Women Empowerment : महिलांसाठी ‘स्मार्ट' प्रकल्पामधील संधी

आधुनिक बाजार प्रणालीत स्त्रियांची भागीदारी वाढणे, कृषी प्रक्रिया, उद्योजकता यात स्त्रियांचा आत्मविश्वास वाढणे महत्त्वाचे आहे. यातून ग्रामीण भागातील शेतकरी महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे.
Smart Projec
Smart ProjecAgrowon

कौस्तुभ दिवेगावकर, डॉ.संगीता शेटे

Indian Agricultural : कृषी क्षेत्रात विविध पिकांच्या उत्पादनामध्ये महिलांचा सहभाग सरासरी ६० ते ८० टक्के असला तरी कृषिविषयक मूल्यसाखळीच्या विविध टप्प्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आहे. कृषिविषयक काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये (Management and marketing process) प्रामुख्याने पुरुषांचे वर्चस्व आहे.

महिलांची निर्णय प्रक्रिया तसेच विविध कृषी विषयक संसाधनापर्यंत जसे की बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजना (Government Scheme), शेतीशाळा, विस्तार सेवा, पीक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization), माहिती विश्लेषण सेवा, गोदाम तारण पावती, बाजारपेठ इत्यादी पर्यंत पोहोच अत्यल्प आहे.

कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महिलांची विविध कृषी विषयक संसाधनापर्यंत पोहोच वाढविणे, नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व कौशल्य वाढविणे तसेच निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाने मा. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामध्ये याबाबत विशेष धोरण आखले आहे. “राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्र स्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक मूल्यसाखळी विकसित करणे” हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

शेतकरी उत्पादक संस्था या प्रकल्पाच्या प्रमुख लाभार्थी आहेत. प्रकल्पामध्ये महिलांच्या सहभागाबाबत उल्लेखनीय धोरण आखले असून त्यामध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

Smart Projec
Fire In Orchard : महिला शेतकऱ्याच्या फळबागेत लावली आग

१. प्रकल्पामध्ये एकूण लाभार्थ्यांपैकी ५० टक्के महिला लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीमध्ये प्रकल्पात सहभागी झालेल्या एकूण ४२३ संस्थामध्ये ५४ टक्के महिला भागधारक आहेत व ४७ टक्के महिला संचालक आहेत.

२. प्रकल्पामध्ये सहभागी होणाऱ्या एकूण १२०० समुदाय आधारित संस्थापैंकी किमान ४०० संस्था महिलाभिमुख असणार आहेत. स्पर्धात्मक कृषी व्यवसाय करण्याकरिता कंपनी कायद्यामध्ये नोंदणी आवश्यक आहे.

सद्यःस्थितीत महाराष्ट्रामध्ये कंपनी कायद्यामध्ये नोंदणी झालेल्या शेतकरी महिलांच्या संस्थेचे प्रमाण मर्यादित आहे. त्यामुळे प्रकल्पामार्फत ४०० महिलांच्या शेतकरी उत्पादक संस्था तयार करून त्यांची कंपनी कायद्यामध्ये नोंदणी करण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

३. या ४०० संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या मार्फत स्थापित बचत गटातील शेतकरी कुटुंबातील महिलांना घेऊन तयार करण्यात येणार आहेत.

सदर स्थापन झालेल्या संस्थांचे कामकाज प्रभावीपणे करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या प्रशिक्षण गरजा ओळखून त्याआधारे त्यांची विविध विषयांवर क्षमता बांधणी करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

४. बाजार पेठेभिमुख उत्पादन करणे, काढणीपश्चात व्यवस्थापन, विपणन, बाजार माहिती सेवा याबाबतही या संस्थांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे.

५. सद्यस्थितीमध्ये एकूण ३०० महिला उत्पादक संस्था तयार झाल्या असून त्यांची कंपनी कायद्यामध्ये नोंदणी झालेली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा ओळखून त्यांच्या क्षमता बांधणीचे काम सुरू आहे. या ४०० महिलांच्या संस्था स्मार्ट प्रकल्पात भागीदारी उपप्रकल्प व बाजार वाढ संपर्क उपप्रकल्पात सहभागी होणार आहेत.

सद्यःस्थितीत यापैकी ५७ महिलांच्या संस्था भागीदारी उपप्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये डाळ मिल, स्वच्छता प्रतवारी व वर्गवारी केंद्र, गोदाम सेवा, हळद प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया, शेळीपालन, तांदूळ प्रक्रिया, खाद्य तेल निर्मिती, फळ प्रक्रिया ई बाबींचा समावेश आहे.

६) संमिश्र शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये भागधारक व संचालकपदी महिला असल्या तरी असे आढळून आले आहे की, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग घेतला जात नाही.

