Save Marathi School : शाळा टिकल्या तर भाषा बहरेल

मराठी शाळांचे संवर्धन ही एक लोकचळवळ व्हावी आणि या चळवळीत साहित्यिक, प्राध्यापक, मराठी भाषाप्रेमी मंडळी आणि अभ्यासक यांनी सहभागी होऊन पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करावे. मराठी शाळांची काळजी घेतली तर भाषेची काळजी करण्याची वेळ येणार नाही.
Marathi School
Marathi SchoolAgrowon

Marathi Language Conservation : महाराष्ट्र सरकार मराठी भाषेसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेताना दिसते आहे. मग तो मराठी भाषा पंधरवडा असेल, संमेलने असतील किंवा वेळोवेळी होणाऱ्या घोषणा असतील.

तरीदेखील यातून मराठी भाषा संवर्धन होते का? आज महाराष्ट्रात मराठी भाषा टिकविण्याचा आणि वर्धित करण्याचा प्रश्न का निर्माण झाला आहे, यावर विचार करायला हवा.

या दुखण्याचे मूळ मराठी शाळांच्या दुरवस्थेत आहे. अलीकडे मराठी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत.

गाव तिथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा असे चित्र असणाऱ्या महाराष्ट्रात आता गाव तिथे इंग्रजी शाळा असे चित्र ठळकपणे दिसते आहे.

अलीकडे इयत्ता दहावी आणि बारावीसाठी राज्य मंडळाकडून होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दखलपात्र घट होत आहे. विद्यार्थी पालकांचा कल हा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाकडे वाढतो आहे.

काही तज्ज्ञ असे म्हणतात की, ‘‘मराठी माध्यमाच्या शाळा कमी झाल्या तरी भाषा जिवंत राहील, भाषा ही प्रवाही असते, लोक अशिक्षित होते तेव्हाही भाषा जिवंत होती. त्यामुळे मराठी भाषेच्या भविष्याची चिंता कोणी करू नये.

मराठी ही लोकभाषा आहे. लोकच ती जिवंत ठेवतील.” मला वाटते की, मराठी भाषा अशाने भाषा म्हणून जिवंत राहील; पण ती समृद्ध होणार नाही.

ती फक्त बोलीभाषा या मर्यादित अर्थाने राहीलही; पण मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवायचे असेल, तर त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

Marathi School
Education System : ती आई होती म्हणुनी...

शाळा हे मुलांच्या औपचारिक भाषा शिक्षणाचे केंद्र आहे. भाषा विषय शिक्षणातूनच शाळेत भाषा समृद्ध होते असे नाही, तर विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आदी विषयांच्या शिक्षणातून मुलांची भाषा समृद्ध होत असते. त्यासाठी त्याच्या शिक्षणाचे भाषामाध्यम महत्त्वाचे ठरते.

शालेय जीवनात कविता हा साहित्यप्रकार सर्वांच्या आवडीचा विषय असतो. पण शाळा संपली की त्यापैकी पुढे किती कवितांची पुस्तके वाचतात? या प्रश्नांचे उत्तर हे नकारार्थी आहे. कवितेबरोबरच मराठीतील कथा, ललित लेख, प्रवासवर्णन आदी साहित्य प्रकारांची ओळख मुलांना शाळेतच होते.

सन १९८० ते २०००दरम्यान मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेले आमच्या पिढीचे अनेक तरुण मराठी साहित्यात चांगले लेखन करीत आहेत. पण आता इंग्रजी माध्यमाचा वाढता टक्का विचारात घेता, पुढील वीस-तीस वर्षानंतर असे साहित्य मराठीत येईलच, असे म्हणता येणार नाही.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन उत्तम लेखन करणारे काही अपवाद आहेत. मातृभाषेतून व्यक्त होण्यात जे भाषेचे सौंदर्य आहेत ते वादातीत आहे; म्हणून भाषेच्या औपचारिक शिक्षणासाठी मराठी शाळांचे संवर्धन आवश्यक ठरते.

Marathi School
Girls Education : काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही!

पालकांचे प्रबोधन व्हावे

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली आहे; पण ही केवळ एक अपेक्षा इथपर्यंतच मर्यादित आहे. प्रत्यक्षात शासन आणि धोरणकर्ते मातृभाषेतून शिक्षणासाठी काही कृती, उपाययोजना करताना दिसत नाहीत.

खरं तर हे सर्व शासकीय यंत्रणेने करणे अपेक्षित असेल तरी मला वाटते मराठी भाषाप्रेमी मंडळींनी मातृभाषेतून शिक्षकांचे महत्व शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगण्यासाठी चळवळ उभी करायला हवी.

