Farmer Producer Company : देशासह जागतिक स्तरावर शेतकरी कंपन्यांना संधी

कंपनीच्या रूपाने शेतकरी संघटित झाल्यास शेतीतील समस्या सोडवणे शक्य होईल. भारतीय शेतीमालाला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत नाव मिळवण्याची संधी आहे. सुपर मार्केट्‌स व खरेदीदारांकडून शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनांना पसंती आहे. ‘व्हिजन’ ठेवून कामकाज केल्यास यश निश्‍चित आहे. नाशिक (मोहाडी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांचे मुलाखतरूपी प्रकट केलेले हे विचार.
FPC
FPCAgrowon

शेतकरी कंपनीचे महत्त्व व आव्हाने सांगा.

शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना सहकाराचे सुधारित स्वरूप आहे. शेतकऱ्याला व्यक्तिगत पातळीवर हवामान बदल, पीक उत्पादन, बाजारपेठ, विक्री अशा विविध पातळ्यांवर समस्या सोडविणे जिकिरीचे झाले आहे. प्रक्रिया व मूल्यवर्धनसाठी आवश्यक सुविधा निर्माण करायला हव्यात. त्यासाठी कंपनीच्या रूपाने संघटन हीच दिशा आहे. काही शेतकरी उत्पादक कंपन्या शासकीय योजनेचा भाग व मिळणारे फायदे डोळ्यासमोर ठेऊन स्थापन झाल्या आहेत. शेतीचे मुख्य प्रश्न, उद्देश कळले नाहीत तर कंपनी प्रभावी व नेटके कामकाज करू शकत नाही हे निदर्शनास येत आहे. उद्देश, भविष्यातील कामकाजाची स्पष्ट दिशा व संघटन असे विचार शेतकरी उत्पादक कंपनीच्या नेतृत्वाकडे आहे का? हे सर्वात मोठे आव्हान देशभर जाणवत आहे. शेतकरी कंपन्यांची नोंदणी होत आहे. मात्र त्या कागदावरच असल्याचे दिसून येते. आणखी आव्हान म्हणजे भांडवल. शेतकरी व्यतिरिक्त बाहेरील सभासद व त्यांचे भांडवल घेता येत नाही. भांडवलासाठी बऱ्याच शेतकरी कंपन्या संघर्ष करत आहेत.

संधी काय दिसतात?

ग्राहकाला सुरक्षित व तेही पारदर्शक (ट्रेसेबल), प्रमाणित व किफायतशीर स्वरूपात अन्न हवे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छोट्या संस्था ग्राहकांपर्यंत पोचून विक्री व्यवस्था उभ्या करू शकतात अशा जमान्यात आपण आहोत. बाजारात व्यक्तिगत शेतकऱ्यांऐवजी ग्राहक पहिले प्राधान्य शेतकरी उत्पादक कंपन्यांना देतो हा अनुभव आहे. भारतात हे प्रमाण कमी असले तरी जगभर ते अधिक आहे. जगातील मोठे सुपर मार्केट्स, रिटेलिंग, इ-कॉमर्स कंपन्या आदींना थेट शेतकऱ्यांसोबत काम करायचे आहे. शेतकरी कंपन्या खासगी कंपन्यांच्या तुलनेत त्यामुळेच नक्कीच पुढे जाऊ शकतात.

FPC
Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा

वाटचाल कशी असावी?

संस्था तसेच व्यक्तिगत पातळीवर स्वॉट ॲनॅलिसिस (SWOTAnylisis) होणे गरजेचे आहे. आपल्या भक्कम व कमकुवत बाजू, संधी नीट समजून घ्यायला हव्यात. ज्या भागात, वातावरणात आपण राहतो तेथील पीक पद्धती, सिंचन स्रोत, जमीन स्थिती, बाजारपेठ, वाहतूक, बाजारपेठा, त्यात होणारे बदल, ग्राहकांचा मागणीचा कल या बाबींची सखोल माहिती घेतली पाहिजे.

