Rain : पाऊसपाणी आभाळदानी...

गावात रघू भटजी फिरताना दिसला. आता त्याला कोण मुहूर्त, पावसाची शक्यता विचारत नाही. रस्त्याने कोण त्याची टवाळीपण करत नाही. खालती कडून वर येताना दारात माझी आजी बसलेली. ती रघूकडे पाहत राहते आणि रघू तिला न विचारता सांगतो ‘‘सगळ्या वेळी नक्षत्राप्रमाणे पाऊस होत नाही, शेवटी पाऊसपाणी आभाळदानी.’’ म्हातारीने लासरू पडलेल्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पुन्हा ती आभाळाकडं बघत राहिली.
Monsoon
MonsoonAgrowon

जयंत खाडे

मृगात सुरुवातीच्या पावसानं सगळा माळ चिंब भिजला होता. आठवडाभर एकसारखे रेवे पडत होते. चांगला जिरवणीचा पाऊस झाला होता. माळाला घात लगेच आली आणि पेरणीचा घायटा उठला. वरच्या तुकड्यात भुईमूग टोकून काढला तर मधल्या पट्टीत हायब्रीड पेरलं. खालच्या तुकड्यात गडबडीत भुईमूग पेरला होता आणि मध्ये तुरीचं मोगणं घातलं होतं. छपराजवळ मिरच्यांचे, कांद्याचे तरू, गवारी, मका टोकला होता तर बाजूलाच कडागण्याने मूग, उडीद, चवाळं टोकले होते. आबा, बापू आणि खाली दाजीअप्पांनी सुद्धा पेरणी उरकली होती. पोरांच्या शाळा सुरू व्हायच्या आत सगळा माळ हिरवागार झाला होता. सगळी पिकं झकास इराडली होती आणि आता पावसानं पाठ फिरवली. त्याचं हे नेहमीचं आहे.

पावसानं ओढ दिल्याने पिकं वाचवायचे प्रयत्न चालू आहेत. भांगलण, कोळपणी केली आहे पण आता पिकं दुपार धराय लागलीत. आभाळाकडं बघून बघून सगळे हवालदिल झाल्यात. घसा वाळून गेलाय. सगळ्या रानभर उदासी पसरलेली आहे. पावसाच्या गप्पा, नक्षत्र व त्याचं वाहन याची चर्चासुद्धा बंद झाली आहे. मोठी माणसं जाता येता कोण गाठ पडलं तरी खाली मान घालून बिनबोलता जात आहेत. पोरांमध्ये सुद्धा उत्साह नाही. दिवसभर माळाला धुडगूस घालणारी आबाची संद्या, परद्या पण गपगुमान पोरींच्या मागं फिरत आहेत. नाहीतर आंब्याच्या पानाची चक्रं करून ती जोरात खळ्यावर पळतात तर कधी पिंपळाच्या पानाची पिपाणी करून तोंडानेच आवाज करतात. गणगट्याची बैलगाडी करा नाहीतर त्याची गदा करून खेळत बसा. कधी भुसभुशीत माती पायावर घेऊन घरटं करा. त्यांचे खेळ नेहमी सगळी कौतुकाने पाहतात. त्यांनाच काय पण मुक्या जित्रापाला सुद्धा काहीतरी आक्रित घडल्या सारखं वाटतयं.

नानीनं या वर्षी भांडून रान करायला घेतलंय. मधल्या पट्टीत आबानं रानाची मेहनत करून दिली होती. तिच्या रेडीचं शेण होतं म्हणून उकिरडा काढताना खताची एक गाडी पण त्यात विस्कटली होती. बहिणीकडून पायलीभर बी आणून तिने माढा भुईमूग टोकलाय. तालीवर भोपळ्याचं बी टोकून त्याचा वेल पण चढवला होता. तालीच्या बाजूने कडागण्याने तिनं मूग, चवाळं, उडीद घातलं होते आणि ते उगवलं पण चागलं होतं. तसं हे वर्ष तिच्यासाठी चांगलं गेलं नाही. आर्धेलीने आणलेली रेडी व्येताचे वेळी मेली आणि आता वावरात असं झालं होतं. दोन दिवस राबून तिने बी बेवळा टोकला होता, चांगली उगवण पण झाली होती आणि आता पावसानं दगा दिला. सगळ्या गावाचं हे हाल झालं होतं पण ती मनातल्या मनात आपल्या एकट्या नशिबाला दोष देत बसली होती.

