
गणेश कोरे
फळशेतीमध्ये चांगल्या प्रकारे अनुभवी असलेल्या पांडुरंग बरळ (Pandurang Baral) यांनी प्रायोगिक तत्त्वावर तीन गुंठ्यांमध्ये पॅशन फ्रूट (Passion Fruit) लागवड केली. त्यातून आत्मविश्वास मिळवत या नव्या फळशेतीचा (Fruit Culture) विस्तार एक एकरापर्यंत केला आहे. शेतीमध्ये रुजवलेले हे फळ बाजारपेठेमध्येही रुजवण्याची त्यांची ‘पॅशन’ दखल घेण्याजोगी आहे.
पुणे जिल्ह्यातील कचरवाडी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पांडुरंग बरळ हे आपल्या ९ एकर शेतीमध्ये अनेक वर्षांपासून सीताफळ, जांभूळ, पेरू, शेवगा आदी विविध फळ पिकांचे यशस्वी उत्पादन घेत होतेच. पांडुरंग बरळ हे पारंपरिक फळांचे यशस्वी उत्पादन घेत होतेच. मात्र एकदा राजस्थानमधील पॅशन फ्रूट शेतीचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. तुलनेने सोपे आणि आपल्याकडे नवे असलेल्या या पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला.
मग कोरोनाच्या दुसऱ्या टाळेबंदीमध्ये थेट राजस्तानपर्यंत प्रवास करत त्या शेतकऱ्याची भेट घेतली. शेती, लागवड पद्धत आणि एकूणच व्यवस्थापन पाहिल्यानंतर आपणही करू शकतो, असा विश्वास वाटला. येताना काही फळे सोबत आणली. त्यातील बियांपासून नियंत्रित वातावरणामध्ये कोकोपीटमध्ये अडीच महिन्यात सुमारे १०० रोपे तयार केली. तीन गुंठ्यांमध्ये मशागत करून ६ फुटांवर ६ इंचांचे खड्डे केले.
त्यात बेसल डोस टाकून मांडवाची सोय केली. साधारण ४ महिन्यांनी फुले आणि कळी धारणा झाली, तर सातव्या महिन्यात फळे काढणीला आली. पहिल्या काढणीत केवळ ९ किलो उत्पादन मिळाले, तरी २३० रुपये प्रति किलो दर मिळाला. एकूण हंगामात साधारण ३२५ किलो फळे मिळाली. त्याला १०० ते २५० रुपये एवढा, तर सरासरी १७५ रुपये दर मिळाला. एकूण ५७ हजार रुपये उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च होता १५ हजार रुपये.
एक एकरापर्यंत विस्तार
तीन गुंठ्यांत यशस्वी उत्पादन मिळाल्यानंतर गेल्या वर्षी एक एकरावर पॅशन फ्रूटची लागवड केली. त्यासाठी स्वतःच ८०० रोपे तयार केली. अडीच लाख रुपये खर्चून द्राक्षवेलींसारखा लोखंडी मांडव उभारला असून, १० बाय ७ फूट अंतरावर लागवड केली आहे.
सध्या पीक फुलोरा अवस्थेत आहे. तीन गुंठ्यांच्या अनुभवावरून एक एकरामध्ये साडेतीन ते चार टन उत्पादन मिळण्याचा अंदाज बरळ व्यक्त करतात. त्याला प्रति किलो सरासरी १०० रुपये दर मिळेला तरी एकरी तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पादन खर्च एक लाख रुपये होईल, असे बरळ यांनी सांगितले.
असे आहे फळ आणि अशी आहे चव
पॅशन फ्रूट हे पेरूच्या आकाराचे, पण वजनाला हलके आणि पोकळ फळ आहे. त्यात आंब्याच्या चवीचा आंबूस गोड गर आणि बिया असतात. या बिया सब्जासारखे असते. फळाला मागणी असल्याचे बरळ यांनी सांगितले. गेली अनेक वर्षांपासून पुणे बाजार समितीमध्ये विविध फळे विक्रीनिमित्त अनेक अडत्यांसोबत चांगले संबंध आहेत. फळांचे आडते करण जाधव यांच्या
पेढीवर या फळांची विक्री केली जाते. आवक बाबत सांगतना करण जाधव यांचे दिवाणजी कल्याण व्हदडे म्हणाले, की दोन तीन वर्षांपासून तमिळनाडू येथून १५ ते २० दिवसांनी पॅशन फ्रूटची आवक होत होती. उच्चभ्रू ग्राहकांकडून मागणी असल्याने सध्या तरी आवक आणि विक्री संतुलित आहे. फळांना सुमारे १०० ते २५० रुपये प्रति किलो दर मिळतो. मद्यामध्ये मिसळून कॉकटेल करण्यासाठी काही मद्य व्यावसायिकांकडून काही मागणी असते. या फळांचा गर आणि सब्जासारखे बी त्यात वापरले जाते.
‘ॲग्रोवन’सोबत विशेष ऋणानुबंध
ॲग्रोवनचे नियमित वाचक असलेल्या पांडुरंग बरळ व बंधूंनी १६ एकरांमध्ये विविध फळांची यशस्वी शेती फुलवली आहे. एकूण प्रगतीमध्ये ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याने त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी घराला ‘ॲग्रोवन पुष्प’ आणि शेततळ्याला ‘ॲग्रोवन जलकुंभ’ आणि एकूण शेतीला ‘ॲग्रोवन फार्म’ नाव दिले आहे. त्यांच्या चारचाकी वाहनांवरही ‘ॲग्रोवन फार्म’ असे नाव दिमाखाने झळकत असते.
--------
पांडुरंग बरळ, ९९२२०७३४३२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.