Milk News : ऑक्सिटोसीनमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बदनामी

ग्लॅमरची दुनिया सोडून हे बदनाम ऑक्सिटोसिन तुमच्या-आमच्या घरात येत असल्याची ओरड आजकाल वृत्तपत्रातून होताना दिसते.
Milk News
Milk NewsAgrowon

- स्नेहल माने


ऑक्सिटोसिन (oxytocin) नावाच्या इंजेक्शनची (Injection) चर्चा नेहमीच होत असते. जास्त करून कोवळ्या पोरीचा देह निब्बार बाईच्या देहात बदलण्यासाठी जी सुई टोचली जाते, त्यामुळे हे नावं चर्चेत असतं. मागे एकदा हंसिका मोटवानी नावाच्या अभिनेत्रीमुळे हे ऑक्सिटोसिन चर्चेत आलं होतं. थोडक्यात कधी बाईची छाती मोठी करण्यासाठी, तर कधी मांड्यांना आकार देण्यासाठी तर कधी शरीरावरच्या उभारांना आणखी उभारी देण्यासाठी, हे इंजेक्शन वापरलं जातं अशा चर्चा असतात. पण मग ग्लॅमरची दुनिया सोडून हे बदनाम ऑक्सिटोसिन तुमच्या-आमच्या घरात येत असल्याची ओरड आजकाल वृत्तपत्रातून होताना दिसते.  

Milk News
Flower Market : फूल उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

म्हणजे आपण जे दूध घरी आणतो त्यात ऑक्सिटोसीन मिसळलेलं असतं कारण, शेतकरी म्हणे दुधवाढीसाठी त्याच्या गाई म्हशींना हे इंजेक्शन टोचतो. यातून कॅन्सरसारखे भयानक रोग होत असल्याच्या, मुली लवकर पौगंडावस्थेत येत असल्याच्या बतावण्या केल्या जातात. आता या ज्या ऑक्सिटोसीनच्या नावाच्या बदनाम बातम्या येतात त्यात शेतकरी विनाकारण बदनाम होतोय असंही एका बाजूला म्हटलं जातंय, त्यात खरंच काही तथ्य आहे का?आधी समजून घेऊ की, हा ऑक्सिटोसीन नेमका प्रकार काय आहे? तर ऑक्सिटोसिन हे खरं तर मानवासह इतर सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारं एक हार्मोन आहे. सस्तन प्राण्यांमध्ये शरीरात दूध तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे ऑक्सीटोसीन सस्तन प्राण्यांच्या पिटीट्यूटरी नावाच्या ग्रंथीमध्ये असतं.सस्तन प्राण्यांमध्ये जेव्हा स्तनपान सुरू होतं तेव्हा हे हार्मोन महत्वाच असतं कारण यामुळे दुधाच्या ग्रंथी स्त्रवतात. पण कधीकधी काही कारणांनी ते स्त्रवतच नाही. यामागे बरीच कारणं असतात. उदाहरण म्हणून आपण गायी म्हशी बघू. तर एखाद्या दुधाच्या गाईचं जर वासरू मेलं तर गाईला पान्हा फुटत नाही, मग अशावेळी या ऑक्सिटोसीन हार्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं आणि जेणेकरून तिला पान्हा फुटावा आणि तिने धार दयावी. 

Milk News
Warana Milk : दूध उत्पादक, कर्मचाऱ्यांना ‘वारणा’ देणार ५४ कोटी ६३ लाख

पण आता अशा बातम्या येतात की, शेतकरी दुभत्या जनावरांचं दूध वाढवण्यासाठी मुद्दाम हे ऑक्सिटोसीन इंजेक्शन वापरतात आणि जनावरांनी दिलेल्या दुधातून हे मानवाच्या शरीरात जातं, त्यामुळे कॅन्सरसारखा भयानक रोग होण्याची भीती निर्माण होते, तरुण मुलींनी हे दूध पिल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो असं बरंच काही. यात तथ्य आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही ऍनिमल न्यूट्रिशन एक्स्पर्ट डॉ. दिनेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते सांगतात की, "ऑक्सिटोसीन नावाचं एक हार्मोन असतं जे प्राण्यांच्या किंवा मानवाच्या शरीरात तयार होतं. त्याचं प्रमाण कमी असेल तर गाय किंवा म्हैस दुधाचा पान्हा सोडत नाही आणि त्यामुळे ऑक्सिटोसीन नावाचं इंजेक्शन वापरावं लागतं.""पण मग कधी कधी म्हशी किंवा गाई दुधाचा पान्हा सोडताना त्रास देत असतील तर शेतकरी स्वतःच हे इंजेक्शन मारून मोकळे होतात.

Milk News
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना मुभा 

पूर्वी हे खूप व्हायचं. पण आता हे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय सहज उपलब्ध होत नाही. आणि त्याच्या किंमतीही जास्त असल्याने ते सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतं. बऱ्याचदा मोठमोठे तबलेवाले अशा इंजेक्शनचा वापर करतात, त्यांचं आणि बऱ्याच पशूवैद्यकांच साटलोट असतं."मग याचा मानवी शरीरावर परिणाम होतो का? यावर भोसले सांगतात की, "एखाद्या गाईला किंवा म्हशीला ऑक्सीटोसीनचं इंजेक्शन दिलं की ते दहा ते पंधरा मिनिटात प्रोटीनच्या स्वरूपात डायजेस्ट होतं. त्यामुळे आत्तापर्यंत असा एकही रिपोर्ट नाहीये की, ज्यात असं म्हटलंय की, ऑक्सिटोसीनच्या इंजेक्शनमुळे माणसांवर त्याचा इफेक्ट झालाय. कारण हे इंजेक्शन फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपला इफेक्ट दाखवतं, ते गाईच्या किंवा म्हशींच्या दुधात येत नाही."मग दुधाचा उत्पादन वाढावं म्हणून शेतकऱ्यांकडून हे इंजेक्शन टोचलं जातं अशा ज्या बातम्या येतात त्यावर भोसले सांगतात, "अशा बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाहीये. ऑक्सिटोसीन इंजेक्शनमुळे दुधाचं उत्पादन वाढत नाही.