दुपारी सगळी लिंबाखाली जेवायला बसली होती. नानी उन्हात लांब बसून होती. आबीनं सविताला खुणावले आणि सविता तिचं जेवण घेऊन नानीजवळ गेली. नानीनं फडक्यात अर्धी भाकरी आणि वर दोन लसणाच्या कुड्या आणल्या होत्या. सवितानं तिच्या भाकरीवर डाळ-कांदा ठेवला आणि तिला बोलतं करीत ती खाऊ लागली. खरं तर नानीचं वय जास्त नाही पण उपासतापास आणि देवदेवर्षी यामुळे तब्येतीकडं तिचं खूप दुर्लक्ष आहे.

Monsoon
Soybean Sowing : सोयाबीनसाठी जोडओळ पेरणी पद्धती

भाऊ नानीबरोबर भांडून निघून गेलाय. तसा तो दुसरी-तिसरीकडं कुठं जाणार नाही. निश्‍चित थोरल्या आत्तीकडं गेला असणार. खरं तर त्याच्यासाठी हे सुगीचे दिवस. दररोज लोक दारात कामाला बोलवायला येतात. रानात या दिवसात खूप कामं मिळतात. सकाळपारीनं कामाला जायचं आणि दिवस बुडताना एक पावटी मारून इम्याच्या हॉटेलमध्ये चिवडा खात बसायचं. मध्येच कोणी खंडून काम दिलं तर मग दोन दिवसांचं काम एका दिवसात ओढायचं आणि पुढचा दिवस गायब! घराकडं काय पाहिजे नको ते पाहणं नाही, कशाची फिकीर नाही का काळजी नाही. त्याला मोठी आत्ती ‘भुईतनं उगवला हाय’ असं म्हणते. तस उरसाच्या अगोदर महिनाभर तो सज्जन असतो. इमानदारीमध्ये काम करून पाहुणे मंडळींसाठी उत्तम व्यवस्था करतो. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

आता पाऊस नसल्यानं कामच राहिलं नाही. तण उठायला सुद्धा पाऊस नाही. भाऊ एक-दोन दिवस फॉरेस्टमध्ये पण कामाला गेला होता; पण त्याचं तिथं जमलं नाही. त्याची उपासमार व्हायला लागली की तो नानीच्या शिलकीवर डल्ला मारतो. कोण नसताना कडीतून कुलूप काढून डब्बे, गाडगी तपासून रुपया- दोन रुपये पळवितो. पण आता नानीकडेच काही नाही म्हणून त्याची अडचण झाली. त्यामुळेच तो भांडण करून निघून गेला आहे.

Monsoon
Weather Update : राज्यात हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता

छपरापाठीमागे सांदित तात्या भोपळा, तोंदली, दोडक्याचं बी टोकतात; मग त्याचे वेल छपरावर पसरतात. त्याला फळं पण धरतात. या वर्षी जनावरांचं शिल्लक पाणी टाकून सुद्धा सगळे वेल वाळून गेलेत. त्यामुळे आता दसऱ्यात छपरावर या वेलींची पिवळी फुलं आणि वेलीत लपलेली फळं दिसणार नाहीत.

भुईमुगाची आरी सुटायच्या वेळेलाच ओढ बसल्यानं आणि शेणखताच्या मात्रेच्या गरमीनं सगळा भुईमूग हातचा गेलाय. हायब्रीड आणि मका वितभर उगवलाय आणि वाळायला लागलाय. खोरीला बाजरी पेरली होती; पण ती पूर्ण वाळून गेली आहे. तिकडं आता कोण जात पण नाय. धनगर त्यात बिनधास्त मेंढरं चारत असतो. सगळे म्हणतात निदान जित्रापाच्या मुखात तरी पडुदे.

मळ्यात एकरभर हळद लावली होती. चांगली उगवण झाली होती. विहिरीला पाणी बरं होतं; पण पाऊस लांबला आणि विहिरीनं तळ गाठला. सामाईक विहिरीतून आठवड्याला एक वेळ पाणी मिळायचं; पण आता पाणीच राहिलं नाही. सगळी हळद वाळून चालल्या. हळदीचा बेवड बघवत नाही. एवढंच नगदी पीक घराला वर्षभर पोसवितं; पण आता त्याची आशा सोडली आहे. पोखरवाटेची तीच तऱ्हा आहे. भुईमूग वाळत चाललाय, तुरीचं घातलेलं मोगण तग धरून आहे पण आता त्याला पीक काय येणार?

