Rahul Gandhi : ‘ऑपरेशन राहुल’ भाजपच्याच अंगलट

पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या राहुल गांधींच्या आक्रमक प्रश्‍नाला सरकारने सवयीप्रमाणे उत्तर देण्याचे टाळले. शीघ्रकोपी भाजपने ‘ऑपरेशन राहुल’ची रणनीती आखली. यशस्वी ऑपरेशनमुळे हर्षवायू झालेल्या भाजपचा आनंद मात्र चार दिवसांच्या वर टिकू शकला नाही.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

Indian Politics : मैत्रीधर्म कसा असावा, याबाबत अनेक आख्यायिका आहेत. चांगल्या मैत्रीचे किस्से पाठ्यपुस्तकातूनही अभ्यासले जातात. समाजासाठी तो आदर्श असतो. वेळप्रसंगी जिवाची बाजी लावणारा तो खरा मित्र. मित्रप्रेमात आकंठ बुडावे.

परंतु अशा मैत्रीचा फटका इतरांना पडू नये आणि स्वत:ही त्यात फसू नये, याचीही काळजी घेतली पाहिजे.

गेले काही वर्षे राहुल गांधी (Rahul Gandhi) हेसुद्धा मैत्रीचे किस्से सांगत सुटले आहेत. त्यांनी सांगितलेल्या कथांचे चर्वण संसदेपासून देश-परदेशांतही व्हायला लागले.

एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. राहुल गांधींचेही तसेच झाले. त्यांनी मोदी आणि अदानीच्या ‘मैत्रीला’ त्यांच्या आकलनानुसार सर्वच व्यासपीठावर रंगवले. या मैत्रीला देशातील सामान्यांच्या खिशासोबत जोडले.

लाखो कोटींची गुंतवणूक करण्यात आलेल्या अदानी समूहाचा कथित गैरकारभार चव्हाट्यावर आणत थेट मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या राहुल गांधींच्या आक्रमक प्रश्‍नाला सरकारने सवयीप्रमाणे उत्तर देण्याचे टाळले.

शीघ्रकोपी भाजपने ‘ऑपरेशन राहुल’ची रणनीती आखली. त्यांना संसदेत बोलू दिले गेले नाही. मानापमान नाट्यात दोन वर्षांची शिक्षा झाली. खासदारकी गेली. आणि सरकारी बंगलाही.

या संपूर्ण यशस्वी ऑपरेशनमुळे हर्षवायू झालेल्या भाजपचा आनंद मात्र चार दिवसांच्या वर टिकू शकला नाही. देशातील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे.

सगळे विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्रित आले आहेत. तशातच बुधवारी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्याचे सर्वेक्षण आले आहे. बहुतेकांनी कॉंग्रेसचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेले वर्षभर पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात मेहनत घेत आहेत. त्यांनी विविध योजनांच्या शुभारंभाचा नारळ फोडला. अनेक प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. पुढे काय काय करू हे सांगितले. मागच्या दोन महिन्यांत सात दौरे केलेत.

इतके करूनही मतदारांचा निवडणूकपूर्व कौल इतका विचित्र कसा येऊ शकतो? डबल इंजिनाची भुरळ इथे का पडली नसावी? राहुल गांधींना झालेल्या शिक्षेचे पडसाद कर्नाटकात उमटत असल्याचे दिसते.

‘आमचे चुकलेच’ असे भाजपचे नेते खासगीत बोलत आहेत. कर्नाटकातच काय लोकसभेपर्यंत राहुल गांधी प्रकरणाची धग पेटत राहिली तर कसे होणार, याबाबत भाजपात खलबते सुरू आहेत. ती धग विझू नये म्हणून इकडे कॉंग्रेसचे चाणक्य कामाला लागले आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Latest News: राहूल गांधी यांची खासदारकी रद्द; भाजपची सुडबुध्दीने कारवाई?

सहानुभूतीचे कार्ड

राहुल गांधींना धडा शिकवायला निघालेल्या भाजपचाच रक्तदाब वाढला आहे. प्रारंभी हादरलेल्या कॉंग्रेसला आता राहुल गांधींची शिक्षा पक्षासाठी लाभदायक असल्याचे वाटत आहे. अन्य विरोधी पक्षांना एकत्रित आणणे कॉंग्रेसच्या आवाक्यात नव्हतेच.

ते भाजपच्या कर्माने एका झटक्यात करून दाखवले. भाजपविरोधी बळ संचारल्याने राहुल गांधी यांच्यापेक्षाही पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींवर जहाल आरोप करीत आहेत.

राहुलचे नाव घेताच पारा चढणाऱ्या ममता बॅनर्जी या स्वत:हून अंतर्गत मतभेद विसरून सर्व विरोधी पक्ष मोदी विरोधात एकत्र येऊया म्हणून साद घालताना दिसत आहे.

राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत वरच्या न्यायालयात आव्हान द्यावे लागेल. सुरतच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावून आज तेरा दिवस झालेत, तरी कॉंग्रेसकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.

अशावेळी राहुल गांधी यांना तुरुंगात जावे लागेल. तशीही त्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु कॉंग्रेसमधीलच काही नेते शिक्षेला आव्हान देण्याच्या विचाराचे आहेत.

एका किरकोळ कारणावरून राहुल गांधी तुरुंगात गेले तर देशाचे राजकीय गणित बदलू शकते, ही भीती भाजपला आहे. राहुल गांधींसाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात आपणच पडलो, अशी भाजपची स्थिती झाली आहे.

राज्यघटनेपेक्षाही भारतीय दंडसंहितेचा दांडगा अभ्यास असलेल्या भाजपच्या सराईत नेत्यांनी तर राहुल गांधी यांनी कोणत्या न्यायालयात कसे आव्हान द्यायचे, याबाबत सल्ले देत आहेत.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा असो वा रविशंकर प्रसाद किंवा गृहमंत्री अमित शहा असोत, या नेत्यांनी राहुल गांधी यांनी अद्याप अपील का केली नाही, म्हणून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकूणच राहुल गांधी यांनी शिक्षा भोगणे हे भाजपसाठी अवघड जागेचे दुखणे होऊन बसणार आहे. राहुल गांधींच्या शिक्षेवर स्थगिती येणे आणि त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व त्यांना पुन्हा बहाल होणे, हीच बाब भाजपसाठी फायदेशीर ठरेल.

अन्यथा कर्नाटकात साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून, कितीही विकासाच्या वल्गना केल्या तरी कर्नाटक हातचे जाताना पाहावे लागेल, अशी भाजपला भीती वाटते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi News: राहुल गांधी आणि राजकीय वादळ

कर्नाटकात आठ मे हा प्रचाराचा शेवटचा दिवस असेल. राहुल गांधी यांनी तुरुंगात जायचेच ठरवले, तर पंधरा दिवस त्यांना तेथील प्रचारापासून वंचित राहावे लागेल.

सत्ता दारात असताना राहुल गांधी यांनी तुरुंगात जाणे परवडणारे आहे काय, यावर कॉंग्रेसमध्ये मंथन होत आहे. राहुल तुरुंगात गेल्यास अपेक्षेपेक्षाही अधिक जागा कॉंग्रेस जिंकतील, असाही तर्क आहे.

ज्या कोलारमधील प्रचारसभेतील भाषणावरून हे सगळे महाभारत घडले, त्याच कोलारमध्ये पाच एप्रिल रोजी राहुल गांधींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे ते सरकारवर कशी तोफ डागतात, याविषयी औत्सुक्य आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : परदेशात जाऊन भारताचा अवमान करणे राहूल गांधींचा अजेंडा : भाजप

गेल्या आठवड्यात विरोधकांच्या दृष्टीने पुन्हा एक चांगली गोष्ट घडली. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून भाजपकडून जेव्हा कांगावा केला जातो तेव्हा ‘मी सावरकर नाही’ असे प्रत्युत्तर मिळते.

यामुळे राहुल गांधी सहयोगी पक्षाची नाराजी ओढवून घेतात. उद्धव ठाकरेंनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला संजय राऊत यांनी ‘मी येणार नाही’ म्हणत निषेध नोंदवला. सावरकर हे केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे किंवा भाजपचेच दैवत नाही. महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

स्वातंत्र्य चळवळ असो, समाजकारण असो वा साहित्य असो, या क्षेत्रांतील या माणसाचे मोठेपण अमान्य कसे करणार? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच बैठकीत राहुल गांधी यांचे कान टोचले, ते खूप बरे झाले.

राहुलनेही ‘मी पवारांचा आदर करतो’ असे सांगत पुन्हा असे बोलणार नाही म्हणून शब्द दिला.

इतिहास असा आहे, की राहुल गांधी बोलतात ते करून दाखवतात. आता उद्धव ठाकरेही खुश आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सध्यातरी बिघाडीचे कोणतेही कारण दिसत नाही. जे होते ते पवारांनी निस्तरले.

मोदी कर्नाटकात जोरदार प्रचार करणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री मैदानात उतरत आहेत.

विरोधकांनी अदानीच्या नावाने कितीही बोंबा ठोकल्या तरीही टक्कल असलेल्यांना कंगवे विकण्याचे कौशल्य भाजपच्या नेत्यांमध्ये आहे. दुसरे असे की कॉंग्रेसने कर्नाटक जिंकले तरीही लोकसभेचे गणित वेगळे असते.

दिल्लीत विधानसभेत केजरीवालांचा एकहाती विजय होतो आणि लोकसभेत शंभर टक्के भाजप असतो. हे केवळ एक उदाहरण आहे. त्यासाठी विरोधकांना एकीचे बळ शेवटपर्यंत टिकवावे लागेल, तर त्यांचा टिकाव लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com