शेतकरी गाय म्हैस कशा पद्धतीने पाळतो हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सामान्य शेतकरी जास्तीत जास्त दुधात पाणी मिक्स करतो, त्याव्यतिरिक्त हे असे महागडे पर्याय वापरणं त्याच्यासाठी सोपं नसतं."आता फक्त डॉ. भोसलेंचं असं सांगतात असं नाही तर 1991 मध्ये जर्नल ऑफ डेअरी सायन्समध्ये ऑक्सीटोसीनशी संबंधित एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला होता. यात म्हटलं होतं की, "हॉलिस्टिन जातीच्या गायींना सलग 305 दिवस 20 एमएम इतकं ऑक्सीटोसीन इंजेक्शन देण्यात आलं. मात्र या गायींमध्ये कासेला दाह, वेदना अशा कोणत्याही समस्या आढळून आल्या नाहीत. तसेच गायींमध्ये 21 दिवसांची एस्ट्रस सायकल असते त्यातही काही बदल झाला नाही."एवढंच नाही तर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, हरियाणानेही ऑक्सीटोसीनशी संबंधित एक रिसर्च केला होता. यात म्हशींना 90 दिवसांसाठी दररोज 2.5 आणि 5 एमएम इतका ऑक्सीटोसीनचा डोस देण्यात आला होता. पण यातही म्हशींच्या एस्ट्रस सायकलवर किंवा गर्भधारणेच्या क्षमतेवर कोणताच परिणाम झाल्याचं आढळलं नाही. मात्र हे इंजेक्शन बंद केल्यावर त्यांच्या दुधात कमतरता आली. थोडक्यात म्हशींना याचं व्यसन लागलं होतं. त्यांची नैसर्गिक पान्हा फुटण्याची क्षमता बंद झाली होती, इतकंच काय ते. बरं हे ऑक्सिटोसीन दुधात स्त्रवतं का? म्हणून हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन सायन्सच्या संशोधकांनी 2014 साली अभ्यास केला होता. या अभ्यासात त्यांना ऑक्सिटोसीन दिलेल्या आणि न दिलेल्या गायींच्या दुधात ऑक्सिटोसीनची पातळी अगदीच समान दिसली.त्यामुळे कॅन्सर वैगरे होतो किंवा हे ऑक्सिटोसीन दुधात स्रवत असं जे काही म्हटलं जातं त्याला काही पुरावे सापडत नाहीत.

पण मग ऑक्सिटोसीन धोकादायक नाही तर त्यावर बंदी का आहे असा प्रश्न तुम्हाला सहज पडू शकतो? तर डॉ. भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतःच उपचार करण्याच्या नादात शेतकरी किंवा तबलेवाले अतिप्रमाणात याचा डोस देण्याची शक्यता असते. ज्यामुळे जनावरांना त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा सिंथेटिक ऑक्सिटोसीन महाग असल्याकारणाने शेतकरी काळ्या बाजारातून क्रूड पिटीट्यूटरी हार्मोन खरेदी करतात. या हार्मोन मध्ये गोनाडोट्रोपीन सारखे बरेच नानाविध प्रकार असतात. अशा हार्मोनल इंजेक्शनची बाजारपेठ खूप मोठी आहे. याचा दुष्परिणाम जनावरांवर होतो.यावर बंदी घातल्याने प्रश्न सुटणार आहे का? तर नाही, पशुवैद्यक क्षेत्रात याचं महत्व लक्षात घेता यावर सरसकट बंदी घालणं संयुक्तिक ठरणार नाही. यामुळे ऑक्सिटोसीन इंजेक्शनची काळ्या बाजारात किंमत वाढते, शेतकऱ्यांना ते घेणं परवडत नाही. मग अशावेळी इतर स्वस्त इंजेक्शन्स बाजारात सहज मिळतात, ज्याचा वाईट परिणाम होतो. या औषधावर सरसकट बंदी घालू नये अशी शिफारस 2018 साली ड्रग्ज टेक्निकल ऍडवायजरी बोर्डेने केली होती. उलट या औषधाबाबत असणारे गैरसमज दूर करून त्याचा योग्य वापर करत दूध उत्पादन वाढवण्याचा सल्ला भारतीय कृषी संशोधन संस्थेने दिला होता.

या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, ऑक्सीटोसीन हे काही विष नाही. उगाच कुठल्या अभिनेत्रीने निब्बर दिसण्यासाठी इंजेक्शन घेतलं म्हणून ऑक्सिटोसीनबद्दल सरसकट गैरसमज पसरवणे हे मूर्खपणाचे आहे. लालबत्तीमुळे बदनाम झालेल्या या औषधामुळे आपल्या घरात येणाऱ्या भाजीपाला दुधावर काहीही परिणाम होत नाही. झालाच तर या अफवांमुळे शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय मात्र येतो. तात्पर्य गाईपासून बाईला आपल्या अर्धवट ज्ञानाने वेठीस धरण्यात काहीच अर्थ नाही हे नक्की.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com