वरचं तळं या वेळेला भरलेलं असतं; पण आता त्यात पाण्याचा थेंब नाही. खालच्या आडाच्या पाण्यानं तळ गाठलाय. पहिल्या पावसानं जरा आड पाझरला होता, आता त्याचं पाणी कसं तरी चार घराला पुरतं. तेल्याचा म्हातारा आडात इतका वाकून बघतो, की कधीतरी त्यात पडेल असं वाटतं. खोरीच्या तलावात सुद्धा एक थेंब पाणी नाही. मृगात आलेले थोडं पाणी गळून गेलंय आणि तलाव कोरडा ठणठणीत झालाय. पलीकडचा उंबर टाक्याचा डोह पण आटून गेलाय. डोंगरात साळिंदर, ससे, मोर आणि कितीतरी पक्ष्यांचा गोतावळा आहे. त्यांचं जगणं अवघड झालं असणार. आता परतीचा पाऊस आला तर बरं नाहीतर सगळे डोंगर सोडून जातील.

रात्री गावात सन्नाटा असतो. तशी दिवसा पण शांतताच आहे. शेती कामाची लगबग बंद आहे. पंचायतीने रस्त्यावरचे दिवे बदलले नाहीत त्यामुळे रस्त्यावर ठार अंधार आहे. पोरं, माणसं अंदाजाने चालतात. घरात दिवे लुकलुकतात पण त्याचा उजेड जास्तीत जास्त सोप्यात येतो, अंगणसुद्धा अंधाराने भरून जातंय. आभाळ स्वच्छ असल्याने चांदण्या रात्री, पौर्णिमेला कवडसे पडतात पण ढग नसलेलं आभाळ लोकांना पाहवत नाही.

पोरं गल्लीत उंबराच्या झाडाखाली रात्रीचे जमतात. चेष्टा, मस्करी, टवाळ्या बंद आहेत. उगाच दुष्काळाच्या गोष्टी सुरू होतात. पाणी योजना होणार का नाही, यावर चर्चा होते. नाना सांगतो की संभु देव एकदा २१ दिवस बिन आनपाण्याचा संतोषगिरीवर पाऊस पडावा म्हणून बसला होता. त्या वेळी जोरात पाऊस पडला होता. गावकऱ्यांनी त्याला मिरवणुकीने खाली आणला होता. उगाच लोकं जाता येता त्याच्या पाया पडत नव्हती. पण सगळी म्हणतात, की आता त्या बेजमीचा माणूस गावात नाही.

आबाचा तान्या झाडाच्या बुंध्याशी मुरगुळून झोपतो आणि एक शब्द न बोलता या गप्पा ऐकतो. तिथूनच शंकरच्या म्हातारीची अंधारातली धडपड दिसते. शंकरच्या चुलत्याने त्याची लाइट तोडली आहे. त्यात त्याच्या म्हातारीचे डोळे धड नाहीत. सगळ्या पोरांना म्हातारीची कणव येते पण काय करणार? शंकरपण म्हणतो की आबा तर किती दिवस बिल भरणार? त्यानं काही चुकीचं केलं नाही.

वाड्यातली दादा, अण्णा आणि त्यांचं दोन दोस्त आता विहिरीच्या कामावर जातात. आमची बाबय ह्यांना चांडाळ चौकडी म्हणते. तिचे किती तरी कोंबडे यांनी पळविले आहेत. कोंबडा गेला की बाबय खूप चिडते, अद्वातद्वा बोलते आणि हीच चौकडी तिला दात काढून चिडवते. डोंगरात ससे मारा, साळिंदर मारा आणि तिथंच यांच्या तीन दगड मांडून जेवनावळ्या चालत. गावात आंदा सुताराने पलुस्कर मळ्यातली झाडं विकत घेतली होती आणि निगुतीने कापून, रंधून चांगलं लांब सोट तयार केलं होतं. आष्ट्याच्या महाजनाने रानात घर बांधायला हे सोट ठरवलं पण होतं. सुतार मिळणाऱ्या पैशावर मनात इमले बांधत होता आणि एके दिवशी बाहेर ठेवलेलं सोट कुण्या मायनी गायब झाले. सुतार यरबडल्यागत गावात, डोंगरात, पांदिन फिरत होता; पण पत्ता लागला नाही. सगळ्या गावाला या चांडाळ चौकडीवर संशय होता, पण यांनी ताकास तूर लागू दिला नाही. यांच्या या गुणामुळे यांना कोणी काम देत नाही. त्यात आता असे दिवस आले. त्यामुळे यांनी विहिरीचं गाळ काढण्याचं काम घेतलं आहे. खरं तर हे काम खूप धोकादायक. उतरत्या कळीच्या विहिरीत काही ढासळलं तर मरणच! गावठाणातील मांगाची पोरं असली कामं करतात. सगळा गाव त्यांच्या मागे लागतो. आता यांनी हे काम हाती घेतलं आहे. बाबयचा शाप यांना लागतो की काय कोणास ठाऊक.

