
शेतकऱ्यांच्या (Farmer) मालाला दर मिळवून देणे, नवी बाजारपेठ (Markect) उपलब्ध करणे, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे या उद्देशाने केंदूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे परिसरातील २२ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांना एकत्र करून सन २०१५ मध्ये केंद्राईमाता शेतकरी कंपनीची स्थापना झाली. मंगेश गावडे अध्यक्ष, तर संदीप सुक्रे कंपनीचे सचीव आहेत. केंदूर गाव कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, सुमारे १३५० हेक्टरपर्यत त्याची लागवड होते. कंपनीचे सुमारे ४६२ सभासद असून, जवळपास सर्व कांदा लागवड करतात. एकरी दहा ते बारा टनांपर्यंत ते उत्पादन घेतात.
कांदा साठवणूक तंत्र
‘केंद्राईमाता’ कंपनी शेतकऱ्यांच्या बांधावरून कांद्याची थेट खरेदी करते. शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळतो. वाहतूक, हमाली, तोलाई आदी खर्चातही बचत होते. कंपनीने ‘महाएफपीसी’मार्फतही खरेदी केली. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कांद्याची योग्य पद्धतीने साठवणूक करून टप्प्याटप्प्याने विक्री केली जाते.
कंपनीने कांदा साठवणुकीसाठी १८० बाय ३० फूट अंतराचे शेड भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्यामध्ये दोन पद्धतीच्या चाळींची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च केला आहे. दरवर्षी एप्रिल व पुढील काही काळातील रब्बी हंगामातील कांदा काढणी झाल्यानंतर त्याची शेडमध्ये साठवणूक केली जाते.
दोन पद्धतींपैकी २५ बाय चार बाय सहा फूट आकाराची आडवी चाळ आहे. त्याची क्षमता १२ ते साडेबारा टनांची आहे. सर्वसाधारणपणे लक्षात आले आहे की कांदा चाळीच्या मध्यभागी सडण्यास सुरुवात होते. या ठिकाणी वायुविजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी चाळीची रचना दुमजली केली आहे.
जाळी पद्धतीच्या चाळीचे तंत्र
दुसऱ्या पद्धतीची चाळ उभ्या आकाराची व जाळीदार आहे. त्याची उंची सहा फूट तर व्यास चार फूट आहे. यात पोल्ट्रीसाठीच्या जाळीचा वापर केला आहे. ‘ग्रेडिंग’ करून कांदा त्यात भरला जातो.
या पद्धतीत पायाजवळ (बेस) कोरड्या विटा व त्याही एकमेकांत पुरेसे अंतर असलेल्या आहेत. प्रति जाळीत १२०० ते १३०० किलो कांदा भरला जातो.
चाळीची रचना
अनेक प्रयत्न, त्रुटी यातून गेल्यानंतर हे तंत्र अंतिम स्थितीत पोहोचले.
यात गोल रिग असलेल्या जाळीच्या मध्यभागी सहा फूट अंतराचा पाइप खोवला आहे. त्यात डांबर गोळी टाकून तो खालील बाजूने झाकण लावून बंद केला आहे.
पाइपाला झिगझॅग, गोलाकार पद्धतीची लहान १० ते १२ छिद्रे पाडली आहेत. विविध जाळ्यांतर्गत पाइप्सचे फिटिंग केले आहे. एक मुख्य
‘लाइन’, चार ‘सबलाइन्स’ व प्रत्येकाला ‘व्हॉल्व्ह’ अशी रचना केली आहे.
सर्वांत वरच्या बाजूला एक एचपी व ‘सिंगल फेज’ क्षमतेचा ब्लेअर जोडला आहे. वातावरणातील आर्द्रता लक्षात घेऊन त्यातून हवा सोडून गरजेनुसार वा एकावेळी एक ते दोन तास तो सुरू ठेवला जातो. पाइपचे ‘व्हॉल्व्हज’ आवश्यकतेनुसार चालू बंद करण्याची व्यवस्था आहे. या पद्धतीत गरम हवा बाहेर पडून वायुविजन चांगल्या प्रकारे होते. त्यातून कांद्याचे नुकसान कमी होऊन टिकवणक्षमता वाढण्यास मदत होते.
जाळी, ब्लेअर व पाइप असा प्रति जाळी सुमारे १२०० रुपये खर्च येतो. दरवर्षी कंपनीद्वारा ४० ते ४२ जाळी एवढा कांदा भरला जातो. त्यामध्ये सुमारे ५० टनांपर्यंतची साठवणूक होते.
तंत्राचे झालेले फायदे
कांदा दीर्घकाळ टिकण्यास मदत होऊन खराब होण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गुणवत्ता टिकून दर चांगला मिळाला. अर्थात, कांद्याची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी पीक व अन्नद्रव्य व्यवस्थापनही तितकेच चांगले करावे लागतात असे कंपनी म्हणते.
जाळी भरणे व रिकामी करणे सोपे झाले.
विक्रीनंतर शेड रिकामे करण्यासाठी जाळी गुंडाळून ठेवता येते.
दीड हजार टनांहून अधिक विक्री
कंपनीने गेल्या तीन वर्षांत सुमारे १५०० टन वा त्याहून अधिक कांद्याची विक्री केली आहे. रायगड, अलिबाग, महाबळेश्वर, पेण आदी शहरांमध्ये स्थानिक शेतकरी कंपनीतर्फे प्रति किलो १३ ते १४ रुपये दराने विक्री करणे शक्य झाले.
परराज्यांत चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोइमतूर व वेल्लोर या ठिकाणीही कंपनीने किलोला १७ ते १८ रुपये दराने कांदापुरवठा केला आहे. त्यातून कंपनीसह शेतकरी सभासदांनाही चांगला नफा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ६० ते ७० लाख रुपये, एक कोटी २० लाख रुपये व ६० लाख रुपयांची उलाढाल कंपनीने केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.