारक असणारे अनेक पदार्थ आहारात घेण्यापासून टाळणे गरजेचे आहे. आयुर्वेदामधील काही वनस्पती ज्या खेळाडूंसाठी फायदेशीर आहेत याबाबत माहिती देत आहे.

अश्‍वगंधाः अश्‍वगंधा शरीरातील स्नायूंना बळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. त्यासोबतच कोणताही रोग आणि शारीरिक समस्येशी लढण्याकरिता व्यक्तीची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली असणे आवश्यक आहे. अश्‍वगंधाच्या उपयोगाने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येऊ शकते. शोधातून लक्षात आले आहे, की अश्‍वगंधा शरीरातील लाल रक्त पेशी वाढवण्याचे कार्य करते.

ज्यामुळे ॲनिमियासारख्या रोगांना दूर ठेवता येते. खेळाडूंमध्ये आवश्यक असणारी हाडांची मजबुती निर्माण होण्यामध्ये अश्‍वगंधा मदत करते. अश्‍वगंधा तुमच्या हृदयाला सर्वांगीण सुरक्षा देऊन हृदयाच्या स्नायू बळकट होतात, हृदयावरील तणाव कमी होतो. त्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो, जो हृदयरोगासाठी एक प्रमुख धोका घटक आहे. सांध्यांसाठी बळ देते. मानसिक आरोग्य टिकवून ठेवते. खेळाडूंमध्ये अपघातामुळे होणारी शरीराची हानी भरून काढण्याचे कार्य अश्‍वगंधामुळे खूप लवकर घडून येते.

शतावरीः खेळाडूंच्या आहारातील शतावरी हा एक परिपूर्ण घटक आहे. यामुळे शरीराचे पोषण होण्यासोबतच स्नायूंची ताकद वाढवण्यामध्ये उपयोग होतो. शतावरी उत्तम पाचक औषधी वनस्पती आहे. अपचन कमी करते, भूक वाढवते आणि शरीरात पोषक तत्त्वांचे चांगले शोषण करण्यास प्रोत्साहन देते. शतावरी शरीराच्या ठिकाणी असणारी सूज कमी करणे, एखादी जखम झाली असता त्या ठिकाणी जखम भरून काढण्यासाठी मदत करते. मानसिक ताणतणाव, मनामध्ये असणारी भीती घालवण्याचे काम शतावरीमुळे होते.

सफेद मुसळीः सफेद मुसळीमधून अनेक प्रकारचे पोषक घटक शरीराला मिळतात. हे खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. शरीरातील स्नायूंचे पोषण करते. यामुळे वजन कमी असणाऱ्‍या लोकांना पोषण मिळते. शरीराचे बळ वाढवते.

गोखरूः गोखरूचा वापर पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये मूत्रपिंडाचा आजार, मधुमेह आणि स्त्री प्रजनन विकारांसह अनेक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी केला जातो. शरीरावर कोणताही दुष्परिणाम होऊ न देता पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यात कार्यक्षम आहेत. वृषणात तयार होणारे लैंगिक स्राव वाढ करणारे, संप्रेरक पातळी वाढविण्याव्यतिरिक्त, ही औषधी वनस्पती अॅनारोबिक स्नायू शक्ती देखील वाढवू शकते.

अर्जुनः ही औषधी वनस्पती एक शक्तिशाली हृदय टॉनिक आहे जी आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारे विविध हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी स्थितींमध्ये वापरली जाते. औषधी वनस्पतीच्या हृदयावरील प्रभावावरील अभ्यासामध्ये असे स्पष्ट केले आहे, अर्जुन ही वनस्पती हृदयाच्या स्नायूंना होणारे फायब्रोसिस आणि ताणतणावामुळे हृदयाला नुकसान टाळण्यास मदत करते, जेव्हा हृदय तणावाखाली असते तेव्हा ते तणाव नियंत्रण करण्यासाठी आवश्यक स्राव निर्माण होण्यास मदत करते.

अर्जुनाची दाहक-विरोधी क्रिया जास्त दुखापत टाळते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या निरोगी कार्यास चालना मिळते. यासोबत पंचकर्म चिकित्सा केल्याने खेळाडूंमध्ये नैसर्गिकरीत्या शरीर शुद्धी घडून येते. पंचकर्मामधील वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य यांचा वापर केला जातो. यामुळे शरीरात असलेले दूषित घटक बाहेर टाकले जाऊन शरीराची पचनशक्ती सुधारते. शरीरावर असणारा ताण-तणाव कमी होतो.

शरीराची लवचिकता वाढते. या सर्व गोष्टी एकत्र झाल्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम होते. खेळाडूंमध्ये लहान अपघातामुळे शरीराच्या अनेक भागांत वेदना होऊ शकतात. या वेदना घालविण्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले स्नेहन (औषधी तेल-तुपाचा वापर), स्वेदन (औषधी काढ्याने शेकणे), रक्तमोक्षण आणि अग्निकर्म ही कर्मे फायदेशीर आहेत. विशेष फायदेशीर असणारी कपिंग थेरपी तत्काळ वेदना नाहीशा करते.

आपल्या देशात आता ग्रामीण भागामध्ये देखील खेळाडूंस प्राधान्य दिले जात आहे. कित्येक जण आयुर्वेदातील (Ayurvedic Medicine)औषधे वापरण्याचा प्रयत्न करतात. यातील कोणतीही औषधे वापरताना वैद्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आयुर्वेद (Ayurveda) या आपल्या शास्त्रावर पूर्ण विश्‍वास ठेवून त्याचा आपल्या जीवनात समावेश केल्यास पुढील जीवनात प्रगतीचे नवे पाऊल टाकणे शक्य आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com