माळाला वसाहतीमधली म्हातारी त्या दिवशी दुपारी दुपारी चालत आली. म्हातारी ऐंशीला जाऊन पोहचली आहे; पण मानी म्हातारी अजूनही काम करते. एखादा डाग तात्या तिला खंडून देतात. ती सकाळी दिवस उगवला की कामाला सुरुवात करते आणि दिवस मावळला की थांबते. मग मावळतीकडे तोंड करून हळूहळू चालत जाते. तिचा दारुडा पोरगा तिचे पैसे लांबवितो म्हणून ती रोजगार साठवून ठेवते. तिचा हिशोब पक्का आहे. ती विसाचे चार, दहाचे तीन व पन्नासाची एक असा बरोबर हिशोब लावते. तात्या तिला अहोजावो करतात. तिने धरणाचं काम सुरू झाल्यावर मुंबईत खानावळ चालवली होती. आता वसाहतीमध्ये जागा, घर मिळाल्यावर ती इथं आली आहे. पण मूळ जागेवरून हलविल्याचा तिचा राग अजूनही तिखट आहे. आम्हाला उपटून काढून आणलं, असं ती म्हणते. असा दुष्काळ हा आमचा शाप आहे, असंही ती म्हणते. खरं तर म्हातारी व्यवहारी आणि समंजस आहे; पण या विषयावर आली की तिला भान राहत नाही. अशा वेळी तात्या उगीच खडा हातात धरून भुईवर रेषा मारतात. मला म्हातारी, नानी, शंकरची आई यांच्या अंगावरील सुरकुत्यांमध्ये त्यांची चित्तरकथा लिहिलेली दिसते. म्हातारीबरोबर खूप बोलावं वाटतं; पण ते शक्य होत नाही.

वरप्याच्या म्हातारीचा एकुलता लेक मिलिटरी मध्ये लांब सीमेवर आहे. पोरगं पेरणीच्या वेळी सुट्टी वर आले होते. लै नाद त्याला शेतीचा. सुट्टीत त्यानं रान ट्रॅक्टर लावून ओढून घेतलं आणि सगळी पेरणी करून घेतली. दिवसभर पोरगं रानात थांबायचं. म्हातारीनं भाचीच सून करून आणलीया. पोरगी पोटुशी आहे. तिला म्हातारी माहेराला सोडत नाही. आडवाटी असणाऱ्या भावाच्या गावात तिची सोय होणार नाही म्हणून तिनेच जबाबदारी घेतलीय. पोरगं पत्र लिहून सारखं पावसाची आणि बायकोची चौकशी करतंय. म्हातारीला दोन्ही बाजूंनी घोर पडलाय. हसती खेळती म्हातारी यामध्ये पिचून गेली आहे. शेजारी-पाजारी बोलत बसणारी म्हातारी एकाएकी मुकी झाल्या. घरात अवघडलेली सून आणि करपायला लागलेली पिकं याचा ताण तिला सोसेनासा झालाय.

गावात रघू भटजी फिरताना दिसला. आता त्याला कोण मुहूर्त, पावसाची शक्यता विचारत नाही. रस्त्याने कोण त्याची टवाळीपण करत नाही. खालती कडून वर येताना दारात माझी आजी बसलेली. ती रघुकडे पाहत राहते आणि रघू तिला न विचारता सांगतो ‘‘सगळ्या वेळी नक्षत्रा प्रमाणे पाऊस होत नाही, शेवटी पाऊसपाणी आभाळदानी.’’ म्हातारीने लासरू पडलेल्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पुन्हा ती आभाळाकडं बघत राहिली.

--------

(लेखक सांगली जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत.)९४२१२९९७७९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com