Paddy: धान उत्पादन वाढीकरिता अॅझोला उपयुक्त आहे?

कमी खर्चाचे उत्तम हिरवळीचे खत म्हणून धान पिकामध्ये अॅझोलाचा वापर करता येतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr.Punjabrao Deshmukh Agriculture University) केलेल्या शिफारशीनूसार अॅझोलाचा वापर धान पिकामध्ये कसा करायचा हे जाणून घेऊया.
paddy Production
paddy ProductionAgrowon

धान उत्पादन (Paddy Production) वाढीकरिता शेतकरी रासायनिक खते व इतर खतांचा (Fertilizer) वापर करतात तसेच काही शेतकरी हिरवळीच्या खातांमध्ये ढैंचा, सोनबोरू व इतर पिकाची लागवड करुन चिखलणी करताना जमिनीमध्ये गाडतात.

यामध्ये कमी खर्चाचे उत्तम हिरवळीचे खत म्हणून धान पिकामध्ये अॅझोलाचा वापर करता येतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr.Punjabrao Deshmukh Agriculture University) केलेल्या शिफारशीनूसार अॅझोलाचा वापर धान पिकामध्ये कसा करायचा हे जाणून घेऊया.

अॅझोला ही वनस्पती शेवाळ या प्रकारात मोडते. ही वनस्पती पाण्यावर तरंगते. या वनस्पतीमध्ये प्रथिने तसेच क्षारतत्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह व मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. अॅझोलामध्ये २५ ते ३० टक्के प्रथिने १० ते १५ टक्के क्षारद्रव्ये व ७ ते ३६ टक्के अमिनो ऍसिड असतात. त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते.

अॅझोलाचा धान पिकामध्ये वापर
अॅझोला ही एक पान वनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून धान पिकात वापरतात. अॅनाबिना अॅझोली हे शेवाळ अॅझोला सोबत सहजीवी पद्धतीने वाढते व हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. अॅझोला वाढविण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये अॅझोला विशिष्ट प्रकारच्या टप्प्यात वाढवून धान पेरणीपूर्वी एक महिना अगोदर बांधीत टाकतात व दहा ते पंधरा दिवसांनी बाजूला नांगराच्या साह्याने गाडतात.

दुसऱ्या प्रकारामध्ये अॅझोला नर्सरी मध्ये वाढवितात. धान रोवणीनंतर दहा दिवसांनी बांधीत टाकतात आणि कोळप्याच्या किंवा इतर यंत्राच्या साह्याने जमिनीत गाडतात. प्रती चौरस मीटर क्षेत्रासाठी ५०० ग्रॅम अॅझोला बांधामधील पाण्यामध्ये फेकून देतात.

नर्सरी मध्ये अॅझोला उत्पादन कसे घ्यायचे ?
अॅझोला वनस्पतीचे उत्पादन घेण्यासाठी झाडाच्या सावलीत पाच बाय आठ फूट आकाराचा खड्डा तयार करावा. हा खड्डा प्लास्टिकच्या विशिष्ट प्रकारच्या आवरणाने अच्छादन करून घ्यावा. दहा-बारा किलो काळी माती या प्लास्टिकच्या आच्छादनावर पसरवून घ्यावी. त्याचबरोबर गाईचे शेण दोन किलो व तीस ग्रॅम सुपर फॉस्फेट दहा लिटर पाण्यात चांगले मिसळावे हे मिश्रण खड्ड्यामध्ये टाकावे अशा मिश्रणात ताजे पाणी १० सेंटीमीटर उंचीपर्यंत टाकावे.

या खड्ड्यात ५० ग्रॅम ते एक किलो ताजे व स्वच्छ अॅझोला कल्चर टाकावे. अशा प्रकारे तयार केलेल्या खड्ड्यात अॅझोला वनस्पती वेगाने वाढते व खड्डा दहा ते पंधरा दिवसांत अॅझोला वनस्पतीने भरून जातो. त्यानंतर दररोज ५०० ते ६०० ग्रॅम अॅझोलाचे उत्पादन घेता येते. जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी अशा तयार खड्ड्यात एक किलो गाईचे शेण व २० ग्रॅम सुपर फॉस्फेट यांचे दर पाच दिवसांनी टाकावे. त्याचप्रमाणे दर आठवड्याला क्षारद्रव्याचे मिश्रण यामध्ये टाकावे.

काय काळजी घ्यावी
-खड्डा तयार करण्याची जागा ही सावलीत परंतू भरपूर सूर्यप्रकाशात असणारी असावी त्यावर थेट ऊन पडू देऊ नये.

-पाण्याची पातळी ही १० सेंमी कायम ठेवावी.

-वनस्पतीचे रोग, कीडा, मुंगी, वाळवी इत्यादी पासून संरक्षण करावे. दर 30 दिवसांनी खड्ड्यातील पाच टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी. तर पाच दिवसांनी २५ ते ३० टक्के खड्ड्यातील जुने पाणी हे ताज्या पाण्याने बदलावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com