मराठी भाषा संवर्धनासाठी फक्त साहित्यिक कार्यक्रम किंवा संमेलने घेऊन भागणार नाही. मराठी साहित्यिक, कवी, अभ्यासक, विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी गावोगावी पालकांच्या प्रबोधन कार्यशाळा घ्यायला हव्यात. ते अधिक परिणामकारक ठरेल.

Marathi School
Rural Education : ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणगंगा आटणार

पालक मराठी शाळांकडे आकर्षित होत नाहीत, यांचे कारण सरकारी आणि अनुदानित शाळांच्या भौतिक सुविधांचा मोठा अभाव आहे . खरे तर ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार उदासीन दिसते.

माझ्या मित्राचा मुलगा इंग्रजी माध्यमातून पूर्वप्राथमिक वर्गात शिकत होता. आमच्या त्या मित्राची आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याची तीव्र इच्छा होती. आम्ही प्रयत्नपूर्वक एका मराठी शाळेत प्रवेश घेतला.

साधारण आठवडाभरानंतर ते मित्र मला म्हणाले की, ‘’मी परत मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतो आहे.’’ मी कारण विचारले तर ते म्हणाले, ‘’संबधित मराठी शाळेचे इंग्रजी शाळेच्या तुलनेत भौतिक सुविधांचा अभाव मुलाला जाणवला. त्यामुळे मुलगा ती शाळा नको असे म्हणतो आहे.’’

थोडक्यात मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा यांच्यातील भेद हा फक्त भाषा माध्यम, अभ्यास, गुणवत्ता एवढ्यावरच मर्यादित नाही, तर तो भेद भौतिक सुविधा, स्वच्छता यापर्यंत पोहचला आहे. मराठी शाळांच्या भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी सर्व मराठीप्रेमींचा दबाव गट निर्माण करायला हवा.

शासनाला मराठी शाळांच्या भौतिक सुविधांवर एक कृती कार्यक्रम द्यायला हवा आणि तो प्रयत्नपूर्वक शासनाकडून कार्यान्वित करून घ्यावा. पालकांना आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असते; पण चांगल्या मराठी शाळांचे पर्याय अल्प प्रमाणात उपलब्ध असतात.

मराठी भाषाप्रेमी साहित्यिक, अभ्यासक, प्राध्यापक आदींनी काही मराठी शाळांचे पालकत्व स्वीकारून भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, गुणवत्ता या विषयी काम करून काही आदर्श उदाहरणे समोर ठेवली पाहिजेत.

गेल्या काही वर्षात मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्य शालान्त परीक्षा मंडळ आणि एकूण राज्यातील शिक्षणविषयक धुरीण यांनी यावर आत्मपरीक्षण करायला हवे. विषयवार समित्यांची स्थापना करून केंद्रीय मंडळ आणि राज्य मंडळ यांच्या इयत्तानिहाय अभ्यासक्रम यांचा तुलनात्मक अभ्यास व्हायला हवा.

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम काठिण्य पातळीत आणि पाठ्यक्रम आणि पाठ्यघटक यात वेळीच आवश्यक त्या सुधारणेची पावले उचलायला हवीत. नीट, जेईई सारख्या परीक्षांमध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा टक्का कसा वाढेल, यासाठी जाणीवपूर्वक मराठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मराठी शाळा टिकल्या तर मराठीची ज्ञानभाषा म्हणून असणारी ओळख वृद्धिंगत होईल. मराठी माध्यमाच्या शाळा राहिल्या तरच मराठी साहित्य वाचले जाईल. या शाळा वाचवण्यासाठी सगळेच शासनावर सोपवून भागणार नाही. काही अल्प प्रयत्न चालू आहेत. त्यात काही स्वयंसेवी संस्था, साहित्यिक, अभिनेते, कलाकार आहेत.

परंतु त्याची समग्र, व्यापक चळवळ झाल्याशिवाय आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. मराठी शाळा संवर्धन ही एक लोकचळवळ व्हावी आणि या चळवळीत साहित्यिक, प्राध्यापक, मराठी भाषाप्रेमी मंडळी आणि अभ्यासक यांनी सहभागी होऊन पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करावे.

शासनाला मराठी शाळा संवर्धनासाठी कृती कार्यक्रम देऊन एक सकारात्मक दबाव गट तयार करावा. मराठी शाळेतील शिक्षक, संस्थाचालक यांच्यामागे विश्वासाचे बळ उभे करावे.

(लेखक शिक्षणक्षेत्राचे आणि मराठी भाषेचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com