
Nagar News : सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची हटवावी, कांद्याला उत्पादन (onion Production) खर्चावर आधारित प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये भाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सोमवारी (ता. ६) कांद्याची होळी करत सरकारी धोरणांचा निषेध केला. या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ हा शेतकऱ्यांचा गळफास ठरला आहे. या कायद्याने सरकारला शेतीमालाच्या साठ्यावर नियंत्रण घालण्याचे अधिकार आहेत.
केंद्र व राज्य सरकारने स्वीकारलेल्या खुल्या धोरणानुसार कांदा निर्यातीला त्वरित चालना द्यावी, अन्यथा कांद्याची उत्पादन खर्चावर आधारित खरेदी करावी.
कांद्यासह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची हटवावी, उत्पादन खर्चावर आधारित प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये दर द्यावा, कमी दराने खरेदी झालेल्या कांद्याला फरकाचे अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
मागण्यांची त्वरित अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते व राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष अहमद जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, भोकरचे माजी उपसरपंच गणेश छल्लारे, शेतकरी नेते प्रतापराव पटारे, महाराष्ट्र कृषक प्रदेश संघटक भागचंद औताडे, शेतकरी युवा आघाडीचे उपाध्यक्ष संदीप उघडे, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, मनोज हेलवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
जगभर कांद्याला चांगली मागणी असतानादेखील सरकारच्या वतीने शेजारील श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांकडे कांदाखरेदीची ऐपत नसल्याने निर्यातीला वाव नसल्याचे खोटे सांगून कांद्यावर अप्रत्यक्ष निर्यातबंदी घातली गेली आहे, असा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.