त्यामुळे प्रकल्पामध्ये संमिश्र शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये ३० टक्के महिला भागधारक आणि २० टक्के महिला संचालक ठेवण्याच्या उद्दिष्टाबरोबरच त्यांची कृषी आधारित मूल्यसाखळीच्या विविध घटकांच्या अनुषंगाने क्षमता बांधणी उदा. बाजारपेठेभिमुख उत्पादन, काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन, बाजार माहिती सेवा, नेतृत्व गुण इत्यादी करण्यावर प्रकल्पातून विशेष भर दिला जात आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवून त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत.

गोदाम तारण योजनेमध्ये सहभाग ः

१) शेतजमीन नावावर नसल्यामुळे गोदाम तारण योजनेमध्ये महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या मार्फत स्थापित शेतकरी उत्पादक कंपनी व लोकसंचलीत साधन केंद्र यांना एकूण ५५ गोदाम बांधकाम व गोदाम तारण योजनेचे उद्दिष्ट आहे जेणेकरून महिला शेतकरी या गोदामात शेतमाल ठेवून गोदाम तारण योजनेचा लाभ घेवू शकतील, बाजारात योग्य भाव नसताना विक्री होणार नाही.

२) सद्यःस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत स्थापित तीन संस्था या योजनेचा लाभ घेत असून उर्वरित संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्याचबरोबर महिलांचे नाव शेत जमिनीवर सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्याकरीता “लक्ष्मी मुक्ती” शासन निर्णयावर जनजागरण करण्यात येत आहे.

Smart Projec
Women's Day : महिला, संस्थांचा महिलादिनी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

कृषी विस्तार सेवेचा लाभ ः

कृषी विभाग हा या प्रकल्पाकर‍िता शिखर विभाग आहे. हा विभाग प्रामुख्याने कृषी विस्तार सेवेच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढविण्याकरिता कार्यरत आहे.

सदर प्रकल्पाअंतर्गत बाजारपेठेभिमुख उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे या अनुषंगाने सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. क्षमता बांधणीमध्ये महिलाभिमुख खालील बाबींवर विशेष भर दिला जात आहे.

१) महिलांचा कृषी क्षेत्रात सहभाग वाढविण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता वाढविणे.

२) महिलांचा कृषी उत्पादनातील सहभाग लक्षात घेऊन त्या आधारे शेती शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे.

३) महिला उत्पादकांना कृषी व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहित करणे.

४) महिला संस्थांची कृषी विपणन अन्वेषण सेवेपर्यंत पोच वाढविणे.

५) महिला उत्पादक, पशुसखी व कृषी सखी यांची बाजारपेठेभिमुख उत्पादन, कृषी तंत्रज्ञान काढणीपश्चात व्यवस्थापन, विपणन, बाजार माहिती सेवा यावर क्षमता बांधणी करणे.

६) सद्यःस्थितीत एकूण २०० अधिकारी व कर्मचारी यांचे ‘कृषी मूल्य साखळीमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे‘ याबाबत प्रशिक्षण झाले आहे.

‘स्मार्ट कॉटन' उपप्रकल्प ः

१) ‘स्मार्ट कॉटन' या उपप्रकल्पामध्ये कापूस उत्पादक (महिला/पुरुष) सहभागी होणार असून त्यांचे समूह तयार करून त्यामार्फत एकसमान धागा, काडीकचरा विरहित कापूस निर्मिती करून कापसाच्या धाग्याच्या गुणवत्तेवर आधारित कापूस गाठींचे ई मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

२) कापूस उत्पादनामध्ये महिलांचा ७० टक्यांच्यावर सहभाग आहे. त्यामुळे नावावर शेतजमीन नसली तरी अल्प व अत्यल्प भूधारक कुटुंबातील महिला कापूस उत्पादनामध्ये सक्रिय असतात.

त्यामुळे सदर उपप्रकल्पामध्ये समाविष्ट होण्याकरिता महिलांच्या नावावर शेती नसली तरी उत्पादक महिला/शेतकरी कुटुंबातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून नावावर शेतजमीन नसल्यामुळे महिला या प्रकल्पापासून वंचित राहणार नाहीत.

३) सद्यस्थितीमध्ये प्रकल्पात समाविष्ट एकूण कापूस उत्पादकांपैकी ३० टक्के महिला उत्पादक आहेत. पारंपारिक कापूस मूल्यसाखळीमध्ये विपणन प्रक्रियेत महिलांचा नगण्य सहभाग असून स्मार्ट प्रकल्पामध्ये गुणवत्तापुर्वक कापूस निर्मिती बरोबरच कापसाचे गाठीत रूपांतर करून त्याची ऑनलाइन ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मार्फत विक्री करण्यामध्ये महिलांचा गुणवत्तापुर्वक सहभाग होणार आहे.

संपर्क ः डॉ. संगीता शेटे, ९४२१०२८०७९, (कौस्तुभ दिवेगावकर हे ‘स्मार्ट' चे प्रकल्प संचालक आहेत. डॉ.संगीता शेटे या स्मार्ट प्रकल्पामध्ये समाज विकास विशेषज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com