
संतोष विंचू
Water Stock In Nashik : एलनिनोच्या सावटाची चिंता जिल्हा प्रशासनाला लागली असल्याने आतापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच वाढलेली उष्णता व बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत असून आजपर्यंत केवळ ३६ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.
उपलब्ध पाणी आणि पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे जून-जुलैपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार असून आवर्तनेदेखील उशिराने मिळणार आहेत.
यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस पडला. किंबहुना खरिपातील पिके शेतातच सडल्यामुले कोट्यवधींचे नुकसानदेखील झाले. अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील जिल्हा असल्याने दिवाळीनंतरच सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी धरणांतून पाण्याची आवर्तने देण्याची वेळ येते.
परिणामी धरणे भरलेली असली तरी हळूहळू पाणीपातळी खालावत जाते. जिल्ह्यात यावर्षी १ हजार २३ मिलिमीटर (१२९ टक्के) पाऊस पडला.
दुष्काळी तालुक्यात सरासरी १५० टक्क्यांवर कृपा केली तर मिनी कोकण मानल्या जाणाऱ्या सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांतदेखील यंदा चांगला पाऊस झाला.
विशेष म्हणजे धरणांच्या दिंडोरी तालुक्यात २३० टक्के, सुरगाण्यात १३० टक्के, दुष्काळी चांदवडमध्ये १९५ टक्के, त्रंबकेश्वरमध्ये १०४ टक्के तर इगतपुरीत ७८ टक्के पाउस पडला. एकूणच जिह्यात विक्रमी पाऊस होऊनही यावर्षी लवकरच पाणीसाठा खालावत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे.
यामुळेच पाटबंधारे विभागाने मार्चमध्येच पालिकांना पत्र देऊन एलनिनोच्या आगमनाने पावसाळा लांबण्याची शक्यता गृहीत धरून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. किंबहुना १० जूननंतरच पालखेडचे आवर्तन मिळेल असेही सूचित केले आहे.
विशेष म्हणजे २४ एप्रिलपर्यंत धरणांत ४१ टक्के पाणीसाठा होता, त्यात घट होऊन २० दिवसांत जिल्ह्यातील धरणांतील सरासरी पाणीसाठ्यात ६ टक्के घट झाली
आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मार्चअखेर ५३ टक्के पाणीसाठा होता. तोच ४७ टक्क्यांपर्यंत घटला आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफुटांमध्ये १५ मेपर्यंत)
धरण पाणीसाठा टक्केवारी
गंगापूर - २६६८ - ४७
पालखेड समूह - १८००- २२
करंजवन- १४७९ - २९
ओझरखेड - ५९१- २८
दारणा - ४२८५- ६०
भावली - ३००- २१
मुकणे - ३८५८- ५३
वालदेवी - २९४ -२६
कडवा - ४४४- २६
भोजापूर -७२ - २०
चणकापूर- ९९१ - ४१
गिरणा - ५१२१ - २८
हरणबारी - ५९८ - ५१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.