Maharashtra Kesari : ...तरच पैलवान टिकतील, महाराष्ट्राची शान टिकेल

धावत मैदाना बाहेर आला. अजून जोशात कपडे उतरवली. ढिला झालेला लंगोटा जोरात कसला. तो विजेच्या गतीनं मैदानात पोहोचला. परत सलामी झडली. झटापट सुरु झाली.
Maharashtra Kesari
Maharashtra KesariMatin Shaikh

मतीन शेख

अंगावरली कपडे काढली. लंगोटा चढवला. पॅन्ट, शर्ट त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबली त्यानं. कधी एकदा मैदानात उतरुन कुस्ती लढतोय असं झालेलं त्याला. ती पिशवी तालमीतल्या एका सोबत्याच्या हवाली करुन तो मैदानात दाखल झाला.

हातात तांबडी माती घेतली. थोडी माथ्याला लावली. इर्षेनं शड्डू ठोकला. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोवर गड्यानं कुस्ती मारली.

विजयी आरोळी ही दिली. पळत पंच कमिटीकडे गेला. पंचांनी कडकडीत शंभराची नोट हातात ठेवली. तो खुशीने परतला.

अंगाची माती न झटकताच कपडे चढवली. शंभराची नोट खिश्यात ठेवली. परत मैदानात गेला. नवा जोड धरला. डबल कुस्ती मारायचा जणू त्यांने चंगच बांधला होता.

धावत मैदाना बाहेर आला. अजून जोशात कपडे उतरवली. ढिला झालेला लंगोटा जोरात कसला. तो विजेच्या गतीनं मैदानात पोहोचला. परत सलामी झडली. झटापट सुरु झाली.

त्वेषाने हाताला हात, अंगाला अंग भिडू लागलं. डावबाजी सुरु झाली. कोण कुणाला मागे सरेना. पण यांची जिंकण्याची जिद्द कायम. आणखी एक शंभराची नोट त्याला खुणवत होती.

त्याने डाव साधला. कुस्ती चीतपटीने जिंकली. धावत पंचांना गाठलं. परत एक करकरी शंभराची नोट मिळाली.

गड्याचं समाधान झालं. पठ्ठ्या अंग फुगवून आला. लंगोटा उतरवला. अंग झाडलं. पॅण्ट घातली. खिशात हात घालून पहिलं शंभराचं ईनाम बाहेर काढलं.

Maharashtra Kesari
Silage Making : मुरघास करताना गुणवत्ता कशी राखावी?

त्या नोटेवर नंतर जिंकलेली नोट ठेवली. त्या दोन नोटांच्या रुपानं जग जिंकल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यासह अंगापिंडावर चमकत होता.

धाराशिव जिल्ह्यातल्या परांड्या जवळच्या गावचा हा पैलवान पोरगा. वैरागच्या फडात लढायला आलता. त्या नाकावरल्या खाणाखुनाचा सांगत आहेत की तो रोज आखाड्यात लढतोय.

त्याला मिळालेल्या दोनशे रुपयात त्याची दोन दिवसाची दुधाची सोय होऊन जाईल. बाकी दिवस त्याच्या खुराकाची आबळच. पण तो लढणं सोडणार नाही.

कोरोनानं कुस्ती मैदानं थांबली. अनेकांची पैलवानकी संपली. दोन,तीन वर्षे अशीच गेली. आत्ता कुठं कुस्तीचे फड भरायला लागलेत.

आपल्या गोर गरीब, शेतकरी, कामगारांच्या पोटी जन्माला आलेली पैलवान मंडळी म्हणत आहेत की बक्षिसाची रक्कम कमी दिली चाललं पण आयोजकांनी मैदानं, स्पर्धा भरवाव्यात.

कुस्ती लढायची संधी द्यावी. नव्या उमेदीनं उभं राहायला अवसान मिळलं. आमचा शड्डू घुमेल. कुस्ती टिकेल. पैलवान टिकतील. महाराष्ट्राची शान टिकेल....

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com