सन २००२ मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा कायदा संमत झाला. वीस वर्षांतील पहिल्या दहा वर्षांत अवघ्या ५० कंपन्यांची नोंदणी झाली. सन २०१० ते २०१५ टप्प्यात ५०० तर २०१५ ते आत्तापर्यंत २० हजारांवर कंपन्या स्थापन झाल्या असतील. सरकारी योजना किंवा अनुदानाच्या भोवतीच त्या फिरत आहेत. त्यामुळे मेहनतीची तयारी, प्रामाणिक दृष्टिकोन असेल तर अडथळे कितीही असतील तर बदल घडू शकतो.

FPC
Soybean Rate : यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

-येत्या दशकात कंपन्या कशा आधारभूत ठरतील?

जागतिक बाजाराचा आपण घटक आहोत. तंत्रज्ञानाचे हे युग असल्याने गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना प्रत्येक पिकात संधी आहे. जागतिक बाजारात सक्षमपणे उतरणे भारतीय शेतकऱ्यांची गरज आहे. बाजार तुम्हाला शोधण्यापेक्षा तो तुमच्याकडे चालून येणार असं घडविण्यासाठी सिद्ध करावे लागणार आहे.

जागतिक स्पर्धेत टिकाव कसा लागेल?

पीक, उत्पादन, प्रक्रिया अशा सर्व पातळ्यांवर स्पर्धा आहेच. आपण जेवढे पुढे जातो तेवढी ताकद वाढलेली पाहिजे. ब्रॅण्ड हा मूल्यसाखळीचा सर्वात शेवटचा टप्पा आहे. बाजार स्थानिक असो वा जागतिक त्यात ताकदीने उतरावे लागेल. ‘अमूल’ कंपनीच्या माध्यमातून ४० लाख दूध उत्पादक एकत्र आले आहेत. देशात पहिल्या तर जगात दुसऱ्या ते तिसऱ्या क्रमांकाचा त्यांचा ब्रॅण्ड आहे. केवळ लेबल लावणे म्हणजे ब्रॅण्ड नव्हे. अनुभव, उत्पादन दर्जा, मार्केटिंग, ग्राहकांशी संवाद व विश्‍वास या बाबी महत्त्वाच्या आहेत. यासाठी ‘बजेट’ तयार करण्यासाठी क्षमतेला महत्त्व आहे. पहिल्याच दिवशी ब्रॅण्ड तयार होऊ शकत नाही.पहिल्या टप्प्यात ‘बी-टू-बी’ स्वरूपाचे मार्केटिंग होणे, पुरवठा साखळी उभी राहणे, विक्री करणे त्यातून स्थिरता येते. यातून भांडवल उभारणीसाठी सम विचारी संस्थांनी एकत्र येऊन काम करणे हा विचार शहाणपणाचा आहे. कुठल्याही शेतकरी उत्पादक कंपनीने उभे राहण्यासाठी किमान ५ ते १० वर्षे द्यायला हवी. त्यातून ब्रॅंडिंगसाठी ‘बजेट’ तयार होऊ शकेल. उत्पादन, गुणवत्ता, नैसर्गिक आपत्ती, वाढलेला खर्च, काढणी पश्चात यात आव्हाने आहेतच. सर्वात जास्त खर्च ‘मार्केटिंग’ पातळीवर असून त्यासाठी भांडवल हाच मोठा प्रश्न आहे.

जागतिक संधी काय आहेत?

निर्यातीचा विचार केल्यास उत्पादनाच्या अंगाने कार्यक्षम व गुणवत्तेच्या पातळीवर आपण पुढे असल्याने संधी आहेत. आपण गहू, तांदूळ, फळे भाजीपाला, डाळ, मसाले यासह मासे, म्हशीचे मांस निर्यात करतो आहे. सर्वाधिक संधी फलोत्पादन क्षेत्रात( द्राक्ष, डाळिंब, संत्रा, केळी, आंबा), त्यानंतर सुगंधी व औषधी वनस्पती, प्रक्रियायुक्त, वन्य, सेंद्रिय उत्पादने यांत अमाप संधी आहेत. नैसर्गिक ताकद म्हणजे छोटी शेती आहे. हवामानात वैविध्य असल्याने बाराही महिने एखाद्या गोष्टीचा पुरवठा व मूल्यवर्धन शक्य आहे. अन्य देशांना शक्य नाही. केळीसारख्या पिकात आपण २१ टक्के उत्पादन करतो. मात्र निर्यात कमी आहे. संघटीतपणे युरोप,जपान बाजारपेठेत आपल्याला १०० पट संधी आहेत. रेशीमशेतीत चीनला ‘रिप्लेस’ करण्यास संधी आहे. जगात ९० टक्के ‘जीएम’ सोयाबीन आहे. भारतात मात्र ते नॉन-जीएम’ आहे. ही आपली ताकद आहे.

