शिफारशींकडील दुर्लक्षामुळे कांदा रोपवाटिकांना फटका

गेल्या तीन वर्षांत हवामानात झालेले बदल (Climate Change) व अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) जमिनीत सातत्याने पाणी राहिले. त्यामुळे जमिनीत बुरशीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी शिफारशी विचारात घेणे महत्त्वाचे आहे.
Onion nurseries
Onion nurseriesAgrowon

नाशिक : खरीप कांदा लागवडीच्या (Onion Cultivation) क्षेत्रांत गेल्या दोन वर्षांत वाढ दिसून आली आहे. तर चालू खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी रोपेनिर्मितीची लगबग सुरू झाली आहे. मात्र सपाट वाफ्यावर रोपनिर्मिती होत असल्याने नुकसान वाढत आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीचा फटका आहेच, शिवाय शिफारशींकडे दुर्लक्ष झाल्याने कांदा रोपवाटिकांचे नुकसान वाढत असल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी गादी वाफ्यांवरच कांदारोपे तयार करण्याचा आग्रह करण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांत हवामानात झालेले बदल (Climate Change) व अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) जमिनीत सातत्याने पाणी राहिले. त्यामुळे जमिनीत बुरशीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी शिफारशी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने देवळा व चांदवड तालुक्यांत आगाप लागवडी होत असतात.

मात्र या भागातील रोपवाटिका अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत. सपाट वाफ्यावर तयार व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर होत आहे. त्यामुळे आगामी लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. श्रम व खर्च टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे.

तज्ज्ञांनी सुचविलेल्या पद्धती :

- पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची रोपवाटिकेसाठी निवड

- बियाणे पेरणीपूर्वी जमिनीत ‘ट्रायकोडर्मा’सारखा जैविक बुरशीनाशकांचा वापर

- खरीप रोपवाटिकांमध्ये बियाणे गादीवाफ्यावरच पेरणी

- बियाणे गुणोत्तर निश्‍चित करून बियाणे पातळ टाकून रोपे विरळ राहतील, असे नियोजन

खरीप कांदा लागवड क्षेत्राची स्थिती

विभाग...लागवड क्षेत्र (हेक्टर)

कोकण...०

नाशिक...३५८३६.५५

पुणे...५८४८६

कोल्हापूर...५८२१.५५

औरंगाबाद...५९४१.९०

लातूर...२८९०.५०

अमरावती...७६०.७०

नागपूर...३

एकूण...१०९७४०.२०

पाणी साचून रोपांची मर होऊन नुकसान वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत यावर प्रबोधन झाले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शास्त्रीय पद्धती सांगूनही शेतकरी त्याची अंमलबजावणी का करत नाहीत, हा प्रश्‍नच आहे. शिफारशीनुसार गादीवाफ्यांवर रोपवाटिका उभाराव्यात.

डॉ. सतीश भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान

गादी वाफ्यावर रोपेनिर्मिती, जैविक बुरशीनाशके, निंबोळी पेंड यांचा वापर केल्याने रोपांची मर कमी झाली. तुलनेत उगवणक्षमता जोमदार होत आहे. रोपांना पांढरी मुळी अधिक आल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अतिपावसामुळे सपाट वाफ्यामध्ये मर होऊन नुकसान वाढले आहे.

दीपक उशीर, शेतकरी, धोडांबे, ता. चांदवड

चालू वर्षी रोपे खराब होऊन बियाणे वाया गेले. गेल्या दोन वर्षांत कांदा रोपे तयार करणे आव्हान बनले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च दबावात ठेवून दुबार रोपे तयार करण्याचे संकट टाळण्यासाठी आता बदल महत्त्वाचा आहे.

जयदीप भदाणे, कांदा उत्पादक, कापशी, ता. देवळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com