ज्याला अभ्यास करण्याची इच्छा आहे त्याला जगभर वाटा खुल्या आहेत. जगभर उत्पादनांची खरेदी-विक्री, प्रत्येक देशातील खरेदीदार-विक्रेते यांची माहिती सहज उपलब्ध होते. जगभरातील प्रदर्शनांना भेट दिल्यास आवाका समजतो. त्यासाठी फिरलं पाहिजे. जाणून घेण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. फळे भाजीपाला, फुले यात एकात्मिक मूल्यासाखळी गरजेची आहे. एका हंगामी पिकापेक्षा दोन ते तीन पिकांची ती एकत्रित हवी. त्यामुळे सभासदांना पर्याय उपलब्ध होऊन जोखीम कमी होते. यातून कंपनीच्या पातळीवर वार्षिक नियोजन, पायाभूत उभारणी व बाजारपेठ व्यवस्थापन करणे सोपे होते. भारतात दुधात ‘अमूल’ व सहकारी दूध संघाच्या निमित्ताने हे उदाहरण पाहायला मिळते.

१०.स्पर्धेत टिकण्यासाठी ‘सह्याद्री’ने केलेले बदल सांगा.

पुढील किमान १०० वर्षांचे उद्दीष्ट ठेऊन कंपनीच्या उभारणीची दिशा ठेवली. द्राक्षासाठी चांगली मूल्यसाखळी, दुसऱ्या टप्प्यात तीन-चार पिके मिळून फलोत्पादनात एकात्मिक कामकाज व पुढचा टप्पा म्हणजे ब्रॅण्ड असा दृष्टिकोन होता. ‘गेम चेंजर’ तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतला. ‘स्टार्टअप’ उभे केले. उपलब्ध भांडवलानुसार विकास टप्प्याटप्प्याने केला. सर्व कामकाज जागतिक दर्जाचेच असले पाहिजे.

ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती सक्षम आहे. मात्र संधी मिळत नाही. ‘सह्याद्री’ ने परिसरातील तरूणांच्या साथीने कंपनीची उभारणी, तंत्रज्ञान, माध्यमे उभी केली. कौशल्य विकासासाठी सर्वच पातळ्यांवर लक्ष केंद्रित केले. कौशल्य विकास केंद्र, ‘इनक्युबेशन सेंटर’ उभे राहिले. बारा वर्षांच्या प्रवासात छोटी कंपनी ते ‘कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन’ पर्यंत पोचता आले. हे घडले ते ‘टीम’ बांधल्यामुळेच”. कंपनीतील दोन टक्के घटकांना कुठलाच अनुभव नव्हता. काहींची सुरवातच ‘सह्याद्री’पासून झाली. त्यांच्यात आत्मविश्वास तयार केला. विश्वासार्हता हा महत्त्वाचा गाभा ठेवला.

-अन्य कंपन्यांना काय सल्ला द्याल?

कुठलीही संस्था उभी राहताना पहिला पाच वर्षांचा काळ कठीण असणार आहे. आत्मविश्वासाने पाऊल टाकायला हवी. स्पष्ट व्हीजन तयार होणे, संस्था स्थापनेचा विचार शुद्ध असणे, ज्यामध्ये भांडवल, कुशल मनुष्यबळ, विपणन कौशल्य या प्रमुख तीन मुद्द्यावर सातत्याने काम करून क्षमताबांधणी होत राहिली पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com